समस्त रसिक वाचकांना शिल्पानंदाचा नमस्कार.
भारत हा विविधतेने नटलेला देश. विविध संस्कृतींचा आणि कलागुणांचा संगम या देशात पहायला मिळतो. शिल्पकला, स्थापत्यकला यांनी तर भारत देश समृद्धच आहे. आपल्या परिसरात अशी बरीच ठिकाणे असतात जी शिल्पांनी, स्थापत्यकलांनी तसेच इतिहासाच्या वारशांनी परिपूर्ण आहेत . अशाच ज्ञात-अज्ञात स्थळांचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. हा प्रयत्न आपणा सर्वांना आवडेल अशी अशा.
भयहारिणी भवतारिणी आई भवानी, धानोरा पुर्णा
विदर्भप्रांत हा मुळातच संत आणि देवी-देवतांच्या वास्तव्याने पावन झालेला भूभाग. अशा या पवित्र भागातून बऱ्याच नद्या वाहतात. त्यातीलच परम पावनी आणि पुराणांनी नमूद केलेली पयोष्णी अर्थात पूर्णा नदी. या नदीच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे वसली आहेत. त्यातीलच एक "श्री क्षेत्र धानोरा(पुर्णा )".
धानोरा हे चांदूर बाजार (जि . अमरावती ) तालुक्यातील गाव. हे गाव अमरावतीच्या पश्चिमेला, आसेगाव- चांदुर बाजार मार्गावर, अमरावती पासुन अंदाजे ३० किमी अंतरावर आहे. गाव अतिशय लहान परंतु परिसरातील धार्मिक आणि ऐतेहासिक प्रसिद्ध स्थळ.
गावाच्या दक्षिण बाजूला श्री भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असुन, मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे.
गाभारा प्रशस्त असून, गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे. मूर्ती साधारण चार साडेचार फुट उंचीची असून कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली आहे.
भवानी देवी चतुर्भुज असून प्रदक्षिणा क्रमाने, देवीच्या उजव्या खालील हातात महाळुंग(मातुलिंग), वरच्या हातात तलवार, वरच्या डाव्या हातात खेटक (ढाल) आणि डाव्या खालील हातात पानपात्र आहे.
स्थानक (उभ्या) स्वरूपातल्या देवीच्या पायात जोडवे, पैंजण, तोडे आहेत. हातात सुंदर कंकणे, केयूर(बाजूबंद), असून कंबरेवर सुंदर कोरीव असा कंबरपट्टा आहे. गळ्यात कंठा, माळा इत्यादी अलंकार आहेत. शिरावर कलाकुसर युक्त करंडक मुकुट असून, मुकुटावर नागफणा कोरलेला आहे.
देवीच्या पायाशी डाव्या बाजूने, सिंह हे तिचे वाहन असून त्याच बाजूने चामरयुक्त दोन परिवार देवता (सेविका) आहेत. उजव्या पायाशी चामरधारी, धुपधारी सेविका असून एक तपस्विनी नमस्कार मुद्रेत बसलेली आहे. द्वारशाखेवर उभय बाजूने तीन - तीन देवींची रूपे कोरलेली आहेत त्यात मुख्यत्वे, गौरी, चामुंडा, नारायणी यांचा समावेश आहे. एकंदरीत वर्णनावरून ही मूर्ती साधारणतः दहा किंवा अकराव्या शतकातील असावी.
धानोरावासिनी भवानी देवी हे साक्षात तुळजापूर भवानीचेच रूप. तुळजापूरवासिनी भक्तांच्या हाकेला धावून श्री क्षेत्र धानोरा येथे आली आणि येथेच स्थिरावली अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात देवीसमोर, गाभाऱ्याच्या मध्यभागी श्री महादेवाची पिंड आहे. धानोरा गावाला प्राचीनकाळी धान्यपुर म्हणत असत आणि या गावाचा हा ईश्वर म्हणून या महादेवाला "धान्येश्वर " म्हणतात.
गावाच्या मध्यभागी सुंदर नारायणाचे (विष्णूचे) भव्य मंदिर आहे. नारायणाची मूर्ती जमिनीखाली दहाफूटाच्या गाभाऱ्यात आहे. मूर्ती अष्टभुज नारायणाची आहे. या बद्दल पुढील भागात........
संथ वाहते पूर्णामाई.... . . . . . . . .
आई भवानीचा उदो .........
कृपया हा ब्लॉग कसा वाटला, काही सुधारणा आवश्यक असतील त्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवाव्यात हि विनंती.
धन्यवाद.....