बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : आठवी माळ : महागौरी...

जगन्मातेचे आठवे रूप आहे महागौरी....
संपूर्णतः गौरवर्ण असलेली देवी, करपूरगौर महादेवाची अर्धांगी म्हणून महागौरी...

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः ।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ॥

चतुर्भुजा देवीचे वाहन सुद्धा श्वेत वृषभ आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल असून एक हात अभयमुद्रेत आहे. डाव्या वरच्या हातात डमरू असून खालचा हात वरदमुद्रेत आहे.
देवीबद्दल आख्यायिका अशी की , श्रीशंकर पती मिळावे म्हणून पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. या कठोर तपामुळे पार्वतीचा देह काळवंडला. प्रसन्न झालेल्या शंकराने गंगेच्या शुभ्र जळाने स्नान घातले आणि पार्वतीला तेजस्वी, सुंदर देह प्राप्त झाला तीच ही महागौरी....

महागौरी आपल्या धवल हास्याने सर्वांवर कृपेचा वर्षाव करो हीच प्रार्थना....

सुखशान्तिदात्रीं , धनधान्यप्रदायनीम् ।
डमरूवादनप्रियां महागौरीं प्रणमाम्यहम् ॥

त्रैलोक्यमङ्गला त्वं हि तापत्रयविनाशिनीं प्रणमाम्यहम् |

वरदा चैतन्यमयी महागौरीं प्रणमाम्यहम् ।।

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : सहावी माळ : कात्यायनी - आनंद साऊरकर


नवदुर्गेचे सहावे स्वरूप आहे ... देवी कात्यायनी...

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी ॥

या देवीविषयी आख्यायिका अशी:
पुराणकाळात कत नामक ऋषि होऊन गेले. त्यांचा पुत्र कात्य. या कात्य गोत्रात महर्षि कात्यायनांचा जन्म झाला. देवी भगवतीच्या आपल्या पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा म्हणून यांनी बरेच वर्षे देवीची आराधना केली. देवीने प्रसन्न होऊन त्यांना इच्छित वर दिला.
महिषासुर युद्धाच्या वेळी दुर्गेला साह्य करण्यासाठी या देवीने अवतार घेतला. महर्षि कात्यायन यांनी देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून "" कात्यायनी""...

या देवीचा उल्लेख देवी भागवत, मार्कंडेय पुराण आणि श्रीमद भागवत पुराण यात आला आहे. ही देवी व्रजमंडलाची अधिष्ठात्री देवी आहे. भगवान श्रीकृष्ण पतिरुपाने लाभावे या करता समस्त गोपींनी यमुनेच्या तटावर या देवीची आराधना केली होती..

देवीचे स्वरूप अत्यंत भव्य व दिव्य असून, सुवर्णा प्रमाणे तेजस्वी वर्ण आहे. सिंह वाहिनी देवी चातुर्भुजा असून उजव्या हातात तलवार व कामलपुष्प धारण केलं आहे. डावीकडील वरचा हात अभयमुद्रेत तर खालचा हात वरदमुद्रेत आहे.

देवी कात्यायनी आपल्याला वरदायिनी ठरो हीच प्रार्थना....
परमानन्दमयी देवि परब्रह्म परमात्मा ।
परमशक्ति,परमभक्ति, कात्यायनसुते नमोऽस्तुते ॥

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : पाचवी माळ : स्कंदमाता...आनंद साऊरकर

देवीचे पाचवे स्वरूप स्कंदमाता या नावाने संबोधले जाते. देवासुर संग्रामात देवांचा सेनापती असलेल्या स्कंद म्हणजेच कुमार कार्तिकेय ची ही माता. सकल विश्वाची माता असलेली जगदंबा सर्वप्रथम कार्तिकेयची माता असल्यामुळे तिला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते..

सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ॥

ही देवी सिंहवाहिनी, चतुर्भुज असून देवीने वरील दोन्ही हातात कमलपुष्प धारण केले आहे. उजव्या हाताने स्कंदाला मांडीवर घेतले आहे आणि डावा हात वरदमुद्रेत आहे...

जगताचे पुत्रवत लालन - पालन करणारी देवी स्कंदमाता आपल्या सर्वांवर वात्सल्याचा वरदहस्त ठेवो हीच प्रार्थना....

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : चौथी माळ :"कुष्मांडा"....आनंद साऊरकर...

देवीचे चौथे स्वरूप आहे कुष्मांडा. संपूर्ण चराचर, हे ब्रह्मांड निर्माण करणारी जी जगन्माता आहे तीच ही कुष्मांडा..

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदाऽस्तु मे ॥
मूलतः कुष्मांड म्हणजे कोहोळा... एका कोहोळ्यात असंख्य बिया असतात आणि त्यापासून अनंत कोहोळी पुन्हा पुन्हा निर्माण होतात. त्याच प्रमाणे या देवीने एकाचे अनेक करून या संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार केलेला आहे. 
ही देवी अष्टभुजा असून, देवीने कमंडलू, धनुष्य, बाण, कमलपुष्प, गदा, चक्र, अमृतकलश आणि जपमाळ धारण केलेली आहे. 
जेव्हा संपूर्ण चराचर अंध:कारमय होते, त्यावेळेस देवीच्या तेजाने व तिच्या मंद - मंद हसण्याने या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. 
ही कुष्मांडा, जगतजननी नवरात्रीच्या चौथ्या माळेला आपणासर्वांवर कृपेचा अमृतवर्षाव करो ही प्रार्थना....

जगन्माता जगत्कर्त्रि जगदाधाररूपिणी । 
चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम् ॥

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : तिसरी माळ "चंद्रघंटा"...

देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा देवी... 


चंद्राप्रमाणे निर्मळ असलेल्या देवीचं ध्यान करतात: 

पिण्डजप्रवरारूढा चन्द्रकोपास्त्रकैर्युता ।
प्रसादं तनुतां मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता ॥
या देवीच्या उत्पत्ती विषयी कथा अशी की:
देव - दानवांच्या घनघोर युद्धात देवतांचा पराजय झाल्यानंतर सर्व देवता ब्रह्म देवाकडे साह्य मागण्यासाठी गेले. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन श्रीविष्णू आणि शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. देवतांनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती देताच, ब्रह्मा, विष्णू व माहेशांना अत्यंत राग आला.  या क्रोधामुळे तिघांच्याही मुखातून एक तेजोवलय बाहेर आले व त्या तेजोवलयाच्या एकत्रीकरणातून या देवीचा प्रादुर्भाव झाला.  त्या नंतर सर्व देवतांनी देवीला एक एक अस्त्र बहाल केले. इंद्राने देवीला अलौकीक घंटा प्रदान केला. ह्यादेवीचा शिरावर चंद्र असून त्याचा आकार घंटेसारखा आहे त्यामुळे देवीला चंद्रघंटा म्हणून ओळखल्या जाते.
देवी चंद्रघंटा ही मानवी मानसंबंधीची, मानसिकतेची देवता आहे. 'चंद्रमा मानसो जाता....' चंद्र हा मनाचा कारक आहे असं वर्णन पुरुषासूक्तात आलेलं आहे..चंद्राच्या कलांप्रमाणे मानवी मन सुद्धा आकुंचित आणि प्रसारण पावतं. तर घंटा हे अनाहत नादच प्रतीक आहे. घंटेतून निर्माण होणारा ध्वनी आपल्याला वर्तमानात घेऊन येतो. स्वत्वाची जाणीव घडवून आणतो. म्हणून चंचल मनाला अनाहत नादाने वर्तमानात आणणारी देवी श्री चंद्रघंटा......

चन्द्रमुखी इष्टदात्री इष्टमन्त्रस्वरूपणी ।
धनदात्र्यानन्ददात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम् ॥

सोमवार, २३ जुलै, २०१८

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा . .... .

नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माउली ज्ञानगंगा ।
 नमो  पुंडलिका नमो  चंद्रभागा । नमस्कार माझा माझा संता अनेका।। 

अबीर आणि गुलालाची उधळण करत, अंगावर आषाढाच्या चिंब करणाऱ्या पर्जन्य धारा झेलत, टाळ मृदूंगाच्या  जयघोषात देहभान हरपून धुंद होतो वारकरी .... .... 
जेष्ठांची पौर्णिमा झाली कि सर्व विठ्ठल भक्तांना वेध लागतात ते वारीचे. वरीला वारंवार जातो तो वारकरी नव्हे तर जो वरवरचा देव न मानता मनापासून आणि चराचरात देव अनुभवतो - जगतो तो वारकरी. . . . . . . 
या वारकऱ्यांना वेध लागतात ते 'सावळे सगुण मानस मोहन ' अशा विठू रायाचे.. . . . . 
तो कानडा विठ्ठल, युगानुयुगे भक्तांच्या प्रेमापोटी, त्यांची वाट पाहात कटीवर हात ठेवून पंढरपूर क्षेत्री विसावला आहे. जसे त्याला भक्तांचे वेड, तसेच त्यांच्या भक्ताला विठूचे वेड..... एकदा जो विठ्ठलाला भेटतो तो विठ्ठलमय होऊन जातो.... 
त्याच वेडाच वर्णन करतांना माउली म्हणतात.. 
'कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू , तेणे मज लावियेला वेधू '
शांतीब्रह्म एकनाथ या अनुभवाचे वर्णन करतांना आपल्या भारुडात म्हणतात... 
'या या शेजारणीने बरं  नाही केलं गं  बया 
मला पंढरीला नेलं गं बया '. . . . 
याच वेधाबद्दल , जगद्गुरू तुकोबा म्हणतात 
'पंढरीचे भूत मोठे आल्यागेल्या झडपी वाटे '. . . . . 
सर्वांना वेड लावणारा विठोबा आहे तरी कसा... 
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया.... 
पांडुरंगाने  महाराष्ट्रातील संतांनाच  नव्हे तर पुराणिकांपासून सर्वां वरच गारुड घातलंय .... 
समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् ।
तरुणतुलसिमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विट्ठलं चिन्तयामि ॥
( ज्याची चरण कमळे समस्थितीत आहेत, जो जळणे भरलेल्या निळ्या मेघाच्या वर्णाचा आहे , ज्याने आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवलेले आहेत, जो सर्व अलंकरणाचे अलंकरण आहे, ज्याने आपल्या कंठात कोवळ्या तुळसीची माळ परिधान केली आहे,, ज्याचे नेत्र कमळासारखे आहे आणि जो आपल्या मुखावर कृपेचे धवल हास्य खेळवीत आहे, त्या विठ्ठलाचे मी चिंतन करतो..)
श्रीमद आद्य शंकराचार्य पंढरीला आले असता, त्यांना पांडुरंग कसा दिसला याचं सुंदर वर्णन त्यांनी आपल्या पांडुरंगाष्टकम या रचनेत पुढील प्रमाणे करतात.....
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।

 पंढरीचा महिमा थोर आहे. सर्व संत श्रेष्ठींनी याचे अपरंपार वर्णन केले आहे. या क्षेत्रीचा राणा वारकऱ्यांच्या जिवलग सखा पांडुरंगाकडे एकाच मागणं मागुया कि या आषाढीच्या पावन पर्वावर विठ्ठला सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभो, विविध स्थरावरील क्लेश मिटून मैत्रीपूर्ण वातावरणात तुझी लेकरे नांदो हीच प्रार्थना.... 

नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निधान पांडुरंग ।।

शुक्रवार, ४ मे, २०१८

दशावतार मंदिर, भाजीबाजार, अमरावती (महाराष्ट्र )


।। केशव धृतदशविधरूपं  ।।

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भगवंताने सर्व चराचराला दिलेल्या या वाचनपूर्तीसाठी प्रत्येक युगात विविध अवतार धारण केले. हिंदू परंपरेमध्ये  भगवान विष्णूने जगत पालनासाठी २४ अवतार धारण केले अशी  मान्यता आहे.  त्यापैकी दहा अवतार सर्वांना माहित आहेत. या दहा अवतारांपैकी वराह,  नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध यांची स्वतंत्र मंदिरे पाहायला मिळतायत अथवा  सामान्यतः    विष्णू  मंदिरातील भिंतींवर, विविध लेण्यांमध्ये या दहा अवतारांचे शिल्प  आढळतात. परंतु दहाही अवतारांचे एकत्रित मंदिर आढळत नाही.  असे दहाही अवतारांचे "दशावतार मंदिर ",  अमरावती (महाराष्ट्र ) येथील भाजीबाजार भागात आहे. 
या मंदिरातील दशावतार शिल्पांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. .. . . . . . 
दशावतार मंदिर हे भाजीबाजार भागातील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात एका भिंतीलगत, रांगेत सर्व अवतारांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीवर त्या-त्या अवताराचे नाव सुद्धा लिहिलेले आढळते. 
या मूर्तिक्रमात पहिली मूर्ती आहे शेषशायी भगवान विष्णूंची

सर्व चराचर आणि अवतार याच आदी नारायणापासून उत्पन्न झाले हे दाखवण्यासाठी हि मूर्ती प्रथम क्रमांकावर आहे. मूर्ती साधारण २ फूट रुंदीची असून, सात फण्यांच्या शेष शय्येवर चतुर्भुज नारायण पहुडलेले आहेत.नारायणाच्या  तीन हातात कमळ , गदा  व चक्र असून चौथा हात डोक्याखाली धरला आहे. नाभीकमळावर ब्रह्मदेव दाखवलेले असून पायाशी लक्ष्मी आहे. मूर्तीच्या मागच्या प्रभावळीवर वरच्या थरात दहाही अवतार क्रमाने दाखवले आहेत. त्याखालच्या थरात दहा दिक्पाल (इंद्र,अग्नी,यम,नैऋती,वरुण , वायू, कुबेर आणि ईश) आहेत. 

१. मत्स्य अवतार: भगवंताचा प्रथम व जलचर अवतार म्हणजे मत्स्य अवतार.  समुद्राच्या लाटांवर मत्स्य भगवंताला दाखवण्यात आले आहे.

२. कूर्म अवतार: भगवंताचा उभयचर अवतार म्हणजे कूर्म अवतार. 


या दोनीही मूर्तींचे वेगळे पण म्हणजे, साधारणतः मत्स्य आणि कूर्म अवतारात अर्धा भाग प्राणी आणि अर्धा भाग भगवंत असा दाखवतात. परंतु येथे अवतार मूळ प्राणिरूपात दाखवले आहेत. 

३. वराह अवतार: मूर्ती साधारण दोन ते अडीच फूट असून. भगवान वराह स्थानक स्वरूपात, चतुर्भुज आहेत. प्रदक्षिणा क्रमाने गदा, चक्र, शंख आणि पद्म धारण केले असून, डाव्या वरच्या हाताच्या कोपरावर भूदेवीला धारण केले आहे. डावा पाय मनुष्यरुपी शेषावर ठेवला आहे. 
४. नरसिंह अवतार: मूर्ती साधारण  दोन ते अडीच फूट उंचीची आहे. मूर्ती व्दिभुज स्वरूपाची आहे. नरसिंहाची  मूर्ती साधारणतः हिरण्यकशिपू विदारक किंवा चतुर्भुज स्वरूपाच्या आढळतात. परंतु विदर्भ भागात व्दिभुज नरसिंहाच्या भरपूर मूर्ती आढळतात. नरसिंहाच्या उजव्या हातात भूमी स्पर्शित चक्र असून डावा  हात मांडीवर ठेवला आहे. प्रभावळीवर प्रल्हाद व माता कयाधू नमस्कार मुद्रेत उभे आहेत. 

५ . वामन अवतार:  भगवंताचा हा अवतार बटू रूपात दाखवतात.  वामनाच्या एका हाती माळ आणि दुसऱ्या हातात छत्र धारण केलं आहे. 

६, ७. परशुराम आणि राम अवतार: भगवंताच्या पूर्ण अवतारांची सुरुवात परशुराम अवतारापासून होते.
परंतु या मंदिरात परशुरामाची स्वतंत्र मूर्ती नाही. परशुराम आणि अयोध्यापती राम यांच्या एकत्रित मूर्ती येथे दाखवल्या आहेत.
ही  मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातात चक्र (अस्पष्ट) धारण केलं  आहे, तर खालच्या उजव्या हातात बाण आणि डाव्या हातात धनुष्य
८. हलधर अवतार :  भगवंताचा आठवा अवतार म्हणजे हलधर भगवान. पुराणांनुसार  भगवान श्रीकृष्ण हा आठवा अवतार मानतात. परंतु अवतार मालिकेत आणि मूर्तिशास्त्रात हलधर हा अवतार मानतात. हलधर म्हणजे पुराणांमध्ये वर्णित बलराम अवतार.
हलधर मूर्ती साधारण दोन ते अडीच फूट उंचीची असून व्दिभुज स्वरूपात आहे. हलधराच्या उजव्या हातात हल (नांगर) असून डाव्या हातात फळ धारण केलं आहे. मूर्तीच्या पायाशी परिवार देवता अंकित आहे.
९. बुद्ध अवतार: भगवंताचा ज्ञानब्रह्म अवतार म्हणजे भगवान बुद्ध. तपश्चर्येत मग्न अशा स्वरूपात हा अवतार दाखवला जातो.
१०. कल्की अवतार: भगवंताचा भविष्यातील अवतार म्हणजे कल्की अवतार. या अवताराच्या मूर्ती घोड्यावर बसलेल्या आणि हाती तलवार घेतलेल्या रूपात दाखवतात. 


मंदिरातील आवारात असलेल्या दशावतार प्रतिमा
भगवंताचे हे सर्व अवतार मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्थांचे रूपक आहेत. पाण्यात निर्माण झालेल्या जीवापासून ते ज्ञान संपन्न अशा मानवीय अवस्था या दशावतार  शिल्पांतून प्रगट  होतात. 
आजही या दशावताराचा मानवीय जीवनावर, विचारांवर प्रचंड पगडा आहे. पुराणांतून, साहित्यातून आणि लोक कथांमधून या दशावतारांचा असुरी वृत्तीवर मिळवलेल्या विजयाच्या कथा आढळून येतात. हे दहाही अवतार चटकन लक्षांतराहावे म्हणून साहित्यिक पुढील श्लोक प्रस्तुत करतो:
"वेदानुद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्बिभ्रते। दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते। 
पौलस्त्यं जयते हलं कुलयते कारुण्यमातन्वते।म्लेच्छान् मूर्च्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः।।" 

भावंताच्या अशा स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या , भाजीबाजार, अमरावती येथील मंदिराला आवर्जून भेट द्यावी आणि मानव उत्कांतीचा वैज्ञानिक अविष्कार अनुभवावा हीच सदिच्छा.....  

रविवार, २५ मार्च, २०१८

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम... (आनंद विजयराव साऊरकर)

आदौ  रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम्।बालीनिग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुम्भकर्ण हनन मेतद्धि रामायणम्।।
भूतलावर राक्षस गणांचा थैमान सुरु असतांना, सर्व चराचर, ऋषि गण, मानव भयभीत असतांना ब्रह्मदेवाच्या आदेशाने सर्व देव गणांनी वानर कुळात जन्म घेतला. त्याच वेळेस, सप्तपुरी मध्ये जेष्ठ अशा अयोध्या नगरीत रघुकुलातील राजा दशरथ आपल्या पत्नी आणि वशिष्ठादि मुनींसह पुत्रप्राप्ती साठी यज्ञाचे आयोजन करत असतात. या यज्ञातून अग्निपुरुष प्रगट होतो आणि पायस पात्र  अर्पण करत दशरथाला सांगतो कि योग्य वेळी भगवान विष्णू आपल्या अंश रूपाने तुझ्या पुत्र रूपात अवतीर्ण होणार आहेत. राजा दशरथ आपल्या 
तीनही राण्यांना पायसाचा प्रसाद देतो. 
अश्वमेध यज्ञ संपून बारा महिने उलटतात आणि चैत्र महिन्यातील नवमीचे दिवशी, पुनर्वसु  नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरात महाराणी कौसल्येचा पोटी राम जन्मला......  
याच दाशरथी रामाचा आज जन्मोत्सव.  रामजन्मोत्सवाच्या निमित्याने मूर्तिकलेतील रामचंद्राचे दर्शन घडवण्याचा छोटासा प्रयत्न.... 
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।

पुराणात तीन रामांचा आवर्जून उल्लेख होतो :
१. भार्गव राम (परशुराम)

२. दाशरथी राम (सीतापती राम )

३. बलराम 
१,२,३ चित्रे पवनी,जिल्हा भंडारा येथील स्तंभावरील आहेत. 

रामायणातील काही प्रसंग :

आश्रमात वार्तालाप करतांना राम, लक्ष्मण आणि सीता... समोर सुवर्णमृग... 
(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
तोडितां फुले मी सहज पहिला जाता, मज आणुनी द्या तो हरीण अयोध्या नाथा ...... 
सुवर्णमृगाचा हट्ट करणारी सीता ....... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
मृगाची शिकार करतांना राम ..... सीतेच्या आग्रहामुळे रामाला शोधायला आलेला लक्ष्मण, आणि राम-लक्ष्मण भेट... (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)


याचक रूपात आलेल्या रावणाला भिक्षा घालतांना सीता....  मूळ रूपात येऊन सीता हरण करतांना रावण...
(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

"मरणोमख याला का मारसी रघुनाथा अडवीता खलासी पडलो, पळविली  रावणे सीता"
रावण जटायू युद्ध.... जटायूशी वार्तालाप करतांना राम-लक्ष्मण.(मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर) 

१.           २.                       ३.                             ४.                             ५.      
राम - रावण युद्धपट, (अंचलेश्वर महादेव मंदिर, चंद्रपूर येथील शिल्पपट )
१. हीच ती रामांची स्वामींनी...... अशोक वृक्ष, त्याखाली बसलेली सीता आणि  मुद्रिका देतांना हनुमंत 
२. युद्धासाठी निघालेला रावण 
३. राक्षस सैन्य 
४. वानर सैन्य 
५. इंद्र रथातुन युद्धाला सज्य राम 
राम- रावण युद्ध (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)

        रावण वधानंतर श्रीराम, माता जानकी, लक्ष्मण, हनुमंतासह अयोध्येला परततात. योग्य मुहूर्त पाहून रामांना राज्याभिषेक करण्यात येतो... प्रभू रामचंद्र अयोध्यापती होतात... 
पृष्ठतो लक्षमणम देवं सछत्रं कणकप्रभम । 
पार्श्वे भारत शत्रुघ्न चामर व्यंजनांवितौ । 
अग्रे अव्यग्रम हनुमंतम रामानुग्रह कांक्षिणां ।।
रामचंद्रांचा राज्याभिषेक करतांना लक्ष्मण आणि भरत व छत्रधरी शत्रुघ्न आणि हनुमान 
( मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर)
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥
सिहासनाधीश प्रभू राम, वामांगी जनक कन्या सीता आणि चरणाशी भक्तश्रेष्ठ हनुमंत (पवनी,जिल्हा भंडारा )
राम  राज्याभिषेकानंतर सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं  वातावरण निर्माण झालं, खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली. 
या रामनवमीच्या पावन पर्वावर आपल्याला प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद लाभो व सर्वत्र मंगलमय हो ह्याच मंगल कामना...