विश्वेश विश्वम्भर त्रिनेत्रधारी । तुजविण शंभो मजकोण तारी ।।
विश्वाच्या उत्पत्ती - स्थिती आणि लय या तीन अवस्थांमध्ये सर्व चराचर फिरत असतं आणि याही पलीकडे जे उरतं ते तत्व म्हणजे शिव..... दृश्य - अदृश्य सर्व चराचराला व्यापून तोच विश्वंभर ... विश्वनाथ...... रूपात नटतो..
विश्वनाथाचं मूळ स्थान महान अशा काशी क्षेत्री असलं तरी भक्ताच्या हाकेला धावून जाणारा हा भोळा देव जेथे भक्त तेथे प्रगट होतो. याच भोळ्यानाथाचं सुंदर भुवन नागपूर शहरात "विश्वेश्वर मंदिर" म्हणून प्रसिद्ध आहे.
नागपूर शहराचे राजे श्री रघुजी राजे भोसले यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले आणि १८८८ मध्ये विश्वेश्वर लिंगाची स्थापना करण्यात आली. नागपूर शहराच्या मंदिर इतिहासात या मंदिराला अत्यंत महत्व आहे. पेशवे व भोसले अशा संमिश्र स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे मंदिर.
मंदिर पूर्वाभिमुख असून भव्य अशा प्रवेश द्वारातून आत प्रवेश करतो. मंदिराच्या चहूबाजूंनी भिंत असून उत्तर बाजूला शुक्रवारी तलाव आहे. (या तलावाला जुम्मा तालाब आणि आता गांधी सागर हि नवे आहेत.) प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने ओवऱ्या असून प्रांगणात गणपती व हनुमानाच्या देवडया आहेत.
मंदिर सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा रचनेचे आहे. सर्व बांधकाम उत्तम अशा दगडात असून सुंदर कोरीव काम केलेले आहे. सभामंडपासाठी उत्तम अशा पांढऱ्या दगडाचा वापर केलेला असून ते नेपाळ मधून मागवण्यात आलेला आहे. तर अंतराळ आणि गर्भगृहासाठी राजस्थान मधील लाल व पिवळ्या दगडांचा वापर केला आहे. गर्भगृह काहीसे खोल असून मध्यभागी विश्वेश्वराचे सुंदर लिंग आहे. मंदिरात शिव पंचायतन (अर्थात शिवलिंग, गणपती, देवी अन्नपूर्णा, श्री विष्णू आणि सूर्यनारायण ) मूर्ती आहेत. शिवलिंगाच्या मागे विशिष्ठ असे वेटोळे घालून असलेल्या नागाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर नक्षीकाम असून द्वारपाल आहेत. बाजूनी दिव्यांसाठी बनवलेले सुंदर कोनाडे आहेत. अंतराळात नंदीची शुभ्र मूर्ती असून प्रदक्षिणा मार्गाकरिता छोटे दरवाजे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूने अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. भोसल्यांचे राज्य वऱ्हाड , छत्तीसगढ ते थेट ओडिशा पर्यंत पोहोचले असल्या मुळे तेथील संस्कृतींचा परिणाम मूर्तिकलेवर जाणवतो.
मंदिराचा चित्रप्रवास :
१. मंदिरातील मुख्य प्रवेश दारातुन आत गेल्यावर प्रांगणातील गणपती व हनुमानाच्या देवडया:
( फोटो आंतरजालावरून )
( फोटो आंतरजालावरून )
२. मंदिराचा सभामंडप आणि सभामंडपातील कमानी :
( फोटो आंतरजालावरून )
३. मंदिरातील बाहेरील बाजू :
मजबूत अशा पायावर अनेक कोन असलेल्या भिंती आणि वरती शिखर. शिखराचा बराच भाग जीर्ण झालेला असला तरी बाह्य भिंतींवरील नक्षीकाम टिकून आहे.
येथील अधोरेखित करणारी विशेष बाब म्हणजे मंदिराच्याच बाह्य भिंतीवर असलेली मंदिराची प्रतिकृती. यात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह व त्यावरील शिखर स्पष्ट दिसत आहे.
एखाद्या वस्तूचे अश्याप्रकारे model देण्याचा प्रयोग मी पहिल्यांदाच पहिला.
वरील चित्रात मंदिराचे model, त्यावर असलेला भारतोलक यक्ष, त्यावर राम व लक्ष्मणाला खांद्यावर नेणारा हनुमान व त्यावर वायुविजनासाठी असलेली खिडकी.
मंदिरातील बाह्य कोनाड्यांमध्ये गर्भगृहात असलेल्या देवतेच्या किंवा त्यांच्या परिवार देवतेचे शिल्प असतात.
(पार्वती व गणेशाला मांडीवर घेऊन बसलेला शंकर)
४. काही विशेष शिल्पे:
( विमानात बसलेले श्री गणेश आणि विठ्ठल रुक्मिणी )
(श्री कृष्णाला खेळवणारी यशोदा. पोपटाशी खेळणारा बाळकृष्ण. यशोदेच्या नाकातील नाथ सुद्धा स्पष्ट दिसते)
(फोटो आंतरजालावरून )
( नववारी पैठणी नेसलेली सालंकृत ललना.)
( मंदिराच्या बाहेरील भिंतींवर असलेले विविध शिल्प. डावीकडून १. घडा घेतलेली स्त्री, २. नागपुरुष, ३. गोल टोपी;पायघोळ झगा आणि चुडीदार घातलेला उत्तर हिंदुस्थानी पुरुष, ४. अंगरखा आणि दुटांगी धोतर नेसलेला पुरुष )
( १. चराचराच्या उद्धाराच्या विचारात असलेले ऋषीश्वर, २. हाती पानं - फुलांचा गुच्छ घेतलेला शेतकरी दादा )
( तलम कोट, हातात छडी आणि डोक्यावर तिरकस अशी टोपी घातलेला एक परदेशी )
(फोटो आंतरजालावरून )
(संपूर्ण मंदिराचा landscape )
विदर्भाची राजधानी नागपूर नगरीत विसावलेल्या या विश्वंभराचं सर्वांनी दर्शन घ्यावं आणि मंदिर स्थापत्याचा आस्वाद घ्यावा.
या श्रावण मासाच्या पावन पर्वावर विश्वनाथ विश्वंभर आपणा सर्वांना सुखी ठेवो हिच प्रार्थना....
तेजोमयं सगुणनिर्गुणमद्वितीयं
आनन्दकन्दमपराजितमप्रमेयम् |
नागात्मकं सकलनिष्कलमात्मरूपं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ||

















