शुक्रवार, ४ मे, २०१८

दशावतार मंदिर, भाजीबाजार, अमरावती (महाराष्ट्र )


।। केशव धृतदशविधरूपं  ।।

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
भगवंताने सर्व चराचराला दिलेल्या या वाचनपूर्तीसाठी प्रत्येक युगात विविध अवतार धारण केले. हिंदू परंपरेमध्ये  भगवान विष्णूने जगत पालनासाठी २४ अवतार धारण केले अशी  मान्यता आहे.  त्यापैकी दहा अवतार सर्वांना माहित आहेत. या दहा अवतारांपैकी वराह,  नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध यांची स्वतंत्र मंदिरे पाहायला मिळतायत अथवा  सामान्यतः    विष्णू  मंदिरातील भिंतींवर, विविध लेण्यांमध्ये या दहा अवतारांचे शिल्प  आढळतात. परंतु दहाही अवतारांचे एकत्रित मंदिर आढळत नाही.  असे दहाही अवतारांचे "दशावतार मंदिर ",  अमरावती (महाराष्ट्र ) येथील भाजीबाजार भागात आहे. 
या मंदिरातील दशावतार शिल्पांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. .. . . . . . 
दशावतार मंदिर हे भाजीबाजार भागातील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात एका भिंतीलगत, रांगेत सर्व अवतारांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीवर त्या-त्या अवताराचे नाव सुद्धा लिहिलेले आढळते. 
या मूर्तिक्रमात पहिली मूर्ती आहे शेषशायी भगवान विष्णूंची

सर्व चराचर आणि अवतार याच आदी नारायणापासून उत्पन्न झाले हे दाखवण्यासाठी हि मूर्ती प्रथम क्रमांकावर आहे. मूर्ती साधारण २ फूट रुंदीची असून, सात फण्यांच्या शेष शय्येवर चतुर्भुज नारायण पहुडलेले आहेत.नारायणाच्या  तीन हातात कमळ , गदा  व चक्र असून चौथा हात डोक्याखाली धरला आहे. नाभीकमळावर ब्रह्मदेव दाखवलेले असून पायाशी लक्ष्मी आहे. मूर्तीच्या मागच्या प्रभावळीवर वरच्या थरात दहाही अवतार क्रमाने दाखवले आहेत. त्याखालच्या थरात दहा दिक्पाल (इंद्र,अग्नी,यम,नैऋती,वरुण , वायू, कुबेर आणि ईश) आहेत. 

१. मत्स्य अवतार: भगवंताचा प्रथम व जलचर अवतार म्हणजे मत्स्य अवतार.  समुद्राच्या लाटांवर मत्स्य भगवंताला दाखवण्यात आले आहे.

२. कूर्म अवतार: भगवंताचा उभयचर अवतार म्हणजे कूर्म अवतार. 


या दोनीही मूर्तींचे वेगळे पण म्हणजे, साधारणतः मत्स्य आणि कूर्म अवतारात अर्धा भाग प्राणी आणि अर्धा भाग भगवंत असा दाखवतात. परंतु येथे अवतार मूळ प्राणिरूपात दाखवले आहेत. 

३. वराह अवतार: मूर्ती साधारण दोन ते अडीच फूट असून. भगवान वराह स्थानक स्वरूपात, चतुर्भुज आहेत. प्रदक्षिणा क्रमाने गदा, चक्र, शंख आणि पद्म धारण केले असून, डाव्या वरच्या हाताच्या कोपरावर भूदेवीला धारण केले आहे. डावा पाय मनुष्यरुपी शेषावर ठेवला आहे. 
४. नरसिंह अवतार: मूर्ती साधारण  दोन ते अडीच फूट उंचीची आहे. मूर्ती व्दिभुज स्वरूपाची आहे. नरसिंहाची  मूर्ती साधारणतः हिरण्यकशिपू विदारक किंवा चतुर्भुज स्वरूपाच्या आढळतात. परंतु विदर्भ भागात व्दिभुज नरसिंहाच्या भरपूर मूर्ती आढळतात. नरसिंहाच्या उजव्या हातात भूमी स्पर्शित चक्र असून डावा  हात मांडीवर ठेवला आहे. प्रभावळीवर प्रल्हाद व माता कयाधू नमस्कार मुद्रेत उभे आहेत. 

५ . वामन अवतार:  भगवंताचा हा अवतार बटू रूपात दाखवतात.  वामनाच्या एका हाती माळ आणि दुसऱ्या हातात छत्र धारण केलं आहे. 

६, ७. परशुराम आणि राम अवतार: भगवंताच्या पूर्ण अवतारांची सुरुवात परशुराम अवतारापासून होते.
परंतु या मंदिरात परशुरामाची स्वतंत्र मूर्ती नाही. परशुराम आणि अयोध्यापती राम यांच्या एकत्रित मूर्ती येथे दाखवल्या आहेत.
ही  मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातात चक्र (अस्पष्ट) धारण केलं  आहे, तर खालच्या उजव्या हातात बाण आणि डाव्या हातात धनुष्य
८. हलधर अवतार :  भगवंताचा आठवा अवतार म्हणजे हलधर भगवान. पुराणांनुसार  भगवान श्रीकृष्ण हा आठवा अवतार मानतात. परंतु अवतार मालिकेत आणि मूर्तिशास्त्रात हलधर हा अवतार मानतात. हलधर म्हणजे पुराणांमध्ये वर्णित बलराम अवतार.
हलधर मूर्ती साधारण दोन ते अडीच फूट उंचीची असून व्दिभुज स्वरूपात आहे. हलधराच्या उजव्या हातात हल (नांगर) असून डाव्या हातात फळ धारण केलं आहे. मूर्तीच्या पायाशी परिवार देवता अंकित आहे.
९. बुद्ध अवतार: भगवंताचा ज्ञानब्रह्म अवतार म्हणजे भगवान बुद्ध. तपश्चर्येत मग्न अशा स्वरूपात हा अवतार दाखवला जातो.
१०. कल्की अवतार: भगवंताचा भविष्यातील अवतार म्हणजे कल्की अवतार. या अवताराच्या मूर्ती घोड्यावर बसलेल्या आणि हाती तलवार घेतलेल्या रूपात दाखवतात. 


मंदिरातील आवारात असलेल्या दशावतार प्रतिमा
भगवंताचे हे सर्व अवतार मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्थांचे रूपक आहेत. पाण्यात निर्माण झालेल्या जीवापासून ते ज्ञान संपन्न अशा मानवीय अवस्था या दशावतार  शिल्पांतून प्रगट  होतात. 
आजही या दशावताराचा मानवीय जीवनावर, विचारांवर प्रचंड पगडा आहे. पुराणांतून, साहित्यातून आणि लोक कथांमधून या दशावतारांचा असुरी वृत्तीवर मिळवलेल्या विजयाच्या कथा आढळून येतात. हे दहाही अवतार चटकन लक्षांतराहावे म्हणून साहित्यिक पुढील श्लोक प्रस्तुत करतो:
"वेदानुद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्बिभ्रते। दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते। 
पौलस्त्यं जयते हलं कुलयते कारुण्यमातन्वते।म्लेच्छान् मूर्च्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः।।" 

भावंताच्या अशा स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या , भाजीबाजार, अमरावती येथील मंदिराला आवर्जून भेट द्यावी आणि मानव उत्कांतीचा वैज्ञानिक अविष्कार अनुभवावा हीच सदिच्छा.....