जगद्वन्द्यमेकं पराकारमेकं गुणानां परं कारणं निर्विकल्पम् ।
जगत्पालकं हारकं तारकं तं मयूरेशवंद्यं नताः स्मो नताः स्मः ॥
'गणनाम त्वां गणपतिं ' असं ज्याचं वर्णन करतात, जो बुद्धीदाता आहे अशा गणेशाला आपण सर्व भाद्रपदात घरोघरी प्रतिष्ठापित करून त्याचं पूजन करतो. चराचरातील अमूर्त आणि अनंत रुपाला गुणातीत स्वरूपात साकारणे म्हणजेच त्या देवतेची मूर्ती घडवून त्याचे पूजन करणे.
विनायकाची असंख्य रूपे मूर्त रूपात आपल्या समोर येतात. त्यातीलच काही रूपांचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न .
मार्कंडा येथील चतुर्भुज विनायक. या विनायकाचे स्वतंत्र मंदिर आहे. सुखासनात असल्येल्या मूर्तीच्या उजवा पाय उंदीरावर ठेवलेला आहे.
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण विलम्बितसूत्र ।वामनरूप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पाद नमस्ते ॥
मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरातील, ललितासनात बसलेल्या या चतुर्भुज गणपतीच्या मूर्तीच्या हातात दात, परशु, आणि मोदक वाटी आहे. पोटावर नागपाश स्पष्ट दिसत आहे. गणपतीचे वाहन असलेले मूषकराज आसन पिठावर अंकित केले आहेत.
पवनी (जिल्हा भंडारा ) येथील स्तंभावरील ललितासनातील एकदंताची विलोभनीय मुद्रा...
लासूर (जिल्हा अमरावती ) येथील सभामंडपाच्या स्तंभावरील शूर्पकर्ण गणेशाची, अर्धापर्यंकसनातील ही मूर्ती द्विभुज असून एका हातात दात असून दुसऱ्या हातात लाडवांची वाटी घेतली आहे. द्विभुज गणेशाची मूर्ती तशी दुर्मिळ.
मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरातील ही गणेश मूर्ती समपद स्थानक रूपातील आहे. चतुर्भुज गणेशाच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने तुटलेला दात, परशु, पाश आणि मोदकपात्र आहे. शरीरावर विविध अलंकार आणि पोटावरील नागबंध स्पष्ट दिसतात. गणेशाची आसन मूर्ती सहसा सर्वत्र आढळतात, परंतु स्थानक मूर्ती सहसा आढळत नाही.
पवनी (जिल्हा भंडारा ) येथील सर्वतोभद्र गणपती. हा गणपती पंचमुखी गणपती म्हणून सुद्धा ओळखतात. ही गणेशशिळा असून त्यावर चारही बाजूंनी गणपती असतात, ह्या शिळा वाकाटक कालीन असतात.
शिव परिवारातील गणपती, नागपूर येथील महादेव मंदिरावरील शंकराच्या मांडीवर बसलेला गणपती आणि पार्वती . हे पेशवे कालीन मंदिर असून मंदिरावर बऱ्याच देवी-देवतांचे अंकन केलेले आहे.
औंढा नागनाथ (जिल्हा परभणी) येथील मातृका पटावरील गणेश.
बऱ्याच मंदिरातून आढळून येणारी गर्भगृहाच्या द्वारावरील गणेशपट्टी. प्रथम गणेशाचे स्मरण आणि दर्शन व्हावे या उद्देशाने या गणेशपट्टीका बसवल्या जातात.
गणेशाचं विलोभनीय रूप म्हणजे नृत्यगणेश. कलाप्रिय गणपतीचं हे कलात्मक रूप चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावी असलेल्या महादेव मंदिरावरील बाह्य भिंतीवर अंकित आहे. चतुर्भुज विनायकाच्या खालील उजव्या हातात पाश असून, वरील दोन्ही हातात नाग पकडलेला आहे, तर खालील डाव्या हाती मोदक असून सोंड त्या दिशेने वाळवलेली आहे (सोंड भग्न आहे).
एकदन्तं प्रलम्बोष्ठं नागयज्ञोपवीतिनम् । त्र्यक्षं गजमुखं कृष्णं सुकृतं रक्तवाससम् ॥
नृत्यगणेशाची ही सुंदर मूर्ती आहे मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर. अष्टभुज गणेशाच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने भग्न दांत, परशु धारण केला असून, त्यावरील हात नृत्य मुद्रेत आहे. वरच्या दोन्ही हातात नाग धारण केला आहे. डाव्या वरच्या हातात कमलपुष्प असून दुसऱ्या हाती मोदकपात्र धारण केले आहे. खालचा हात नृत्य मुद्रा दर्शवतो. गणेशाची सोंड मोदकपात्राकडे वाळलेली आहे. गणपतीच्या सर्वांगावर सुंदर अलंकार आहेत. गणेशाची नृत्यमग्नता कलाकाराने सुंदरपणे साकारली आहे. किंचित वर उचललेला पाय नृत्यातील कलात्मकता स्पष्ट करतो. गणेशाच्या बाजूनी वाद्य वाजवणारे सेवक असून मूर्तिपीठावर मूषक अंकित केले आहेत.
अशा या आशापूरक गणेशाचे स्मरण करून सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना करूयात . . . . .
विनायक नमस्तेऽस्तु नमस्ते भक्तवत्सल ।
भक्तप्रियाय शान्ताय महातेजस्विने नमः ॥










