तव कर-कमल-वरे नखम् अद्भुत शृंगम्
दलित-हिरण्यकशिपु-तनु-भृंगम्
केशव धृत-नरहरि रूप जय जगदीश हरे
वैशाख शुद्ध ६ ते वैशाख शुद्ध १४ हा नृसिंह नवरात्रीचा काळ. वैशाख शुद्ध १४ ला नृसिंह भगवंताचा प्रगट दिन अर्थात नृसिंह जयंती . नृसिंहाचा आविर्भाव कसा झाला हे कथानक तर आपल्याला माहीतच आहे. 'प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनी प्रगटले'ला भगवंत मुळात कोठे अवतरित झाला? या पृथ्वीवरील असे कोणते स्थान आहे जेथे भगवंत आणि हिरण्यकशिपूचे युद्ध झाले? प्रल्हादाला भगवंताने कोठे दर्शन दिले? या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे ' मूलस्थान'.
झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांच्या संपन्न प्रदेशातील हा परिसर पुराणकाळात काश्यपपुर म्हणून ओळखला जात असे. याच काश्यपपुरला दानवराज हिरण्यकशिपूची राजधानी. (त्र्यंबक बल्लाळ कृत पयोष्णी माहात्म्यात याला महोदपूर म्हटले आहे.) याच काश्यपपुरीच्या राजवाड्यात बाळ प्रल्हाद, पिता हिरण्यकशिपू व माता कयाधूसोबत राहत असे. पुत्र विष्णू भक्त तर पिता परम विष्णू शत्रू. हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष याला विष्णूने वराह अवतार धारण करून मारले. यामुळे हिरण्यकशिपू विष्णूला शत्रू मानू लागला. तर इकडे पुत्र परम भागवत म्हणून जन्माला आला. आपल्या पुत्राला हिरण्यकशिपूने अनेक प्रकारे समजावले, दंडाचा वापर केला परंतु प्रल्हादाची विष्णूभक्ती वाढतंच चालली. शेवटी पित्याने चिडून विचारले कुठे आहे तुझा देव? आहे का या स्तंभामध्ये? सर्व चराचरामध्ये व्यापून असलेला देव स्तंभात सुद्धा आहे असे म्हणताच हिरण्यकशिपूने स्तंभावर जोरात प्रहार केला. त्याच क्षणी स्तंभातून भगवंत नरसिंह रूपात प्रगत झाले. नरसिंहाने उग्र असे रूप धारण केले होते. भगवान नरसिंह व हिरण्यकशिपूचे भयंकर युद्ध झाले. या प्रसंगाचे वर्णन करतांना नरहरी कवी आपल्या आरतीत म्हणतात " थरथरती त्या जटा जिव्हा लळलळीत । तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत ।" . अशा उग्र स्वरूपाने दैत्याचा नाश करणारे स्वरूप प्रगटले ते या मूलस्थानी.
उग्र रुपाला शांत करणे आवश्यक होते परंतु भगवंतासमोर जाण्याची कोणाचीही हिंमत होईना. तेव्हा बालक प्रल्हाद पुढे झाला व भावंताची स्तुती केली. बाल भक्ताच्या या प्रेमळ आर्जवाने नरसिंहाने सौम्य रूप धारण केले. प्रल्हादाला जवळ घेऊन अनेक आशीर्वाद दिले. या युद्धात भगवंतांच्या अंगावर सुद्धा अनेक जखमा झाल्या. या परिसरातील माती औषधी गुणांची असल्यामुळे देवाने आपल्या शरीरावर मातीचा लेप लावला. या संपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ, नृसिंह प्रगटले त्या स्तंभासह प्रल्हादाने भव्य असे मंदिर निर्माण केले. हा परिसर प्रल्हादपुरी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे द्वापारयुगात कृष्णपुत्र सांबाने आपल्या कुष्ठाच्या शमनार्थ याच नगरातील मातीचा उपयोग करत सूर्याची उपासना केली व सूर्यादित्य मंदिराची स्थापना केली. (या मंदिराबद्दल पुढे कधी.). या सर्व कथानक जेथे घडले, नृसिंहाचे प्रगटन क्षेत्र, परम भागवत प्रह्लादाची प्रल्हादपुरी असलेले हे मूलस्थान मात्र आज भारतात नाही. आज हा परिसर मूलस्थान चा अपभ्रंश होऊन मुलतान या नावाने ओळखला जातो. मुलतान हे पाकिस्तान मधील महत्वाचे शहर. या शहरातील प्रल्हादपुरी भागात नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात एक मधोमध दुभंगलेला खांब आहे. यातूनच भगवान नरसिंह प्रगटले अशी मान्यता आहे. आज घडीला हे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झालेले आहे मंदिरात प्रवेशबंदी सुद्धा आहे. परंतु मुलतान व प्रल्हादपुरी हि नवे या भागाच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत आजवर उभे आहेत. परिसरातील जी माती नृसिंहाने आपल्या जखमांवर लावली, सामने आपला कुष्ट जाऊन तेजस्वी शरीर होण्यासाठी वापरली तीच आज मुलतानी माती म्हणून ओळखली जाते.
असे हे परदेशात असलेले नृसिंहाचे मूलस्थान अर्थात मुलतान आपले श्रद्धास्थान...
या नंतर भगवान नरसिंहाने शरीर शुद्धीसाठी आणि विश्रांतीसाठी बरेच भ्रमण केले.. भगवंताचा हा प्रवास आपण पुढील भागांमध्ये पाहुयात.
भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥
तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥
एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥


