रविवार, २८ मार्च, २०२१

हुताशनी पौर्णिमा अर्थात होलिका पूजन : आनंद साऊरकर

आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होलिका पूजन उत्सव भारतीय कालगणनेतील फाल्गुन हा  शेवटचा महिना. या महिन्यातील शेवटचा मोठा सण  होळी. सर्वत्र उन्ह वाढलेले असतांना उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा हा सण. शिशिराची पानगळ थांबून  अशा वसंताच्या आगमनाची चाहूल  लागलेला हा सण. सर्वत्र झाडांवर नवीन पालवी फुटलेली, कोठे दूरवर भगव्या रंगात नखशिखान्त नटलेला पळस तर कोठे टपोऱ्या फुलांनी बहरलेला निष्पर्ण शाल्मली. अशा काहीश्या उष्ण परंतु आल्हादायक वातावरणात सर्वांना वेध लागतात  ते ह्या फाल्गुन पौर्णिमेचे. सरत्या संवत्सरातील वाईटाला जाळून , मागे सारून नवीन संवत्सराच्या बहुरंगी स्वागताला सज्ज असणारा हा सण . का साजरा करतात हा सण? या सणाची प्राचीनता काय? कसा साजरा होतो हा उत्सव? हे सर्व जाणून घेण्याचा हा अल्पप्रयत्न. (AVS)

फाल्गुन पौर्णिमेला होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा या नावाने ओळखतात. हुताशनीचा प्राचीन संदर्भ आपल्याला थेट शिवकथेकडे घेऊन जातो. असे म्हणतात देवी सतीच्या अग्नी प्रवेशानंतर महादेव विरक्त होऊन तपाचरणासाठी हिमालयावर निघून जातात. तर माता सती पार्वती रूपात हिमवान  व मेनका यांचे पोटी जन्म घेते. त्याच वेळेस सर्वत्र तारकासुर या राक्षसाने त्राही त्राही केलेले असते आणि त्याचा वध  शिवपुत्राच्या हातून होईल असा त्याला वर असतो. माता पार्वती सुस्वरूप झाल्यावर, महादेवाने योग समाधीतून बाहेर यावे व शिव- पार्वती विवाह व्हावा या हेतूने कामदेवाला हिमालयावर पाठवतात. कामदेव पत्नी रती व सोबती वसंत यांच्या साह्याने समस्त हिमालय पुष्प, लता, वृक्षांनी शृंगारतात. इकडे कामदेव आपल्या पुष्पबाणानी महादेवांच्या हृदयाचा ठाव घेऊन त्यांना योगसमाधितून जागे करतात. परंतु या कृत्यासाठी कामदेवाला महादेवांच्या क्रोधाला सामोरे जावे लागते. महादेवांच्या तृतीय नेत्रातील अग्नीने कामदेव भस्म होतात. आनंदले शिवगण, भूतगन मोठमोठ्याने जल्लोष करतात बोंबा मारतात. या घटनेचे सुंदर वर्णन श्रीधर कवीने आपल्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडावरील प्राकृत ग्रंथ शिवलीलामृत यात पुढील प्रमाणे केलेले आहे. (AVS)

शिवे उघडिले नयन  । तो पुढे देखिला मीनकेतन । म्हणे माझ्या तपासी केले विघ्न । मग भाललोचन उघडिला ॥

निघाला प्रळयवैश्वानर । भस्म केला कुसुमशर । फाल्गुनी पौर्णिमा साचार । काम जाळिला ते दिनी ॥

शिवदूत भूतगण । महाशब्दे हाक देऊन । स्मरगृहशब्द उच्चारून । नानापरी उपहासिती ॥

शिवाची आज्ञा तैपासून । फाल्गुनमासी हुताशनी करून । जो हे व्रत न पाळी पूर्ण । अवदसा जाण त्या बाधी ॥"

(संदर्भ : ओवी  क्र. १२२, १२३, १२४, १२५, अध्याय १३, श्रीधरकवी कृत शिवलीलामृत)

  याच घटनेचे स्मरण म्हणून हुताशनी पौर्णिमा साजरी होते. साक्षात महादेवांनी हे व्रत करण्यास सांगितले इतका प्राचीन संदर्भ आपल्याला हुताशनी पौर्णिमेबद्दल मिळतो. दुसरी कथा होलिका ( ढुंढाराक्षसी) आणि भक्त प्रल्हाद यांची. हि कथा तर आपल्याला अगदी लहानपणा पासून माहिती आहे. हुताशनी प्रमाणेच होलिका दहनाला प्राचीन आणि पौराणिक संदर्भ आहेच. दोन्ही कथांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्ही ठिकाणी वाईटचे दहनच  केले आहे. महादेवांनी कामदेवाचे केलेले दहन म्हणजे काम, मोह, लोभ या वृत्तींचे केलेले दहन तर होलिका दहन म्हणजे अहंकार, अभक्ति या वृत्तीचा नायनाट. हाच बोध घेऊन नूतन संवत्सराला सामोरे जाणे हाच या सणाचा उद्धेश. (AVS) 

कशी साजरी करावी होळी?

विभिन्न भागात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. महाराष्ट्रात सर्वसाधारण होळी कशी साजरी होते अथवा करावी हे पाहू.  होळी उभारण्याची जागा प्रथम शेणाने सारवून घेतात. ता जागेवर दोन छोटे खड्डे करून त्यात पैसे व सुपारी घालून भूमीची पूजा करतात. प्रत्येक खड्यामध्ये एक एक एरंडीच्या झुडपाच्या फांद्या खोचतात. यातील एका फांदीभोवती गाईच्या शेणाच्या ९ तर दुसऱ्या फांदीभोवती ५ गोवऱ्या (शेणी) रचतात. या वेळेस पूर्ण गोवारी वापरतात.(इतर कोणत्याही शुभकार्यात पूर्ण गोवरी (शेणी) न वापरता तिला तोडून वापरण्याची पद्धत आहे.) या उभारलेल्या होळीच्या मध्यभागी कापूर वड्या ठेवतात. होळीला हार, फुले, गाठीची माळ, गाईच्या शेणापासून बनवलेल्या चिकोल्यांची माळ, शेणाचा नारळ होळीला अर्पण करतात. होळी भोवती सुंदर रांगोळी काढतात. त्यानंतर होळीतील कपूर पेटवून होळीची पूजा करतात. होळीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही ठिकाणी गुळाच्या पाकापासून बनवलेले विंचू इत्यादी प्राणी होलिकेला अर्पण करतात. हे प्रतीकात्मक अर्पण विंचवादी  प्राण्यांपासून रक्षण कर अशी प्रार्थना आहे. या नंतर उलटा  हात किंवा मूठ तोंडावर ठेऊन आवाज काढत किंवा बोंब मारत होळीभोवती प्रदक्षिणा करतात. (इतरवेळेस अशा बोंबा मारू नये म्हणतात). या प्रकारे होळी हा सण  साजरा  होतो. (AVS)

आजकाल होळी म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास , वृक्षतोड, वायूप्रदूषण असा कांगावा करतात. परंतु मुळात आपल्या पूर्वजांनी काय सांगितले? आणि त्याचा उद्देश्य काय? हे कोणी जाणूनच घेत नाही आणि लोक वागतात तसे वागतात. मुळात होळीमध्ये कुठेही लाकूड, कचरा, झाडांच्या  फांद्या असले प्रकार जाळण्याची पद्धत नाही. त्यामुळे होळी हे काही पर्यावरण विरोधी कृत्य नाही. उलट गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, तूप कपूर, होळीला  वाहिलेले बेल, तुळस आणि एरंडीच्या केवळ दोनच फांद्या एवढेच जाळण्याची मुभा आहे आणि यापासून निघणारा धूर अर्थात पर्यावरणपूरकच असणार आहे.  आपल्या पूर्वजांनी मुळात काय सांगितले याचा सर्वांनी अह्यास करून त्या प्रमाणे जर सण  साजरे केले तर निश्चितच मानवजातील आणि पर्यायाने पर्यावरणाला फायदाच होईल. पुढील होळीला या सर्व गोष्टींचा विचारकरून होळी पेटवुया पर्यावरणाचा ऱ्हास रोखूया आणि मदनदहन, होलिका दहनातून काम, क्रोध, लोभ, अहंकार, अश्रद्धा इत्यादी विकारांवर मात करण्याचा प्रयत्न करूयात.(AVS) 

" आयुर्  देही यशो देही शिशूनाम कुरु रक्षणम । शत्रवश्च क्षयं यांतु होलिके पूजिता मया ।।

होलिकेच नमस्तुभ्यं ढुंढादेवी विमर्दिनी । सर्वोपद्रव नाशार्थ प्रणमामी नमोस्तुते ।। "

आपणासर्वांना होलिका व धूलिवंदन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा .....