।। आपणा सर्व रसिक वाचकांना भारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।। आनंद साऊरकर
आज भारतीय जनमानसाच्या सन्मानाचा आणि उत्साहाचा दिवस. नववर्षाचा आरंभ दिवस, युगाब्ध. कलियुगाची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून सुरु झाली अशी मान्यता आहे.
सध्या आपण ज्या कलियुगात नांदत आहोत त्या युगाचा काळ हा सहा शककर्त्यांचा काळ (Era )मनाला जातो. शककर्ते राजे हे अत्यंत शुरवान , समृद्ध, तेजस्वी , प्रजाहितदक्ष आणि प्रजेने अत्यंत आत्मीयतेने गौरविलेले, पुजलेले असतात. भारतात असंख्य राज्यकर्ते होऊन गेले आणि होतीलही परंतु ज्यांच्या गुणविशेषणांनी ते शककर्त्ये झाले केवळ सहाचं. म्हणजेच १ कलियुग = ६ शककर्ते.
पुराणांनुसार कलियुगाचा आरंभ महाभारताच्या यद्धानंतर, युधिष्ठिराच्या राज्यारोहणापासून झाला. त्यामुळे युधिष्ठिर हा पहिला शककर्ता राजा. याचा शक चालला ३०४४ वर्षे. म्हणजे आज पासून युधिष्ठिराचा ५१२६ शक सुरु झाला आहे. त्यानंतर दुसरा शक सुरु झाला तो उज्जयनीच्या विक्रमादित्याचा, त्याचा शक चालला १३५ वर्षे. त्यानंतर शककर्ता झाला पैठणचा राजा शालिवाहन, याचा शक चालणार अठरा हजार वर्षे!!!(यापैकी केवळ १९४६ वर्षेच संपली आहेत!!). शालिवाहन शक समाप्तीनंतर अजून तीन शककर्ते राजे होतील. आणि त्यानंतर कलियुगाच्या समाप्तीचे पर्व सुरु होईल .
अशा समृद्ध कालगणना लाभलेल्या भारतवर्षात विविध धर्माचे आणि पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतांना दिसतात. विविध धार्मिक मान्यतांनुसार, भारतात अनेक नववर्ष साजरे होतांना दिसतात, त्यात प्रामुख्याने इंग्रजी (New Year ), भारतीय वर्षारंभ (यात अनेक वर्षांरंभ आहेत), मुस्लिम हिजरी नववर्ष, पारशी बांधवांचे नवरोज, जैन बांधवांचे वीर निर्वाण संवत यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
नववर्ष विशेष लेखमालेच्या पुढील भागापासून व्यवहारात नित्य उपयोगात येणाऱ्या संवत्सरांचा तसेच भारतीय कालमानांचा आढावा घेऊयात....
चैत्र प्रतिपदेपासून (म्हणजेच गुढीपाडव्यापासून ), देवीच्या चैत्री नवरात्राला, आणि श्रीराम नवरात्राला प्रारंभ होतो. याच नवरात्राला वासंतिक नवरात्र सुद्धा संबोधतात. चैत्री नवरात्राच्या पावन पर्वावर आई जगदंबा आणि सीतापती राम आपणास शुभाशीर्वाद देवोत हीच शुभेच्छा .......