रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : सातवी माळ : कालरात्री

श्री जगदंबेचे सातवे रूप आहे ... "" कालरात्री""...


एकवेणीजपाकर्णपुरानना खरास्थिता ।
लम्बोष्ठीकर्णिकाकर्णीतैलाभ्यङ्गशरीरिणी ॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा ।
वर्धनामूर्धजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ॥

या देवीचा वर्ण गहन अंधकाराप्रमाने काळा आहे. गळ्यात तळपत्या विजेप्रमाणे चमकणारी माळ धारण केली आहे. देवी त्रिनायना आहेत. चतुर्भुजा देवीचे हे स्वरूप गदर्भ वाहन असलेले आहे. देवीचा उजवा हात अभय व वरद मुद्रेत असून डाव्या हातात लोह कंटक आणि खड्ग धारण केले आहे..
देवीचे स्वरूप अत्यंत भयंकर असले तरी देवी अभयंकरी आणि शुभंकर आहे..

या नवरात्रीच्या पर्वावर जीवनात येणाऱ्या रोग, निराशा आदी दैत्यांवर भयंकर ठरणारी देवी, आपल्याला शुभंकर फळ देवो हीच प्रार्थना...

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

खंडोबा (मल्हारी मार्तंड )भजन ... आनंद साऊरकर

आज मार्गशीर्ष शु. षष्ठी अर्थात चंपाषष्ठी, जेजुरी निवासी मल्हारी मार्तंड देवाचा उत्सव. त्यानिमित्ताने खंडोबा चरणी पुढील भजन समर्पित....

जय देवा मल्हारी| तुझी सोन्याची जेजुरी|
अर्धांगी म्हाळसा ही| दिसे सुंदर साजिरी|जय देवा मल्हारी
खंडा तो हातीधरी| मारी दानव सेना|
मस्तकी शुभ्र चंद्र| वाटे प्रसन्न मना||जय देवा मल्हारी
सात कोट नगरीला| वसे पर्वतावरी|
माजला मणी मल्ल| त्यासी समूळ संहारी|जय देवा मल्हारी
रूप तुझे वर्णू किती| घाली चंपक माला|
दवण्याचा साज तुज| बाणाईच्या ईश्वरा| जय देवा मल्हारी
गाती तुझे गुणगान| वाघ्या - मुरळीची सेना|
मिलिंदाग्राज म्हणे| लाभो आनंद मना|| जय देवा मल्हारी..

                                मार्गशीर्ष शु. षष्ठी, शके १९४६
                                नागपूर.

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

कालगणना.....

।। आपणा सर्व रसिक वाचकांना भारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।। आनंद साऊरकर
   आज भारतीय जनमानसाच्या सन्मानाचा आणि उत्साहाचा दिवस. नववर्षाचा  आरंभ   दिवस, युगाब्ध. कलियुगाची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून सुरु झाली अशी मान्यता आहे. 
सध्या आपण ज्या कलियुगात नांदत आहोत त्या युगाचा काळ हा सहा शककर्त्यांचा  काळ (Era )मनाला जातो. शककर्ते राजे हे अत्यंत शुरवान , समृद्ध, तेजस्वी , प्रजाहितदक्ष आणि प्रजेने अत्यंत आत्मीयतेने गौरविलेले, पुजलेले असतात. भारतात असंख्य राज्यकर्ते होऊन गेले आणि होतीलही परंतु ज्यांच्या गुणविशेषणांनी ते शककर्त्ये झाले केवळ सहाचं. म्हणजेच १ कलियुग = ६ शककर्ते. 
पुराणांनुसार कलियुगाचा आरंभ महाभारताच्या यद्धानंतर, युधिष्ठिराच्या राज्यारोहणापासून झाला. त्यामुळे युधिष्ठिर हा पहिला शककर्ता राजा. याचा शक चालला ३०४४ वर्षे. म्हणजे आज पासून  युधिष्ठिराचा ५१२६ शक सुरु झाला आहे. त्यानंतर दुसरा शक सुरु झाला तो उज्जयनीच्या विक्रमादित्याचा, त्याचा शक चालला १३५ वर्षे. त्यानंतर शककर्ता झाला पैठणचा राजा शालिवाहन, याचा शक चालणार अठरा हजार वर्षे!!!(यापैकी केवळ १९४६ वर्षेच संपली आहेत!!). शालिवाहन शक  समाप्तीनंतर अजून तीन शककर्ते राजे होतील. आणि त्यानंतर कलियुगाच्या समाप्तीचे पर्व सुरु होईल . 
अशा समृद्ध कालगणना लाभलेल्या भारतवर्षात विविध धर्माचे आणि पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतांना दिसतात. विविध धार्मिक मान्यतांनुसार, भारतात अनेक नववर्ष साजरे होतांना दिसतात, त्यात प्रामुख्याने इंग्रजी (New Year ), भारतीय वर्षारंभ (यात अनेक वर्षांरंभ आहेत), मुस्लिम हिजरी नववर्ष, पारशी  बांधवांचे नवरोज, जैन बांधवांचे  वीर निर्वाण संवत यांचा प्रामुख्याने  समावेश होतो. 

नववर्ष विशेष लेखमालेच्या पुढील भागापासून व्यवहारात नित्य  उपयोगात येणाऱ्या संवत्सरांचा तसेच भारतीय कालमानांचा आढावा घेऊयात.... 

चैत्र प्रतिपदेपासून (म्हणजेच गुढीपाडव्यापासून ), देवीच्या चैत्री नवरात्राला, आणि श्रीराम नवरात्राला प्रारंभ होतो. याच नवरात्राला वासंतिक नवरात्र सुद्धा संबोधतात. चैत्री नवरात्राच्या पावन पर्वावर आई जगदंबा आणि सीतापती राम आपणास शुभाशीर्वाद देवोत हीच शुभेच्छा .......  


शनिवार, १४ मे, २०२२

नृसिंह आरती


 नृसिंह आरती 

फोडोनि स्तंभ अवतार झाला नरशार्दूल देह धरिला

बाळ प्रह्वाद कारण तो झाला दैत्य सुदना नरहरी आला ।।१।।

जयदेव जयदेव जय नरहरी राया आरती ओवाळितो निवारी रे माया ।।धृ ।।

कोंदले अंबर प्रचंड ध्वनी उग्र गर्जना दैत्याच्या कानी

शंख चक्र गदा हाती धरोनि ऐसा नरहरी पहिला जनीं ।।२।।जयदेव०

गर्जोनि दैत्यांते आवाहन दिले धग धग धग धगीत रण चालिले

सायं संध्येसी दैत्या विदारिले नरसिंह देवे जण तारियेले ।।३।। जयदेव०

धरिला अवतार वैशाख मासीं भक्तवत्सला सौभाग्य देसी

ऐसी विनंती देवा तव पायी मिलिंदाग्रज आरती ओवाळि ।।४।।जयदेव०


मंगळवार, २५ मे, २०२१

'मूलस्थान'चा नरसिंह : आनंद साऊरकर

                                                                                                                                                 आंतरजालावरून )

तव कर-कमल-वरे नखम् अद्भुत शृंगम्

दलित-हिरण्यकशिपु-तनु-भृंगम्

केशव धृत-नरहरि रूप जय जगदीश हरे

वैशाख शुद्ध ६ ते वैशाख शुद्ध १४ हा नृसिंह नवरात्रीचा काळ. वैशाख शुद्ध १४ ला नृसिंह भगवंताचा प्रगट दिन अर्थात नृसिंह जयंती . नृसिंहाचा आविर्भाव कसा झाला हे कथानक तर आपल्याला माहीतच आहे. 'प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनी प्रगटले'ला भगवंत मुळात कोठे अवतरित झाला? या पृथ्वीवरील असे कोणते स्थान आहे जेथे भगवंत  आणि हिरण्यकशिपूचे युद्ध झाले? प्रल्हादाला भगवंताने कोठे दर्शन दिले? या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे ' मूलस्थान'. 

झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांच्या संपन्न प्रदेशातील हा परिसर पुराणकाळात काश्यपपुर म्हणून ओळखला जात असे. याच काश्यपपुरला दानवराज हिरण्यकशिपूची राजधानी. (त्र्यंबक बल्लाळ कृत पयोष्णी माहात्म्यात याला महोदपूर म्हटले आहे.) याच काश्यपपुरीच्या राजवाड्यात बाळ प्रल्हाद, पिता हिरण्यकशिपू व माता कयाधूसोबत राहत असे. पुत्र विष्णू भक्त तर पिता परम विष्णू शत्रू. हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष याला विष्णूने वराह अवतार धारण करून मारले. यामुळे हिरण्यकशिपू विष्णूला शत्रू मानू लागला. तर इकडे पुत्र परम भागवत म्हणून जन्माला आला. आपल्या पुत्राला हिरण्यकशिपूने अनेक प्रकारे समजावले, दंडाचा वापर केला परंतु प्रल्हादाची विष्णूभक्ती वाढतंच  चालली. शेवटी पित्याने चिडून विचारले कुठे आहे तुझा देव? आहे का या स्तंभामध्ये? सर्व चराचरामध्ये व्यापून असलेला देव स्तंभात सुद्धा आहे असे म्हणताच हिरण्यकशिपूने स्तंभावर जोरात प्रहार केला. त्याच क्षणी स्तंभातून भगवंत नरसिंह रूपात प्रगत झाले. नरसिंहाने उग्र असे रूप धारण केले होते. भगवान नरसिंह व हिरण्यकशिपूचे भयंकर युद्ध झाले. या प्रसंगाचे वर्णन करतांना नरहरी कवी आपल्या आरतीत म्हणतात " थरथरती त्या जटा जिव्हा लळलळीत । तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत ।" . अशा उग्र स्वरूपाने दैत्याचा नाश करणारे स्वरूप प्रगटले ते या मूलस्थानी. 

उग्र रुपाला शांत करणे आवश्यक होते परंतु भगवंतासमोर जाण्याची कोणाचीही हिंमत होईना. तेव्हा बालक प्रल्हाद पुढे झाला व भावंताची स्तुती केली. बाल भक्ताच्या या प्रेमळ आर्जवाने नरसिंहाने सौम्य रूप धारण केले. प्रल्हादाला जवळ घेऊन अनेक आशीर्वाद दिले. या युद्धात भगवंतांच्या अंगावर सुद्धा अनेक जखमा झाल्या. या परिसरातील माती औषधी गुणांची असल्यामुळे देवाने आपल्या शरीरावर मातीचा लेप लावला. या संपूर्ण घटनेच्या स्मरणार्थ, नृसिंह प्रगटले त्या स्तंभासह प्रल्हादाने भव्य  असे मंदिर निर्माण केले. हा परिसर प्रल्हादपुरी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे द्वापारयुगात कृष्णपुत्र सांबाने आपल्या कुष्ठाच्या शमनार्थ याच नगरातील मातीचा उपयोग करत सूर्याची उपासना केली व सूर्यादित्य मंदिराची स्थापना केली. (या मंदिराबद्दल पुढे कधी.). या सर्व कथानक जेथे घडले, नृसिंहाचे प्रगटन क्षेत्र, परम भागवत प्रह्लादाची प्रल्हादपुरी असलेले हे मूलस्थान मात्र आज भारतात नाही. आज हा परिसर मूलस्थान चा अपभ्रंश होऊन मुलतान या नावाने ओळखला जातो. मुलतान हे पाकिस्तान मधील महत्वाचे शहर. या शहरातील प्रल्हादपुरी भागात नृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात एक मधोमध दुभंगलेला खांब आहे. यातूनच भगवान नरसिंह प्रगटले अशी मान्यता आहे. आज घडीला हे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झालेले आहे  मंदिरात प्रवेशबंदी सुद्धा आहे. परंतु मुलतान व प्रल्हादपुरी हि नवे या भागाच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत आजवर उभे आहेत. परिसरातील जी माती नृसिंहाने आपल्या जखमांवर लावली, सामने आपला कुष्ट जाऊन तेजस्वी शरीर होण्यासाठी वापरली तीच आज मुलतानी माती म्हणून ओळखली जाते. 

असे हे परदेशात असलेले नृसिंहाचे मूलस्थान अर्थात मुलतान आपले श्रद्धास्थान... 


                                                 (प्रल्हादपुरी मंदिर, मुलतान व नृसिंह  स्तंभ) (आंतरजालावरून)

या नंतर भगवान नरसिंहाने शरीर शुद्धीसाठी आणि विश्रांतीसाठी बरेच भ्रमण केले.. भगवंताचा हा प्रवास आपण पुढील भागांमध्ये पाहुयात. 

भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥

तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥

एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥

रविवार, २८ मार्च, २०२१

हुताशनी पौर्णिमा अर्थात होलिका पूजन : आनंद साऊरकर

आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होलिका पूजन उत्सव भारतीय कालगणनेतील फाल्गुन हा  शेवटचा महिना. या महिन्यातील शेवटचा मोठा सण  होळी. सर्वत्र उन्ह वाढलेले असतांना उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा हा सण. शिशिराची पानगळ थांबून  अशा वसंताच्या आगमनाची चाहूल  लागलेला हा सण. सर्वत्र झाडांवर नवीन पालवी फुटलेली, कोठे दूरवर भगव्या रंगात नखशिखान्त नटलेला पळस तर कोठे टपोऱ्या फुलांनी बहरलेला निष्पर्ण शाल्मली. अशा काहीश्या उष्ण परंतु आल्हादायक वातावरणात सर्वांना वेध लागतात  ते ह्या फाल्गुन पौर्णिमेचे. सरत्या संवत्सरातील वाईटाला जाळून , मागे सारून नवीन संवत्सराच्या बहुरंगी स्वागताला सज्ज असणारा हा सण . का साजरा करतात हा सण? या सणाची प्राचीनता काय? कसा साजरा होतो हा उत्सव? हे सर्व जाणून घेण्याचा हा अल्पप्रयत्न. (AVS)

फाल्गुन पौर्णिमेला होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा या नावाने ओळखतात. हुताशनीचा प्राचीन संदर्भ आपल्याला थेट शिवकथेकडे घेऊन जातो. असे म्हणतात देवी सतीच्या अग्नी प्रवेशानंतर महादेव विरक्त होऊन तपाचरणासाठी हिमालयावर निघून जातात. तर माता सती पार्वती रूपात हिमवान  व मेनका यांचे पोटी जन्म घेते. त्याच वेळेस सर्वत्र तारकासुर या राक्षसाने त्राही त्राही केलेले असते आणि त्याचा वध  शिवपुत्राच्या हातून होईल असा त्याला वर असतो. माता पार्वती सुस्वरूप झाल्यावर, महादेवाने योग समाधीतून बाहेर यावे व शिव- पार्वती विवाह व्हावा या हेतूने कामदेवाला हिमालयावर पाठवतात. कामदेव पत्नी रती व सोबती वसंत यांच्या साह्याने समस्त हिमालय पुष्प, लता, वृक्षांनी शृंगारतात. इकडे कामदेव आपल्या पुष्पबाणानी महादेवांच्या हृदयाचा ठाव घेऊन त्यांना योगसमाधितून जागे करतात. परंतु या कृत्यासाठी कामदेवाला महादेवांच्या क्रोधाला सामोरे जावे लागते. महादेवांच्या तृतीय नेत्रातील अग्नीने कामदेव भस्म होतात. आनंदले शिवगण, भूतगन मोठमोठ्याने जल्लोष करतात बोंबा मारतात. या घटनेचे सुंदर वर्णन श्रीधर कवीने आपल्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडावरील प्राकृत ग्रंथ शिवलीलामृत यात पुढील प्रमाणे केलेले आहे. (AVS)

शिवे उघडिले नयन  । तो पुढे देखिला मीनकेतन । म्हणे माझ्या तपासी केले विघ्न । मग भाललोचन उघडिला ॥

निघाला प्रळयवैश्वानर । भस्म केला कुसुमशर । फाल्गुनी पौर्णिमा साचार । काम जाळिला ते दिनी ॥

शिवदूत भूतगण । महाशब्दे हाक देऊन । स्मरगृहशब्द उच्चारून । नानापरी उपहासिती ॥

शिवाची आज्ञा तैपासून । फाल्गुनमासी हुताशनी करून । जो हे व्रत न पाळी पूर्ण । अवदसा जाण त्या बाधी ॥"

(संदर्भ : ओवी  क्र. १२२, १२३, १२४, १२५, अध्याय १३, श्रीधरकवी कृत शिवलीलामृत)

  याच घटनेचे स्मरण म्हणून हुताशनी पौर्णिमा साजरी होते. साक्षात महादेवांनी हे व्रत करण्यास सांगितले इतका प्राचीन संदर्भ आपल्याला हुताशनी पौर्णिमेबद्दल मिळतो. दुसरी कथा होलिका ( ढुंढाराक्षसी) आणि भक्त प्रल्हाद यांची. हि कथा तर आपल्याला अगदी लहानपणा पासून माहिती आहे. हुताशनी प्रमाणेच होलिका दहनाला प्राचीन आणि पौराणिक संदर्भ आहेच. दोन्ही कथांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्ही ठिकाणी वाईटचे दहनच  केले आहे. महादेवांनी कामदेवाचे केलेले दहन म्हणजे काम, मोह, लोभ या वृत्तींचे केलेले दहन तर होलिका दहन म्हणजे अहंकार, अभक्ति या वृत्तीचा नायनाट. हाच बोध घेऊन नूतन संवत्सराला सामोरे जाणे हाच या सणाचा उद्धेश. (AVS) 

कशी साजरी करावी होळी?

विभिन्न भागात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. महाराष्ट्रात सर्वसाधारण होळी कशी साजरी होते अथवा करावी हे पाहू.  होळी उभारण्याची जागा प्रथम शेणाने सारवून घेतात. ता जागेवर दोन छोटे खड्डे करून त्यात पैसे व सुपारी घालून भूमीची पूजा करतात. प्रत्येक खड्यामध्ये एक एक एरंडीच्या झुडपाच्या फांद्या खोचतात. यातील एका फांदीभोवती गाईच्या शेणाच्या ९ तर दुसऱ्या फांदीभोवती ५ गोवऱ्या (शेणी) रचतात. या वेळेस पूर्ण गोवारी वापरतात.(इतर कोणत्याही शुभकार्यात पूर्ण गोवरी (शेणी) न वापरता तिला तोडून वापरण्याची पद्धत आहे.) या उभारलेल्या होळीच्या मध्यभागी कापूर वड्या ठेवतात. होळीला हार, फुले, गाठीची माळ, गाईच्या शेणापासून बनवलेल्या चिकोल्यांची माळ, शेणाचा नारळ होळीला अर्पण करतात. होळी भोवती सुंदर रांगोळी काढतात. त्यानंतर होळीतील कपूर पेटवून होळीची पूजा करतात. होळीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही ठिकाणी गुळाच्या पाकापासून बनवलेले विंचू इत्यादी प्राणी होलिकेला अर्पण करतात. हे प्रतीकात्मक अर्पण विंचवादी  प्राण्यांपासून रक्षण कर अशी प्रार्थना आहे. या नंतर उलटा  हात किंवा मूठ तोंडावर ठेऊन आवाज काढत किंवा बोंब मारत होळीभोवती प्रदक्षिणा करतात. (इतरवेळेस अशा बोंबा मारू नये म्हणतात). या प्रकारे होळी हा सण  साजरा  होतो. (AVS)

आजकाल होळी म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास , वृक्षतोड, वायूप्रदूषण असा कांगावा करतात. परंतु मुळात आपल्या पूर्वजांनी काय सांगितले? आणि त्याचा उद्देश्य काय? हे कोणी जाणूनच घेत नाही आणि लोक वागतात तसे वागतात. मुळात होळीमध्ये कुठेही लाकूड, कचरा, झाडांच्या  फांद्या असले प्रकार जाळण्याची पद्धत नाही. त्यामुळे होळी हे काही पर्यावरण विरोधी कृत्य नाही. उलट गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, तूप कपूर, होळीला  वाहिलेले बेल, तुळस आणि एरंडीच्या केवळ दोनच फांद्या एवढेच जाळण्याची मुभा आहे आणि यापासून निघणारा धूर अर्थात पर्यावरणपूरकच असणार आहे.  आपल्या पूर्वजांनी मुळात काय सांगितले याचा सर्वांनी अह्यास करून त्या प्रमाणे जर सण  साजरे केले तर निश्चितच मानवजातील आणि पर्यायाने पर्यावरणाला फायदाच होईल. पुढील होळीला या सर्व गोष्टींचा विचारकरून होळी पेटवुया पर्यावरणाचा ऱ्हास रोखूया आणि मदनदहन, होलिका दहनातून काम, क्रोध, लोभ, अहंकार, अश्रद्धा इत्यादी विकारांवर मात करण्याचा प्रयत्न करूयात.(AVS) 

" आयुर्  देही यशो देही शिशूनाम कुरु रक्षणम । शत्रवश्च क्षयं यांतु होलिके पूजिता मया ।।

होलिकेच नमस्तुभ्यं ढुंढादेवी विमर्दिनी । सर्वोपद्रव नाशार्थ प्रणमामी नमोस्तुते ।। "

आपणासर्वांना होलिका व धूलिवंदन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा .....  

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

मातृकापूजन - कराष्टमी - आठवी पूजन : आनंद साऊरकर

मातृकापूजन - कराष्टमी - आठवी पूजन : आनंद साऊरकर 
या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता । 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
दिवाळीच्या आधी येणारा, देवीच्या भक्तीने ओतप्रोत भरलेला उत्सव म्हणजे कराष्टमी. आश्विन  कृष्ण अष्टमीला येणारा  हा सण कराष्टमी अथवा आठवी या नावाने ओळखला जातो. हा सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला  जातो . या  दिवशी मुख्यतः करे (म्हणजे मातीचे कुंभ)  याचे पूजन करतात.  अष्टमी या तिथीला कऱ्यांची पूजा करतात म्हणून कराष्टमी आणि स्थानिक भाषेत आठ या अर्थी आठवी. पूजेत रीतीप्रमाणे  आठ मातीचे  किंवा दोन  मातीचे आणि सहा तांबे, पितळ यांचे कुंभ वापरतात. एका कुंभावर  मातीची  पणती झाकण म्हणून ठेवतात तर  दुसऱ्या कुंभावर विड्याचे पान ठेवतात. 
तसे पहाता संपूर्ण अश्विन महिनाच मातृशक्तीच्या  पूजनाला समर्पित आहे. पहिले देवी नवरात्र, कोजागिरीला लक्ष्मी - इंद्र, वसुबारसेला गोमातेचे, अश्विन अमावास्येला लक्ष्मी -   कुबेर आणि आठवीला मातृका पूजन केल्या जाते. (avs)

आठवी पूजनाचे संग्रहित छायाचित्र 
आठवीला पुजल्या जाणाऱ्या मातृका कोणत्या आणि किती ?
मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामधील, रक्तबीज वध या अष्टमाध्यायात या मातृकांच्या उत्पत्तीचा उल्लेख आलेला आहे. शिव, ब्रह्मा, विष्णू, नरसिंह, वराह, कार्तिकेय आणि इंद्र या देवतांच्या शक्ती म्हणजे मातृका. सात देवतांच्या सात शक्ती म्हणून सप्त मातृका. शिव शक्ती माहेश्वरी, ब्रह्म शक्ती ब्राह्मणी, विष्णू शक्ती वैष्णवी, नरसिंहाची नरसिंही, वराहाची वाराही, कार्तिकेय अथवा कुमारची कौमारी आणि इंद्राची ऐन्द्री या त्या सप्तमातृका.(मातृकांवर अधिक माहिती नव्या blog मध्ये.) रूपाने आणि गुणाने तसेच शस्त्र शक्तीने आपल्या प्रागट्य देवतेसारख्याच. आठवी पूजनात या सात सप्त मातृका आणि आठवी आपल्या कुळाचे मातृवत पालन व रक्षण करणारी कुलस्वामिनी यांचा समावेश असतो.  कारण कुलस्वामिनी आपल्या कुळावर ममतेने प्रेम करते व वात्सल्याची तसेच रक्षणाची, कृपेची छाया धरते.(avs) 
आता प्रश्न हा की, या मातृका पूजनाचा आणि कुंभ पूजनाचा काय संबंध ? कोणतीही प्रतिमेचे पूजन न करता केवळ कुंभांचेच पूजन का करतात?
कारण, वैदिक काळापासून कुंभ हे मातृगर्भाशयाचे प्रतीक मानण्यात आले आहे.  कुंभाची ही प्रतिकात्मता विविध साहित्यातून आणि विधी विधानांतून दिसून येते. आपल्याकडील नवरात्रीतील घटस्थापना हि मातृदेवतेची कुंभ रूपात केलेली उपासनाच नाही का ? याच मातृरूप घटातून नवसृजनाचा सोहळा साजरा होतो. आणि यामुळेच या पूर्णकुंभाला किंवा पूर्णघटाला सर्जनता, समृद्धता, नवचेतनेचे प्रतीक मानल्या गेले ते त्याच्या मातृरूपामुळे. या वरून हे निश्चित कि कुम्भ हे  मातृगर्भाचे अर्थात मातृत्वाचे प्राचीन प्रतीक आहे. मातृत्व स्पष्ट करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी कुंभाशीवाय दुसऱ्या प्रतिमा दाखवणे व्यर्थ होईल म्हणून आठवीच्या मातृपूजनात कुंभांना स्थान आणि महत्व दिले आहे. (कुंभ या विषयावर आणखी माहिती दुसऱ्या blog मध्ये. )(avs) 
पूजेचे  स्वरूप : ही पूजा अष्टमीला सायंकाळी किंवा काही ठिकाणी सकाळी करतात. अंगणात किंवा घरात, पाटावर आठ कुंभ मांडून एका कुंभावर पणती झाकण ठेवतात आणि कुंभावरच लाल गंधाने चंद्र रेखाटतात. दुसऱ्या कुंभावर विड्याचे पान झाकण म्हणून ठेवतात आणि पानावर चंद्र रेखाटतात. या कुंभांवर ज्वारीचे पाच धांडे घर म्हणून खोपडी म्हणून लावतात. कुंभांना आठ पदराचं पोवतं वाहतात. देवीची षोडशोपचारे पूजा करतात. पुरण, आंबील, घाऱ्या कुळाचाराप्रमाणे सर्व जिन्नस करतात. नैवेद्यात विशेषतः साटोऱ्यांचा ( म्हणजे कणकेत गूळ घालून तळलेल्या पुऱ्या) यांचा समावेश असतो. बनवलेल्या आठ साटोऱ्यांचा देवीला वेगळा नैवेद्य दाखवतात तो देवीजवळ ठेवतात व दुसऱ्यादिवशी गाईला लावतात. बऱ्याच ठिकाणी कुळाचाराप्रमाणे काही प्रथा वेगवेगळ्या आहेत. परंतु मुख्य उद्देश मातृका पूजन हाच.(avs) 
कराष्टमीला पुजल्या जाणाऱ्या मातृका आणि कुलस्वामिनी आपल्या सर्वांवर मायेची सावली धरो हीच प्रार्थना... 

शनिवार, २५ जुलै, २०२०

चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

 चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

विश्वातील प्रत्येक जीव, चेतन- अचेतन आणि हे अवघे चराचर हे एकमेकांशी एका अदृश्य बंधनाने जोडलेले आहेत. हाच परस्पर संबंध वर्षानुवर्षे नानाविध माध्यमांतून आपण जपत आलोय. याच संबंधांना दृढ करण्याकरिता, परस्परांचा आदर करण्याकरिता, चराचरातील प्रत्येक घटकांचं पूजन करण्याची चीनच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत रूढ झाली. भारतीय संस्कृतीत चंद्र - सूर्य ते अगदी नदी, पर्वत, वृक्ष, प्राणी पक्षी यांची सुद्धा निरनिराळ्या सणांना पूजा  त्यांचा सन्मान केला जातो. याच पूजन शृंखलेतील सण "नागपंचमी".आनंद साऊरकर

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात. वातावरणाच्या अनुकूलतेमुळे या काळात नागांचा सर्वत्र वावर पाहायला मिळतो. आपल्यापासून निदान या काळात तरी  त्यांना त्रास होऊ नये म्हणून पूर्वजांनी त्यांचे पूजन याच महिन्यात करण्याची पद्धत प्रचारात आणली, किती हा पर्यावरणाचा आणि प्राणी जगताचा विचार !!!

महर्षी काश्यप यांच्या कद्रू नावाच्या पत्नीपासून या नागकुळाची उत्पत्ती झाली असे मानतात. पुरातन वाङ्मयात अनेक ठिकाणी नागांचा, नागकुलाचा उल्लेख आढळतो. कधी स्वतंत्र देवता म्हणून तर कधी मुख्यदेवतांच्या परिवारदेवता किंवा सेवक देवता म्हणून उल्लेख आढळतो. मूर्ती शास्त्राने  सुद्धा या देवतेची विशेष दखल  घेतली आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये द्वारपाल समूहात किंवा स्वतंत्रपणे नागांच्या प्रतिमा चितारलेल्या आढळतात. (avs

पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्वाचा असा घटक असलेला हा साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा गौरवला जातो. तर ग्रामीण स्त्रिया याला आपला बंधू मानतात. यामुळेच ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी वर्गात नाग पूजनाची प्रथा चालत आलेली आहे. नागपंचमीला निरनिराळ्या भागात वेग वेगळ्या पूजा पद्धती आढळून येतात. त्यातीलच प्राचीन अशी नागकुल पूजन काही ठिकाणी पाहायला मिळते.(avs

पुराणात नऊ नागकुळ प्रसिद्ध आहेत : 

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा

एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll

या मंत्रात अनंत, वासुकी इत्यादी नऊ नागकुळांचा उल्लेख आहे. पुराणात या सर्व नागांच्या विविध कथा आढळतात. काही ग्रंथांमध्ये हि नऊ नावे थोडीफार बदललेली आढळतात परंतु सर्वत्र नऊ कुळे आहेतच. ह्याच नऊ कुळांची पूजा नागपंचमीला करतात. आमच्याकडेही नागकुळं पूजन असते, त्याची हि थोडक्यात माहिती. 

नागाची प्रतिमा: भिंतीवर गेरूच्या साह्याने वर चौकोनी आणि त्याला लागूनच खाली गोलसर असा आकार काढून सारवून घेतात, ही  झाली नागांची बैठक. त्यानंतर आवं (न तापवलेले ) दूध आणि तूप यांचा मिश्रण बनवतात. काडीला कापूस गुंडाळून ह्या मिश्रणाच्या साह्याने वरील चौकोनी भागात नऊ नाग साधारण वीतभर लांबीचे, एका रांगेत थोडे अंतर ठेऊन  काढतात. त्यांच्या पोटात अर्थात दोन नागांच्या मध्ये एकूण पाच छोटे नाग काढतात, हे नागाची पिल्ले. खालच्या गोलभागात नऊ वेटोळे असलेली पद्मिणी  नागीण काढतात. तिच्या बाजूला तिच्या दासी सुद्धा रेखाटतात. (avs) 

(भिंतीवरील नाग प्रतिमा, फुलोरा आणि सर्वसाधारण नागकुळाचे रेखाटन)(avs

पूजन : नागांचे षोडोपचारे पूजन केल्या जाते. पूजनात सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र व पोवते मुख्यत्वे वापरतात. प्रत्येक नागाला आणि पद्मिणीला स्वतंत्र  सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र आणि नऊ पदराचे पोवते अर्पण करतात. तसेच पाच पदराचे पोवते नागबाळ यांना वाहतात. पद्मिणी नागिणीच्या ज्या दासी आहेत त्यांना पाच पदराचे पोवते, कपासवस्त्र अर्पण करतात. पूजनात  ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या फुलांचा वापर करतात. आघाडा, केना, बिल्वपत्र आणि फुले यांचा वापर करून माळ तयार केली जाते व नागकुळाला अर्पण केली जाते. आनंद साऊरकर

नैवेद्य: पाच प्रकारचे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा आणि तीळ हे भाजून घेऊन याच्या लाह्या तयार करतात. ह्या लाह्यांचा व फुटाणे याचा नैवेद्यात आवर्जून वापर करतात. नऊ पुरिका (रव्याच्या पापड्या), नऊ करंज्या, वेणी-फुगी यांचा फुलोरा नागकुळावर टांगतात. काहीठिकाणी वाफवलेले, तर कुठे तळलेले पदार्थ स्वयंपाकाला बनवतात. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि रव्याचा शिरा मुख्य असतो. तव्याचा वापर सुद्धा बरेच ठिकाणी करत नाहीत. नागकुळाला रव्याचे दोन लाडू बनवून त्याचा नैवैद्य घरी दाखवून ते वारुळावर अर्पण करतात. शेवटी नागाला विडा- सुपारी अर्पण करतात. कुठे नारळ अर्पण करून तो वारुळावर नेऊन वाढवतात. घरची पूजा आटोपल्यावर वारुळावर किंवा नागाच्या ठाण्यावर जाऊन पूजा करतात. आणि रव्याचे लाडू अर्पण करतात. घरी आल्यावर नागाला अर्पण केलेले दूध, ज्यांनी नाग काढले ते मिश्रण, भाजलेले पंच धान्य आणि फुटाणे एकत्र करून ते घरातील कानाकोपऱ्यात, अंगणात टाकतात. ज्ञात-अज्ञात सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना हा नैवेद्य.(avs 

आजच्या दिवशी माहेरवासिनी झाडाला झोपाळे बांधून झोके घेतात. नागाला भाऊ मानून त्याच्या स्तुतीचे गाणे गातात. या देवतेचे, मित्राचे आणि भावाचे उल्लेख पुराणात, लोककथांमध्ये आणि लोकगीतात आणि मूर्तिशास्त्रात  बरेच उल्लेख आलेले आहेत (या बद्दल स्वतंत्र ब्लॉग लिहेल).  लोककथेमध्ये जसा नाग सर्वांना पावला तसा  तुम्हा आम्हा पावो हीच प्रार्थना.  ( हा ब्लॉग नावासहित पुढे पाठवावा) 

मंगळवार, २१ जुलै, २०२०

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ : आनंद विजयराव साऊरकर

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ : आनंद विजयराव साऊरकर 
मानवाला अनादी काळापासून  घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं . यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात. 
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच. आनंद विजयराव साऊरकर 
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं  दीपपूजन
आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा  केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केल्या जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?आनंद विजयराव साऊरकर 
(जिवतीची सर्वत्र पूजा केल्याजाणारी प्रतिमा. अंतरजालावरून )

जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण , मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती(गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजल्या जाते. 
प्रथम भगवान नरसिंहचं  का?
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.  
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजल्या जातो. 
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  आणि कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. आनंद विजयराव साऊरकर 
नंतर येतात त्या जरा व जिवंतिका : या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या  कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. आनंद विजयराव साऊरकर 
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध - बृहस्पती.. 
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या  प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गन प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या , गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 
प्रथम रक्षक देवता, नंतर जन्माबालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. आनंद विजयराव साऊरकर 
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करून हा लेख प्रपंच थांबवतो...... 
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।  
  

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

नमस्कार त्या सूर्यनारायणासी....

आदि देव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर:।

दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तुते ।।

चराचराचे पोषण करणारा आणि सर्वदा दृश्यमान ईश्वर अर्थात भगवान सूर्य. आपल्या सहस्त्र किरणांनी सर्व जगताला नियंत्रित करणारा , पोषण करणारा आणि आशीर्वच देणारा भगवान सुरुवातीपासूनच मानव जातीला पूजनीय ठरला. पृथ्वीवरील सर्व संस्कृतींना या दृश्यमान देवाने वेड लावले आणि दैनिक उपासनेत, स्मरणात स्थान निर्माण केले. भारतीय महानुभावांनी तर या देवतेचा उदोउदोच केला व ज्योतिष्य, व्याकरण, वाङ्मय, गायन आणि काळ या सर्वांचा अधिष्ठाता या पदावर विराजमान देखील केले.  
भारतात आसेतुहिमाचल सूर्य पूजन अगदी पुराण  काळा  पासून ते आजतागत सुरूच आहे. कोठे ते मूर्ती पूजेच्या रूपाने असेल तर कुठे नजरेसमोर साक्षात दिसणाऱ्या रूपाने असेल. संध्यासमयी केलेले पूजन असेल अथवा स्त्रियांनी कल्पकतेने साकारलेल्या आदित्य राणूबाईच्या रूपाने केलेले वंदन असेल. या देवतेने अखिल चराचराला आपल्यासमोर नतमस्तक केले हे खरे. 
पुराण, वाङ्मय, लोककला, लोकगीते, लोककथा, यातून सूर्य देवतेचे गुणगान भरपूर प्रमाणांत आढळून येतेच. त्याचबरोबर शिल्पशास्त्रात सुद्धा या देवतेने मनाचे स्थान कमावले. 
सूर्यदेवतेच्या शिल्पांचा विशेषतः विदर्भात आढळणाऱ्या काही सूर्य प्रतिमांचा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच... 

( दृष्यमान स्वरूपात दिसणारा तेजस्वी देव जो चराचरावर आपल्या सहस्त्र रश्मीने मायेचे व पोषणाचे वस्त्र पांघरतो .)



( सात घोड्यांच्या रथावर उभी असलेली व्दिभुज सूर्य प्रतिमा. प्रतिमा सुंदर अलंकारांनी नटलेली आहे. दोन्हीही हातात कमल पुष्प धारण केलेले आहे. (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर) ) 
( एकचक्राच्या रथात बसून संपूर्ण ब्रह्माण्डाचे नियंत्रण करणारा आदित्य सोबत पांगुळा सारथी अरुण. पवनी,जिल्हा भंडारा येथील स्तंभावरील आहेत.)
(सूर्य प्रतिमा, नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती, खंडेश्वराच्या मुख्य मंदिराच्या एका गाभाऱ्यात हि प्रतिमा ठेवली आहे, मूर्तीची बरीच झिज झालेली आहे. )
( सप्तअश्वारुढ सूर्य देवाची हि अत्यंत रमणीय आणि वैशिष्ठ्यपूर्ण मूर्ती. या एकाच प्रतिमेत सूर्यदेवाला उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिदेवतांच्या रूपात पालनकर्ता या रूपात दाखवले आहे. या मूर्तीला ब्रह्मेशानजनार्दनार्क प्रतिमा म्हणतात अर्थात ब्रह्मा, विष्णू, ईशान (शिव) आणि अर्क (सूर्य) एकाच मूर्तीमध्ये विराजमान असतात. हि मूर्ती अष्टभुज असून माला, कमलपुष्प, अक्षसूत्र, चक्र, कमंडलू धारण केलेला आहे. दोन हात भग्न असून या हातात शंख व त्रिशूल असावा. सोबत रथाचा सारथी अरुण, पत्नी छाया, आणि इतर परिवार देवता आहेत. या मूर्तीचे आणखी एक विशेष म्हणजे मुर्तीकाराने सूर्याला पर्शियन पद्धतीचा boot घातलेला दिसतो.)

( पौष महिन्यात दार रविवारी महिला घरात देवाजवळ अथवा तुळशीजवळ रक्तचंदनाने अथवा रांगोळीने आदित्य व राणूबाई यांच्या प्रतिमा रेखाटतात. बोर, ऊस, वाटाणा, वाल, पेरू, गाजर, गव्हाची उम्बी, लाल फुल वाहून जगत्पालकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. )

( रथसप्तमीला घरोघरी पूजाला जाणारा एकचक्रधर देव अर्थात श्री सूर्यनारायण .)
देवादिदेव म्हणून पूजाला जाणारा भगवान तुम्हा आम्हां सर्वांना पावो व सर्वांवर कृपेचा वर्षाव करो हीच प्रार्थना. 

ॐ भास्कराय विद्महे । महाद्युतिकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात्॥