रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

मोदकप्रिय, मोददाता मयुरेशाची मंगल रूपे

 जगद्वन्द्यमेकं पराकारमेकं गुणानां परं कारणं निर्विकल्पम् ।
जगत्पालकं हारकं तारकं तं मयूरेशवंद्यं नताः स्मो नताः स्मः ॥

'गणनाम त्वां गणपतिं ' असं ज्याचं वर्णन करतात, जो बुद्धीदाता आहे अशा गणेशाला आपण सर्व भाद्रपदात घरोघरी प्रतिष्ठापित करून त्याचं पूजन करतो. चराचरातील अमूर्त आणि अनंत रुपाला गुणातीत स्वरूपात साकारणे म्हणजेच त्या देवतेची मूर्ती घडवून त्याचे पूजन करणे.

विनायकाची असंख्य रूपे मूर्त रूपात आपल्या समोर येतात. त्यातीलच काही रूपांचा आढावा घेण्याचा हा  प्रयत्न .

मार्कंडा येथील चतुर्भुज विनायक. या विनायकाचे स्वतंत्र मंदिर आहे. सुखासनात असल्येल्या मूर्तीच्या उजवा पाय उंदीरावर  ठेवलेला आहे. 
 मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण विलम्बितसूत्र ।वामनरूप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पाद नमस्ते ॥
मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरातील, ललितासनात बसलेल्या या चतुर्भुज गणपतीच्या मूर्तीच्या हातात दात, परशु, आणि मोदक वाटी आहे. पोटावर नागपाश स्पष्ट दिसत आहे. गणपतीचे वाहन असलेले मूषकराज आसन  पिठावर अंकित केले आहेत. 


पवनी (जिल्हा भंडारा ) येथील स्तंभावरील ललितासनातील एकदंताची विलोभनीय मुद्रा... 


लासूर (जिल्हा अमरावती ) येथील सभामंडपाच्या स्तंभावरील शूर्पकर्ण गणेशाची, अर्धापर्यंकसनातील ही  मूर्ती द्विभुज असून एका हातात दात असून दुसऱ्या हातात लाडवांची वाटी घेतली आहे. द्विभुज गणेशाची मूर्ती तशी दुर्मिळ. 

मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरातील ही गणेश मूर्ती समपद स्थानक रूपातील आहे. चतुर्भुज गणेशाच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने तुटलेला दात, परशु, पाश आणि मोदकपात्र आहे. शरीरावर विविध अलंकार आणि पोटावरील नागबंध स्पष्ट दिसतात. गणेशाची आसन मूर्ती सहसा सर्वत्र आढळतात, परंतु स्थानक मूर्ती सहसा आढळत नाही. 


पवनी (जिल्हा भंडारा )  येथील सर्वतोभद्र गणपती. हा गणपती पंचमुखी गणपती म्हणून सुद्धा ओळखतात. ही गणेशशिळा असून त्यावर चारही बाजूंनी गणपती असतात, ह्या शिळा वाकाटक कालीन असतात. 


शिव परिवारातील गणपती, नागपूर येथील महादेव मंदिरावरील शंकराच्या मांडीवर बसलेला गणपती आणि पार्वती . हे पेशवे कालीन मंदिर असून मंदिरावर बऱ्याच देवी-देवतांचे अंकन केलेले आहे. 

                                    औंढा नागनाथ (जिल्हा परभणी) येथील मातृका पटावरील गणेश.  


बऱ्याच मंदिरातून आढळून येणारी गर्भगृहाच्या द्वारावरील गणेशपट्टी. प्रथम गणेशाचे स्मरण आणि दर्शन व्हावे या उद्देशाने या गणेशपट्टीका बसवल्या जातात. 


गणेशाचं विलोभनीय रूप म्हणजे नृत्यगणेश. कलाप्रिय गणपतीचं हे  कलात्मक रूप चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी या गावी असलेल्या महादेव मंदिरावरील बाह्य भिंतीवर अंकित आहे. चतुर्भुज विनायकाच्या खालील उजव्या हातात पाश असून, वरील दोन्ही हातात नाग पकडलेला आहे, तर खालील डाव्या हाती मोदक असून सोंड त्या दिशेने वाळवलेली आहे (सोंड भग्न आहे).   

एकदन्तं प्रलम्बोष्ठं नागयज्ञोपवीतिनम् । त्र्यक्षं गजमुखं कृष्णं सुकृतं रक्तवाससम् ॥


नृत्यगणेशाची ही  सुंदर मूर्ती आहे मार्कंडा (जिल्हा गडचिरोली ) येथील मुख्य मार्कंडेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर. अष्टभुज गणेशाच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने भग्न दांत, परशु धारण केला असून, त्यावरील हात नृत्य मुद्रेत आहे. वरच्या दोन्ही हातात नाग धारण केला आहे. डाव्या वरच्या हातात कमलपुष्प असून दुसऱ्या हाती मोदकपात्र धारण केले आहे. खालचा हात नृत्य मुद्रा दर्शवतो. गणेशाची सोंड मोदकपात्राकडे वाळलेली आहे. गणपतीच्या सर्वांगावर सुंदर अलंकार  आहेत. गणेशाची नृत्यमग्नता कलाकाराने सुंदरपणे साकारली आहे. किंचित वर उचललेला पाय नृत्यातील कलात्मकता स्पष्ट करतो. गणेशाच्या बाजूनी वाद्य वाजवणारे सेवक असून मूर्तिपीठावर मूषक अंकित केले आहेत. 

अशा या आशापूरक गणेशाचे स्मरण करून सर्व विघ्न दूर करण्याची प्रार्थना  करूयात  . . . . . 
विनायक नमस्तेऽस्तु नमस्ते भक्तवत्सल ।
भक्तप्रियाय शान्ताय महातेजस्विने नमः ॥

बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग २

आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग १

मागील भागात आपण आनंदेश्वर  मंदिराचा आढावा घेतला.
या भागात मंदिरातील  इतर मूर्तिकला आणि  मंदिरा बाहेरील भागाचा आढावा  घेऊयात. मंदिरातील मुख्य खांबावरील गरुड प्रतिमा आणि राक्षस मुख.  


तुळई वरील कमल पुष्पाचे झुंबर. 



खांबावर अंकित केवलनृसिंह प्रतिमा.


वक्रतुंडाय लंबोदराय एकदन्ताय मोदकभक्षकाय नमो नमः ।

मुख्य गाभार्याच्या पुढील अंतरालाच्या छतावर असलेले दगडी झुंबराची जोडी.


अञ्जनीगर्भसम्भूत कपीन्द्रसचिवोत्तम । रामप्रिय नमस्तुभ्यं हनूमन् रक्ष सर्वदा ॥


खांबावरील परफेक्ट नक्षीकाम... हि प्रतिमा  mirror image चे सुन्दर उदाहरण आहे.   अर्धी प्रतिमा हि दुसऱ्या अर्ध्या  प्रतिमेची mirror image  आहे.





युद्ध  प्रवीण ललिता :







मंदिराचा बाह्यभाग :


मंदिराचा प्रदक्षिणा क्रमानुसार डावीकडील  गाभारा (बाह्य भाग)



याच गाभाऱ्याची पुढील बाजू : 

गाभाऱ्यावरील देवकोष्टकात असलेली देवी मूर्ती आणि भैरव मूर्ती . या बाह्य मूर्तींवरून असं अनुमान निघते कि हा गाभारा देवी ला समर्पित असावा.

मंदिराच्या पुढील मार्गावरील असलेल्या  मुख्य गाभार्याच्या बाह्यभागावरील अंकन :
अंतरालाच्या बाह्यभिंतीवर असलेली खिडकी,  नरसिंह  लक्ष्मी - नारायण आणि तीर्थासाठी असलेले मकरमुख.   



गरुडावर ( मनुष्यरुपी) आरूढ असलेला चतुर्भुज विष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी. अशा प्रतिमेला लक्ष्मीनारायण प्रतिमा म्हणतात.



मुख्य गाभाऱ्याची मागील बाजू : या बाजूच्या देवकोष्टकात गरुडारूढ विष्णूची प्रतिमा आहे. 

गरुडारूढ विष्णू:  सुंदर देवकोष्टकातील हि   मूर्ती मुख्य गाभाऱ्यांच्या  बाहेरील बाजूला आहे. मंदिर रचनेनुसार, मंदिराच्या मागील बाजूस तीच प्रतिमा किंवा त्याच देवतेचा परिवारातील प्रतिमा असते ज्या देवतेला ते मंदिर समर्पित आहे. (या वरून असा अनुमान निघतो कि हे मंदिर आधी विष्णूला समर्पित  असावे  परंतु   काही  कारणपरत्वे ते शिव मंदिरात रूपांतरित झाले असावे.) 
गरुडावर असलेले हि मूर्ती, मूर्ती शास्त्रातील आयुध क्रमानुसार (चक्र, गदा, पद्म, शंख) गोविंद रूपातील  आहे.  



 वाली - सुग्रीव युद्धपट :


असा हा  विदर्भातील  अमूल्य ठेवा सर्वांनी जरूर   अनुभवावा व शिवाच्या  मंगल सानिध्याचा लाभ घ्यावा. 

नमस्ते देवदेवेश त्वत्प्रसादाद्वदाम्यहम् ।  वाक्ये हीनेऽतिरिक्ते वा मां क्षमस्व सुरोत्तम ॥
अधिक - उणे काही झाल्यास सांभाळून घ्यावे  हि विनंती. 


बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग १

मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकन्ताय शंभवे अमृतेषाय सर्वाय महादेवाय ते नमः
नमस्कार वाचक मित्रांनो,
 मासोत्तममासे 'श्रावण' मासाची सुरुवात झालीय.  आनंद, उत्साह आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा महिना. याच उत्साहाला जोड मिळते ती भक्तीची आणि श्रावणात भक्ती व आनंदाच्या सरींमध्ये आपण न्हाऊन निघतो. श्रावण हा शंकर- पार्वतीच्या भक्तीला समर्पित असलेला महिना. श्रावणात लगबग होते ती महादेव दर्शनाची. मग ती मंदिरात जाऊन शंकराला बेल, शिवमूठ अर्पणकरणे असो किंवा नवविवाहितांनी मंगळागौरी च्या रूपात पुजलेला  गौरीहर असो, सर्व काही सांबमय. याच साम्बसदाशिवाच्या वास्तव्याने पावनझालेलं शुभंकर असं स्थान म्हणजेच आनंदेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर अमरावती  जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या पूर्णानदीच्या काठी वसलेल्या गावी आहे. अमरावती पासून ६२ km आणि दर्यापूर पासून केवळ १६ km अंतरावर हे सुंदर शिल्प उभं आहे. मंदिराचा परिसर नदीकाठी असून विस्तीर्ण अश्या उंचवट्यावर हे मंदिर पसरलेला आहे. या मंदिराचा चित्ररूपात आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न.  

मंदिराचा विस्तीर्ण परिसर   

मंदिर बाहेरून अनेक कोनी असून आत तीन गाभारे असून मधोमध एकच गोलाकार मोठा सभामंडम आहे. हे इथलं वेगळेपण. पूर्वी मंदिर परिसराला मोठी तटबंदी असावी. मंदिर साधारण ६ फूट उंचावर आहे. ४-५ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे मुख्य द्वार आहे. दारातून आत जाताच दृष्टीस पडतो तो अंतरिक्ष मंडप, अर्थात गोलाकार आणि वरतून संपूर्ण उघडा असलेला मंडप, जणूकाही अंतरिक्षचं छोट्या रूपात पाहतोय हा भास निर्माण होतो. 






मंदिराला तीन गाभारे असून, पैकी दोन गाभारे रिकामे आहेत आणि मुख्य गाभाऱ्यात श्री आनंदेश्वर विराजमान आहेत. सभामंडपातील सर्व खांब अतिशय कलात्मक असून त्यावर विविध आकृत्यांची तसेच देवी-देवतांच्या प्रतिमांची रेलचेल आहे. काही खांबांवर कुंभ, वेलबुट्टी, साखळ्या इत्यादी कोरले आहेत. खांब आणि तुळ्यांच्या मध्ये विविध मुद्रेतील यक्षांच्या प्रतिमा असून, जणू या यक्षांनीच या डोलारा तोलून धरल्याचा  आभास निर्माण होतो.  

यामध्ये  नरसिंह यक्ष, शंख वाजवणारा यक्ष, गंभीर आणि समाधान मुद्रेतील यक्ष, पुंगी वाजवणारा यक्ष आणि वृद्ध यक्ष अशा विविध यक्षांचा  समावेश आहे.
मंदिर गाभाऱ्यात १२ खांब असून सर्व खांब विविधतेने नटलेले आहेत.
एकाच खांबावर असलेल्या व केवळ चौकोनापासून बनववलेल्या आकृती


सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह रचना :


पुढील भागात मंदिरातील इतर रचना आणि   मंदिराच्या बाह्य शिल्पांचा आढावा घेऊयात........
क्रमशः

बुधवार, १० मे, २०१७

जबलपूरच्या वाटेवर..... भाग १

नमस्कार
बऱ्याच दिवसांचा (खरंतर वर्षांचा!!) एक plan डोक्यात घोळत होता. पण प्रत्येक वेळेस सुट्यांचा प्रॉब्लेम किंवा कोणाची तरी अडचण येत येत  मागेच पडत होतं. परंतु म्हणतातनं कि वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही, अगदी तसंच झालं. या वेळेस सगळ्यांचं पक्कं झाला आणि आमचा जबलपूर च्या  plan वर शिक्का उमटला. ३० एप्रिल आणि १ मे असा सुटीचा बेत ठरवून आम्ही चौकडी निघालो जबलपूर ला जायला. मी, हृषीकेश, वैभव सर आणि कौस्तुभ सर असे चौकडीचे  सदस्य होतो.
 ३० च्या सकाळी सुरु झाला वर्धा ते जबलपूरचा प्रवास. निघाल्यावर  पहिले भेट घेतली ती रामटेकच्या रामरायाची. भेट धावतीच झाली कारण पोहोचे पर्यंत मंदिर बंद होण्याची वेळ झाली होती. दर्शन आटपून व रामभक्त वानरांना प्रसाद देऊन आम्ही पण आमचा पोटोबा शांत करण्यासाठी गड पायथ्याशी असलेल्या दुकानांमध्ये कच्चा चिवडा आणि थंड सरबत घेतलं आणि लागलो पुढच्या प्रवासाला.
संपूर्ण रस्त्याचे काम सुरु आहेत त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. गाडीत पूर्ण वेळ धिंगा घालणं सुरु होतं. मस्त वेळ जात होता. रस्त्यात toll  पण बरेच होते, त्यामुळे जीव मेटाकुटीला आला होता. 
महाराष्ट्र सोडलं आणि भारताच्या हृदयात प्रवेश केला. सुंदर रस्ते , बरंचसं काम पूर्ण झालेलं. मनात अचानक स्वर उमटले "हि वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा....".





आता भुकेची वेळ झाली होती. आणि भुकेची जाणीव कावळे ओरडून करून देत होते. सिवनी येताच आम्ही छान हॉटेल  स्थानिक लोकांना विचारात शोधून काढलं आणि जठराग्नी शांत केला. हसी-मजाक करत मस्त जेवण फस्त केलं मात्र पुढच्या प्रवासात आम्ही सुस्त झालो. सर्वांनी एक एक डुलकी 
घेऊनच घेतली. सगळे सुस्तावले असल्यामुळे  energetic होण्यासाठी थांबलो. recharge होताच पुन्हा प्रवासाचा आरंभ झाला. आता थोडं कंटाळून गेलो होतो, तोच नर्मदा मैयाचे प्रथम दर्शन घडले आणि सर्व जण तरतरीत झालो. माझं तर स्वप्नचं पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. विशाल पात्र आणि त्यावरचे मोठे मोठे पूल मनाला भुरळ घालत होते. संध्याकाळी जबालपूरला गंगा मैयासारखीचं नर्मदा माईची आरती होते हे ऐकलं होतंच आणि आता ७.०० वाजले असल्यामुळे आरतीचे वेध लागले होते. रोज संध्याकाळी ७.३० वाजता गौरी घाटावर माईच्या आरतीचा सोहळा संपन्न होतो. स्थानिक तसेच पर्यटक मोठया प्रमाणात या घाटावर येऊन आरतीचा दिव्य अनुभव घेतात. नर्मदेच्या उत्तर तटावर या आरतीचे आयोजन होते. घाट सुंदर आणि प्रशस्त बांधलेला आहे. ज्या ठिकाणावरून आरती करतात तिथेच बाराही ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकात्मक पिंडींची स्थापना करण्यात आली आहे. पूजा करणाऱ्या पंड्यांच्याच मागे आम्हाला जागा मिळाली त्यामुळे संपूर्ण सोहळा अगदी व्यवस्थित अनुभवता आला. नर्मदेची पंचोपचार पूजा करण्यात येते, त्यानंतर नर्मदा अष्टकाचा पाठ होतो आणि सुरुवात होते नर्मदा माईच्या आरतीला " ओम जय जगतानंदी, मैया जय आनंद कंदी . . . . . . . . ".




घाटावरचा बहुतेक लोकांना पण आरती ओवाळण्याची संधी मिळते, आणि त्या अभूतपूर्व आरती ओवाळण्याचा  आम्हाला पण लाभ मिळाला, भाग्यच.. . . . त्यानंतर नर्मदेच्या पाण्यात आम्हीपण दीपदान केलं. तो स्वर्गीय सोहळा  पाहून "रोमांचाची फुले लगडली माझिया देहद्रुमा " अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सुरूझाला photo session.

दिवसभाऱ्याच्या प्रवासाचा थकवा जाणवायला लागला होता आणि विश्रांतीची गरज पण होती. थोडी चौकशी करून आणि इंटरनेट गुरु च्या मदतीने हॉटेल्स शोधण्याच्या मोहिमेला आरंभ केला आणि दोन ते तीन हॉटेल्स पाहूनच थांबलो कारण अजून शोधण्याची इच्छाच नव्हती.  Fresh होऊन रात्रीचं जेवण आटपून हॉटेल ला परत आलो. गप्पांचा थोड्यावेळ फड रंगला असतांनाच निद्रादेवीची अति  तीव्रतेने आठवण केल्यामुळे गार वातावरणात दुसऱ्यादिवसाचे plan आखात  झोपलो.



गुरुवार, ३० मार्च, २०१७

कालगणना . . भाग ३ संवत्सर विचार !!!!

मागील भागात आपण शक संवत्सराबद्दल जाणून घेत असतांना भारतीय कालगणनेतील प्रत्येक संवत्सराचा नाव देण्याची पद्धत आहे हे आपल्या लक्षात आलेले असेलच.
उदाहरणार्थ : या चैत्र प्रतिपदेपासून सुरु झालेल्या १९३९ व्या संवत्सराचे नाव आहे, हेमलंबी. तसेच कार्तिकात सुरूझालेल्या २०७३ व्या विक्रम संवताचे नाव आहे किलक.. 

संवत्सर चक्र :
एकंदरीत साठ संवत्सरांचे एक चक्र मानतात. येथे संवत्सर  हा शब्द एक   वर्ष या अर्थाने वापरला आहे. 
एक साठ वर्षाचे चक्र संपले कि, पुन्हा संवत्सराला पहिल्या नावावरून सुरुवात होते. या साठ वर्षांची नवे पुढील प्रमाणे आहेत:
 प्रभव, विभव, शुक्ल,प्रमोद, प्रजापति, अंगिरा,  श्रीमुख, भाव, युवा,  धाता,  ईश्वर,  बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष,    चित्रभानू,  सुभानू,तारण, पार्थिव, व्यय, सार्वजित , सर्वधारी, विरोधी, विकृत, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलंबी, इत्यादी 

चैत्री नवरात्राचा आजचा तिसरा दिवस,  जगद्जननीचे  आणि श्री राघुनंदनाचे स्मरण करून आजची लेखमाला इथेच संपवतो.. 

वरदां राम जननीं जमदग्निप्रियां सतीम् ।
एकवीरां महामायां ध्यायामि रेणुकां भजे ॥


लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ ।

कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥

बुधवार, २९ मार्च, २०१७

कालगणना..... भाग २


कालच्या भागात कालगणनेच्या पूर्वपीठिकेबद्दल जाणून घेतलं . शककर्त्यांनी निरनिराळ्या कालगणनांचा प्रारंभ आणि वापर केला. भारतात बऱ्याच विभिन्न  कालगणनांचा वापर केला जातो. त्यापैकी नित्य उपयोगात येणाऱ्या संवत्सरांचा या भागात आढावा घेऊयात..... 
भारतात सर्वदूर आणि सर्व स्तरातील लोकांकडून वापरण्यात येणारे प्रचलित असे "इसवी सन " अर्थात इंग्रजी कालगणना. हि कालगणना ज्युलियस सीझर ने सुरु केली. जानेवारीच्या पहिल्या तारखेस या सनाचा आरंभ करतात. हा इंग्रजी सन ख्रिस्ताच्या जन्मवर्षापासून मोजण्याची प्रथा आहे. 
त्यानंतर  भारतात वापरात येणारे संवत म्हणजे "विक्रम संवत ". उज्जयनीच्या विक्रमादित्य राजाने हि कालगणना  सुरु केली. हा संवत कार्तिक महिन्यापासून सुरु होतो. दिवाळीचा  पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा या संवत्सराचा पहिला दिवस. विक्रमादित्याच्या राज्याभिषेकापासून या  संवताचा प्रारंभ करण्यात आला. सध्या विक्रम संवत २०७३ कीलक नाम सुरु असून पुढे कार्तिक महिन्यापासून २०७४ सौम्य नामक संवत सुरु होत आहे. 
त्यानंतर क्रम लागतो शालिवाहन संवताचा, महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरात येणारा आणि धार्मिक कार्यक्रमात उश्चारल्या जाणारा हा संवत. पैठणच्या रणधुरंदर शालिवाहन राजाने  रानटी शकांच्या आक्रमक टोळ्यांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे हा संवत. या संवत्सराची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून करण्यात येते. यातील महिने हे चांद्र अमावास्यांत आहेत. वर्ष प्रतिपदेपासून म्हणजेच कालपासून शालिवाहन संवत १९३९, हेमलंबी नामक वर्ष सुरु झालेले आहे. 
हिजरी सन :- अर्थात मुस्लीम कालगणना 
हि कालगणना सर्व मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांमध्ये वापरण्यात येते. हि कालगणना पूर्णताः चंद्र कालदर्शक गणना आहे.  या कालगणनेच्या प्रारंभाविषयी असं सांगतात कि " येमेनच्या अब्रहाने अरबांवर हल्ला केला. यात अरब विजयी झाले आणि याचं प्रतीक म्हणजेच हा हिजरी सन. या सनाची सुरवात होते ती मुहरम या महिन्यापासून, सध्या हिजरी सन १४३८-१४३९ सुरु आहे. 

जैन धर्मियांचे वीर निर्वाण संवत :
इसवीसनाच्या ५२७ वर्षांपूर्वी, दिवाळीचा दिवस हा महावीरांच्या महानिर्वाण दिवस मानला जातो. याच दिवसापासून या संवत्सराचा आरंभ मानला जातो. सध्या २५४३-२५४४ हे निर्वाण संवत सुरु आहे. 

यानंतर, सर्वात अर्वाचीन संवत्सर सुरु केले ते, महाराष्ट्राला ललामभूत असलेले , महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशंभूंनी. छत्रपतींच्या राज्याभिषेकापासून महाराष्ट्रात छत्रपती संवत, शिव संवत किंवा राज्याभिषेक शक सुरु करण्यात आला. सध्या शिव संवत ३४३-३४४ सुरु आहे. 

हि सर्व संवत्सरे भारतातील विविध भागात उपयोगात आणली जातात. इतका प्राचीन आणि प्रचंड कालगणनेचा वारसा आपल्याला लाभला हे आपलं  भाग्य. सर्व भारतीयांनी किमान वर्ष प्रतिपदेला  तरी या वारस्याचे स्मरण करण्याचा संकल्प करूया...... 

 चैत्री नवरात्राचा आजचा दुसरा दिवस,  आदिशक्तीचे आणि श्री राघुनंदनाचे स्मरण करून आजची लेखमाला इथेच संपवतो.. 
वरदां पुत्रदां श्यामां द्रव्यदां दिव्यभोगदाम् । अन्नपूर्णां चिरंजीवीं ध्यायामि तुरजां हृदी॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम: ॥