बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

अपरिचित वारसा (आमनेर किल्ला)

काळाच्या उदरात असंख्य आठवणी, असंख्य गोष्टी आणि असंख्य वास्तू सामावलेल्या असतात. त्यापैकी काही परिचित असतात तर काही गोष्टी अपरिचितच राहतात. अशीच एक अपरिचित वास्तू जी इतिहासाचा अमूल्य ठेवा जपून आहे, ती म्हणजे "आमनेर किल्ला"........

आमनेर किल्ला हा भुईकोट प्रकारचा किल्ला असून, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात, तापी आणि गडगा (पूर्वीचे नाव गर्ग नदी ) या नद्यांच्या संगमावर आहे.

किल्याचे स्वरूप:
एक एकर परिसरात हा किल्ला पसरलेला असून, संगमावरच्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची साधारण ३०० मीटर. किल्ला हा भाजलेल्या विटा आणि रेतीमिश्रित चुन्याच्या जुडाईपासून बनवलेला आहे. किल्ल्याला चार मुख्य बुरुज आणि प्रत्येक  तटबंदीच्या मध्यभागी एक बुरुज असून, बुरुजांसाठीसुद्धा विटा आणि मातीचाच वापर केलेला आहे. किल्ल्याला एकच सलग तटबंदी असून, तापी नदीच्या डाव्यातीरावर, तटबंदीच्या वायव्य दिशेला किल्ल्याचे दार आहे. किल्ल्याच्या आतील पश्चिम  बाजूला मशीद असून, किल्ल्याच्या आतील  बरेचसे अवशेष ढासळलेले आहेत. 
योगदान : जुन्या CP & Berar प्रांतातील मेळघाट परगण्यात या किल्ल्याचा समावेश होत असल्यामुळे तत्कालीन राजकारणात या किल्ल्याचे विशेष महत्व होते. स्वातंत्रसंग्रामातील तात्या टोपेंचा या किल्ल्याशी निकटचा संबंध. तसेच भिल्ल चळवळीतील महत्वाच्या तंट्याभिल्लवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याचा विमोड करण्यासाठी, राजासिंगच्या नेतृत्वात या किल्ल्याचा वापर करण्यात आला. परंतु पुढे स्वातंत्रसंग्रामातील कोणीही या वास्तूचा उपयोग करू नये म्हणून १८५८ मध्ये इंग्रजांनी किल्ल्याची तटबंदी व बुरुज उध्वस्त केले आणि किल्ल्यातील चार तोफ पण काढून घेण्यात आल्या. 
मोडकळीस आलेला असून सुद्धा इतिहासाचा हा  मूक साक्षिदार  आपल्याच दिमाखात उभा राहून  काळाचे घाव सोसत आहे. 
(माहिती Amravati District Gazetteer, Vol. A, British Period वरून संकलित )

सचित्र आमनेर :

  वाटेत लागलेल्या सिपना नदीचे विहंगम दृश्य !!!!!!!! (पाणी खूपच कमी  होतं हो)


आमनेर किल्ल्याचा एक बुरुज व तटबंदी 

गडगा ( गर्ग ) नदी किनाऱ्यावरून दिसणारा आमनेर


 तापी नदी कडून असलेली तटबंदी व बुरुज


गडगा (गर्ग) नदीतील जल प्रवाह 


तापी नदी 



तापी- गडगा संगम आणि आमनेरचे प्रतिबिंब 



 मार्गात बसलेले कपिराज!!!!!


एखाद्या वयस्क तपस्यासारखा, जगावर सावली पांघरणारा वटवृक्ष


सातपुड्याच्या निसर्गकुशीत घेऊन जाणारी वाट !!!!!
                                          'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा ........

धारणी हा आदिवासी बहुल परिसर, या परिसरात आदिवासी जीवनाचे विविध पैलू पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे गोलादेव........ 
आदिवासी घरातील कोणी वडीलधारी माणसे मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ नदीपात्रातून पाषाण किंवा लाकूड आणतात, त्यावर मृतव्यक्तीचे प्रतीकात्मक अंकन करतात आणि असे पाषाण गावाबाहेरील एका झाडाखाली ठेवतात. याच स्मृतिस्थळाला म्हणतात गोलादेव ... 





बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

सोहळा गो पूजनाचा

भारत हा कृषिप्रधान  आणि संस्कृती प्रधान देश. भारतीय संस्कृतीची खरी ओळख होते ती सर्व प्राणिमात्रांमध्ये देवत्व अनुभवण्याच्या उदात्ततेवरून.  याच उदात्त भावनेतून, दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या, उपयोगात येणाऱ्या सर्व सजीव-निर्जीवांत देवत्व असल्याचे मान्य करतो आणि आचरणात सुद्धा आणतो. 
याच विचारांनी प्रेरित होऊन , भारतीय पौराणिक व्यक्तींनी गाईच्या ठिकाणीसुद्धा देवत्व कल्पून तिला देवतेचा मान दिला. केवळ मान देऊनच आपली संस्कृती थांबली  नाही तर गाईच्या प्रत्येक अवयवावर देवतेचा वास आहे असेही ठासून सांगितले. गाय  हि  आपले भरण-पोषण  करते म्हणून, गाईच्या दुधाला अमृताची सर असल्यामुळे, गाईच्या खिल्लारांनी शेतीस मदत होत असल्यामुळे, तिला मातृत्वाची उपाधी देण्यात आली आणि गाय  ही  पशु न राहता 'गोमाता' झाली. 
लोकसंस्कृतीमध्ये गाईचे वर्णन बरेचदा येते. त्याचेच उदाहरण  म्हणजे गाईला उद्देशून उच्चारल्या जाणाऱ्या पुढील ओळी . 
गाई गाई गोमती, गाईचे शिंगे गंगोत्री । चरे भीमापुरी, राखे विठ्ठल हरी ।।
पाठीवर सरस्वती, शेणामध्ये लक्ष्मी । गोमुत्रात सप्तऋषी, दर्शन घेता घडे काशी ।।
अशा या बहुउपयोगी, मातृत्वातूल्य गाई प्रति कृतज्ञ होण्याचा दिवस म्हणजे " गोवत्सद्वादशी ". 
अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हणून ओळखतात. 

योगायोग पहा, 
संपूर्ण आश्विन महिनाच मातृत्व पूजनाचा आणि सन्मानाचा महिना आहे. अगदी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून ते थेट  आश्विन अमावसेच्या लक्ष्मी पूजनापर्यंत.   अर्थात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत शक्ती देवतेचे पूजन, आश्विन शुद्ध पंचमी ते पौर्णिमा विद्या देवता सरस्वतीचे पूजन, पौर्णिमा (कोजागिरी)ला लक्ष्मी-इंद्र अर्थात राज्य लक्ष्मीचे पूजन, आश्विन कृष्ण अष्टमी (कराष्टमी)- संतान लक्ष्मीचे पूजन, आश्विन कृष्ण द्वादशी- गोपूजन अर्थात पोषण देवतेचे पूजन आणि आश्विन अमावसेला लक्ष्मी-कुबेर अर्थात धनलक्ष्मीचे पूजन. या सर्व देवदेवतेंच्या पूजनात गोमातेलाही स्थान देऊन, भारतीय संस्कृतीने आपल्या उदात्ततेचा परिचय दिला आहे. 

गोवत्स द्वादशीला सकाळी वत्सासह गाईला न्हाऊ घालतात, तिला विविध रंगाच्या गोंदणांनी सजवतात. गोधुल वेळेला औक्षण करून बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून अर्पणकरतात व तिची आराधना करतात कि ' हे गोमाते, तुझ्याच परिवारासारखा आपचा परिवार फुलू दे. आजपर्यंत तू आमचे पालन-पोषण केले तसेच पुढेही होवो आणि चिरंतन आरोग्याचे  आमच्या पदरी पडू दे!!!'. 
आपण सर्व  हीच प्रार्थना करूया आणि गोसंवर्धनाचा, गोपूजनाचा वसा घेऊया . . . . . . . . . 
जय गोमाता!!!!!!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर दुसरी माळ - ब्रह्मचारिणी : आनंद साऊरकर

देवीचे दुसरे रूप म्हणजे 'देवी ब्रह्मचारिणी'. इथे ब्रह्म या शब्दा चा अर्थ तपस्या/ तप असा असून आचारिणी 
म्हणजे आचरण करणारी असा आहे. म्हणूनच ब्रह्मचारिणी म्हणजे 'तापाचे आचरण करणारी'. ब्रह्मचारीणीचे स्वरूप जोतिर्मय असून सर्वव्यापी आहे.

                                    दधाना कर पद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। 
                                    देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥

देवीच्या उजव्या हातात जपमाळ असून डाव्या हातात तिने कमंडलू धारण केला आहे. 
या देवी नामाच्या उत्पत्तीची कथा अशी की:
पूर्वजन्मातील सतीने हिमालयाचे घरी जन्म घेतल्यानंतर नारदांच्या मार्गदर्शनाने भगवान महादेव आपल्याला पती रूपात लाभावे म्हणून या कन्येने अत्यंत कठीण अशी तपश्चर्या आरंभली. एक हजार वर्षे केवळ कंदमुळे खाऊन तपस्या केली. नंतर शंभर वर्षे केवळ पाने खाऊन तपस्या केली. पुढील काही वर्षे केवळ जमिनीवर गाळून पडलेली बिल्वपत्रे खाऊन व्यतीत केली आणि नंतर तिने पाने खाणेही सोडून दिले आणि निराहार राहून तपस्या केली.  तिने आरंभलेल्या अशा दुष्कर तपश्चर्येमुळे तिला 'ब्रह्मचारिणी' असे नामाभिधान प्राप्त झाले. 
याच तपश्चर्येच्या काळात तिने पाने (पर्ण) खाणेही सोडल्यामुळे तिचे एक नाव 'अपर्णा' म्हणून पण प्रसिद्ध झाले. 
तिच्या अशा उग्र तपश्चर्येमुळे तिचे शरीर अत्यंत कृश  झाले. आपल्या कन्येची अशी दशा पाहून, तिचे माता मैनावती अत्यंत दुखी झाली. आपल्या कन्येला या घोर तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी मैनावतीने तिला आवाज दिला "उ  मा" म्हणजे "अरे नाही !" आणि त्या आवाजामुळे देवी ब्रह्मचारिणी 'उमा' या नावाने सुद्धा ओळखली जाऊ लागली. 
अशा या बह्मस्वरूपिणीआणि दुसऱ्या माळेच्या देवीला, ब्रह्मचारीणीला त्रिवार वंदन.

 

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : प्रथम माळ - शैलपुत्री --- आनंद साऊरकर

या  पृथ्वीतलावरील सर्व  प्राणिमात्रांना मातृत्वाचा अत्यंत आदर आहे. मातृभाव हा सर्वांचा आदराचा विषय आहे. आणि याच भावनेमुळे  मनुष्य आपली आपली जास्तीतजास्त श्रद्धा आईच्या आईच्या चरणी ठेऊन असतो. अशा या मातृत्वाचा जगद्व्यापी अविष्कार म्हणजे जगतजननी 'जगदंबा '.
सकल जगाच्या मातृत्वाची, पोषणाची आणि संरक्षणाची  जबाबदारी सांभाळणारी जगदंबा हा सर्वांचा पूजनीय विषय ठरतो. वास्तविक आपण रोजचं  जगदंबेचे  निरनिराळ्या स्वरूपात पूजन करतो. परंतु देवत्वाच्या परिपूर्णतेचा काळ म्हणजे नवरात्री पूजन.  देवी संप्रदायानुसार चार नवरात्री प्रमुख मानल्या जातात, त्यात चैत्र, आषाढ, अश्विन आणि पौष यांचा समावेश  असतो. या  सर्व नवरात्रांमध्ये अश्विन नवरात्राचे महत्व अनन्य साधारण आहे. नवरात्रीच्या प्रमुख पूजनात, देवीच्या नऊ रूपांचे पूजन हा मुख्य सोहळा आहे. देवीची नऊ रूपे अशी :
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति. चतुर्थकम्।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति.महागौरीति चाष्टमम्।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना:।। 
याच नऊ रूपांचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न ......... 
शैलपुत्री :
जगदंबेचे पहिले रूप म्हणजे देवी शैलपुत्री. हिमालय पर्वताच्या पोटी जन्मझाल्यामुळे या देवीला शैलपुत्री नावानी ओळखल्या जाते. 

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥
अर्थात, वृषभारूढ या देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि डाव्या हातामध्ये कमलपुष्प केलेले आहे. 
पूर्वजन्मात ही देवी प्रजापती दक्षाची कन्या 'सती' या रूपामध्ये होती. दक्षयज्ञात झालेल्या अपमानामुळे सतीने योगाग्नीसाधनेद्वारा आपल्या देहाचे भस्म केल्यानंतर पुढील जन्मी ती हिमालयाच्या पोटी  जन्माला आली आणि आपल्या कठोर तपश्चर्येद्वाररा श्रीशंकराची अर्धांगिनी बनण्याचा मान प्राप्त केला. 
जगदंबा शैलपुत्री सर्व जगतावर कृपेचा वर्षाव करो ही  प्रार्थना.

या देवी सर्वभू‍तेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 


शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

भयहारिणी भवतारिणी आई भवानी, धानोरा पुर्णा

समस्त रसिक वाचकांना शिल्पानंदाचा नमस्कार. 
भारत हा  विविधतेने नटलेला देश. विविध संस्कृतींचा आणि कलागुणांचा संगम या देशात पहायला मिळतो. शिल्पकला, स्थापत्यकला यांनी तर भारत देश समृद्धच आहे. आपल्या परिसरात अशी बरीच ठिकाणे असतात जी शिल्पांनी, स्थापत्यकलांनी तसेच इतिहासाच्या वारशांनी  परिपूर्ण आहेत . अशाच ज्ञात-अज्ञात स्थळांचा आढावा घेण्याचा हा  छोटासा प्रयत्न. हा प्रयत्न आपणा सर्वांना आवडेल अशी अशा.

भयहारिणी  भवतारिणी  आई भवानी, धानोरा पुर्णा 
विदर्भप्रांत हा मुळातच संत आणि देवी-देवतांच्या वास्तव्याने  पावन झालेला भूभाग. अशा या पवित्र भागातून बऱ्याच नद्या वाहतात. त्यातीलच परम पावनी आणि पुराणांनी नमूद केलेली पयोष्णी अर्थात पूर्णा नदी. या नदीच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे वसली आहेत. त्यातीलच एक "श्री क्षेत्र धानोरा(पुर्णा )". 
धानोरा हे चांदूर बाजार (जि  . अमरावती ) तालुक्यातील गाव. हे गाव अमरावतीच्या पश्चिमेला, आसेगाव- चांदुर बाजार मार्गावर, अमरावती पासुन अंदाजे ३० किमी अंतरावर आहे. गाव अतिशय लहान परंतु परिसरातील धार्मिक आणि ऐतेहासिक प्रसिद्ध स्थळ. 
गावाच्या  दक्षिण बाजूला श्री भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असुन, मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे. 

 गाभारा प्रशस्त असून, गाभाऱ्यात देवीची काळ्या  पाषाणाची सुंदर मूर्ती आहे. मूर्ती साधारण चार साडेचार फुट उंचीची असून कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली आहे. 
भवानी देवी चतुर्भुज असून प्रदक्षिणा क्रमाने, देवीच्या उजव्या खालील हातात महाळुंग(मातुलिंग), वरच्या हातात तलवार, वरच्या डाव्या हातात खेटक  (ढाल) आणि डाव्या खालील हातात पानपात्र आहे.  

स्थानक (उभ्या) स्वरूपातल्या देवीच्या पायात जोडवे, पैंजण, तोडे आहेत. हातात सुंदर कंकणे, केयूर(बाजूबंद), असून कंबरेवर सुंदर कोरीव असा कंबरपट्टा आहे. गळ्यात कंठा, माळा इत्यादी अलंकार आहेत. शिरावर कलाकुसर युक्त करंडक मुकुट असून, मुकुटावर नागफणा कोरलेला आहे.
देवीच्या पायाशी डाव्या बाजूने, सिंह हे तिचे वाहन असून त्याच बाजूने चामरयुक्त दोन परिवार देवता (सेविका) आहेत. उजव्या पायाशी चामरधारी, धुपधारी सेविका असून एक तपस्विनी नमस्कार मुद्रेत बसलेली आहे. द्वारशाखेवर उभय बाजूने तीन - तीन देवींची रूपे कोरलेली आहेत त्यात मुख्यत्वे, गौरी, चामुंडा, नारायणी यांचा समावेश आहे. एकंदरीत वर्णनावरून ही मूर्ती साधारणतः दहा किंवा अकराव्या शतकातील असावी. 
धानोरावासिनी भवानी देवी हे साक्षात तुळजापूर भवानीचेच रूप. तुळजापूरवासिनी भक्तांच्या हाकेला धावून श्री क्षेत्र धानोरा येथे आली आणि येथेच स्थिरावली अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात देवीसमोर, गाभाऱ्याच्या मध्यभागी श्री महादेवाची पिंड आहे. धानोरा गावाला प्राचीनकाळी धान्यपुर म्हणत असत आणि या गावाचा हा ईश्वर म्हणून या महादेवाला "धान्येश्वर "  म्हणतात. 

गावाच्या मध्यभागी सुंदर नारायणाचे (विष्णूचे) भव्य मंदिर आहे. नारायणाची मूर्ती जमिनीखाली दहाफूटाच्या गाभाऱ्यात आहे. मूर्ती अष्टभुज नारायणाची आहे. या बद्दल पुढील  भागात........ 
  

संथ वाहते पूर्णामाई.... . . . . . . . .


आई भवानीचा उदो  ......... 

कृपया हा ब्लॉग कसा वाटला, काही सुधारणा आवश्यक असतील त्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवाव्यात हि विनंती.
धन्यवाद.....