मातृकापूजन - कराष्टमी - आठवी पूजन : आनंद साऊरकर
या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
दिवाळीच्या आधी येणारा, देवीच्या भक्तीने ओतप्रोत भरलेला उत्सव म्हणजे कराष्टमी. आश्विन कृष्ण अष्टमीला येणारा हा सण कराष्टमी अथवा आठवी या नावाने ओळखला जातो. हा सण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . या दिवशी मुख्यतः करे (म्हणजे मातीचे कुंभ) याचे पूजन करतात. अष्टमी या तिथीला कऱ्यांची पूजा करतात म्हणून कराष्टमी आणि स्थानिक भाषेत आठ या अर्थी आठवी. पूजेत रीतीप्रमाणे आठ मातीचे किंवा दोन मातीचे आणि सहा तांबे, पितळ यांचे कुंभ वापरतात. एका कुंभावर मातीची पणती झाकण म्हणून ठेवतात तर दुसऱ्या कुंभावर विड्याचे पान ठेवतात.
तसे पहाता संपूर्ण अश्विन महिनाच मातृशक्तीच्या पूजनाला समर्पित आहे. पहिले देवी नवरात्र, कोजागिरीला लक्ष्मी - इंद्र, वसुबारसेला गोमातेचे, अश्विन अमावास्येला लक्ष्मी - कुबेर आणि आठवीला मातृका पूजन केल्या जाते. (avs)
आठवी पूजनाचे संग्रहित छायाचित्र
आठवीला पुजल्या जाणाऱ्या मातृका कोणत्या आणि किती ?
मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यामधील, रक्तबीज वध या अष्टमाध्यायात या मातृकांच्या उत्पत्तीचा उल्लेख आलेला आहे. शिव, ब्रह्मा, विष्णू, नरसिंह, वराह, कार्तिकेय आणि इंद्र या देवतांच्या शक्ती म्हणजे मातृका. सात देवतांच्या सात शक्ती म्हणून सप्त मातृका. शिव शक्ती माहेश्वरी, ब्रह्म शक्ती ब्राह्मणी, विष्णू शक्ती वैष्णवी, नरसिंहाची नरसिंही, वराहाची वाराही, कार्तिकेय अथवा कुमारची कौमारी आणि इंद्राची ऐन्द्री या त्या सप्तमातृका.(मातृकांवर अधिक माहिती नव्या blog मध्ये.) रूपाने आणि गुणाने तसेच शस्त्र शक्तीने आपल्या प्रागट्य देवतेसारख्याच. आठवी पूजनात या सात सप्त मातृका आणि आठवी आपल्या कुळाचे मातृवत पालन व रक्षण करणारी कुलस्वामिनी यांचा समावेश असतो. कारण कुलस्वामिनी आपल्या कुळावर ममतेने प्रेम करते व वात्सल्याची तसेच रक्षणाची, कृपेची छाया धरते.(avs)
आता प्रश्न हा की, या मातृका पूजनाचा आणि कुंभ पूजनाचा काय संबंध ? कोणतीही प्रतिमेचे पूजन न करता केवळ कुंभांचेच पूजन का करतात?
कारण, वैदिक काळापासून कुंभ हे मातृगर्भाशयाचे प्रतीक मानण्यात आले आहे. कुंभाची ही प्रतिकात्मता विविध साहित्यातून आणि विधी विधानांतून दिसून येते. आपल्याकडील नवरात्रीतील घटस्थापना हि मातृदेवतेची कुंभ रूपात केलेली उपासनाच नाही का ? याच मातृरूप घटातून नवसृजनाचा सोहळा साजरा होतो. आणि यामुळेच या पूर्णकुंभाला किंवा पूर्णघटाला सर्जनता, समृद्धता, नवचेतनेचे प्रतीक मानल्या गेले ते त्याच्या मातृरूपामुळे. या वरून हे निश्चित कि कुम्भ हे मातृगर्भाचे अर्थात मातृत्वाचे प्राचीन प्रतीक आहे. मातृत्व स्पष्ट करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी कुंभाशीवाय दुसऱ्या प्रतिमा दाखवणे व्यर्थ होईल म्हणून आठवीच्या मातृपूजनात कुंभांना स्थान आणि महत्व दिले आहे. (कुंभ या विषयावर आणखी माहिती दुसऱ्या blog मध्ये. )(avs)
पूजेचे स्वरूप : ही पूजा अष्टमीला सायंकाळी किंवा काही ठिकाणी सकाळी करतात. अंगणात किंवा घरात, पाटावर आठ कुंभ मांडून एका कुंभावर पणती झाकण ठेवतात आणि कुंभावरच लाल गंधाने चंद्र रेखाटतात. दुसऱ्या कुंभावर विड्याचे पान झाकण म्हणून ठेवतात आणि पानावर चंद्र रेखाटतात. या कुंभांवर ज्वारीचे पाच धांडे घर म्हणून खोपडी म्हणून लावतात. कुंभांना आठ पदराचं पोवतं वाहतात. देवीची षोडशोपचारे पूजा करतात. पुरण, आंबील, घाऱ्या कुळाचाराप्रमाणे सर्व जिन्नस करतात. नैवेद्यात विशेषतः साटोऱ्यांचा ( म्हणजे कणकेत गूळ घालून तळलेल्या पुऱ्या) यांचा समावेश असतो. बनवलेल्या आठ साटोऱ्यांचा देवीला वेगळा नैवेद्य दाखवतात तो देवीजवळ ठेवतात व दुसऱ्यादिवशी गाईला लावतात. बऱ्याच ठिकाणी कुळाचाराप्रमाणे काही प्रथा वेगवेगळ्या आहेत. परंतु मुख्य उद्देश मातृका पूजन हाच.(avs)
कराष्टमीला पुजल्या जाणाऱ्या मातृका आणि कुलस्वामिनी आपल्या सर्वांवर मायेची सावली धरो हीच प्रार्थना...
