शनिवार, २५ जुलै, २०२०

चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

 चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

विश्वातील प्रत्येक जीव, चेतन- अचेतन आणि हे अवघे चराचर हे एकमेकांशी एका अदृश्य बंधनाने जोडलेले आहेत. हाच परस्पर संबंध वर्षानुवर्षे नानाविध माध्यमांतून आपण जपत आलोय. याच संबंधांना दृढ करण्याकरिता, परस्परांचा आदर करण्याकरिता, चराचरातील प्रत्येक घटकांचं पूजन करण्याची चीनच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत रूढ झाली. भारतीय संस्कृतीत चंद्र - सूर्य ते अगदी नदी, पर्वत, वृक्ष, प्राणी पक्षी यांची सुद्धा निरनिराळ्या सणांना पूजा  त्यांचा सन्मान केला जातो. याच पूजन शृंखलेतील सण "नागपंचमी".आनंद साऊरकर

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात. वातावरणाच्या अनुकूलतेमुळे या काळात नागांचा सर्वत्र वावर पाहायला मिळतो. आपल्यापासून निदान या काळात तरी  त्यांना त्रास होऊ नये म्हणून पूर्वजांनी त्यांचे पूजन याच महिन्यात करण्याची पद्धत प्रचारात आणली, किती हा पर्यावरणाचा आणि प्राणी जगताचा विचार !!!

महर्षी काश्यप यांच्या कद्रू नावाच्या पत्नीपासून या नागकुळाची उत्पत्ती झाली असे मानतात. पुरातन वाङ्मयात अनेक ठिकाणी नागांचा, नागकुलाचा उल्लेख आढळतो. कधी स्वतंत्र देवता म्हणून तर कधी मुख्यदेवतांच्या परिवारदेवता किंवा सेवक देवता म्हणून उल्लेख आढळतो. मूर्ती शास्त्राने  सुद्धा या देवतेची विशेष दखल  घेतली आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये द्वारपाल समूहात किंवा स्वतंत्रपणे नागांच्या प्रतिमा चितारलेल्या आढळतात. (avs

पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्वाचा असा घटक असलेला हा साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा गौरवला जातो. तर ग्रामीण स्त्रिया याला आपला बंधू मानतात. यामुळेच ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी वर्गात नाग पूजनाची प्रथा चालत आलेली आहे. नागपंचमीला निरनिराळ्या भागात वेग वेगळ्या पूजा पद्धती आढळून येतात. त्यातीलच प्राचीन अशी नागकुल पूजन काही ठिकाणी पाहायला मिळते.(avs

पुराणात नऊ नागकुळ प्रसिद्ध आहेत : 

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा

एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll

या मंत्रात अनंत, वासुकी इत्यादी नऊ नागकुळांचा उल्लेख आहे. पुराणात या सर्व नागांच्या विविध कथा आढळतात. काही ग्रंथांमध्ये हि नऊ नावे थोडीफार बदललेली आढळतात परंतु सर्वत्र नऊ कुळे आहेतच. ह्याच नऊ कुळांची पूजा नागपंचमीला करतात. आमच्याकडेही नागकुळं पूजन असते, त्याची हि थोडक्यात माहिती. 

नागाची प्रतिमा: भिंतीवर गेरूच्या साह्याने वर चौकोनी आणि त्याला लागूनच खाली गोलसर असा आकार काढून सारवून घेतात, ही  झाली नागांची बैठक. त्यानंतर आवं (न तापवलेले ) दूध आणि तूप यांचा मिश्रण बनवतात. काडीला कापूस गुंडाळून ह्या मिश्रणाच्या साह्याने वरील चौकोनी भागात नऊ नाग साधारण वीतभर लांबीचे, एका रांगेत थोडे अंतर ठेऊन  काढतात. त्यांच्या पोटात अर्थात दोन नागांच्या मध्ये एकूण पाच छोटे नाग काढतात, हे नागाची पिल्ले. खालच्या गोलभागात नऊ वेटोळे असलेली पद्मिणी  नागीण काढतात. तिच्या बाजूला तिच्या दासी सुद्धा रेखाटतात. (avs) 

(भिंतीवरील नाग प्रतिमा, फुलोरा आणि सर्वसाधारण नागकुळाचे रेखाटन)(avs

पूजन : नागांचे षोडोपचारे पूजन केल्या जाते. पूजनात सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र व पोवते मुख्यत्वे वापरतात. प्रत्येक नागाला आणि पद्मिणीला स्वतंत्र  सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र आणि नऊ पदराचे पोवते अर्पण करतात. तसेच पाच पदराचे पोवते नागबाळ यांना वाहतात. पद्मिणी नागिणीच्या ज्या दासी आहेत त्यांना पाच पदराचे पोवते, कपासवस्त्र अर्पण करतात. पूजनात  ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या फुलांचा वापर करतात. आघाडा, केना, बिल्वपत्र आणि फुले यांचा वापर करून माळ तयार केली जाते व नागकुळाला अर्पण केली जाते. आनंद साऊरकर

नैवेद्य: पाच प्रकारचे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा आणि तीळ हे भाजून घेऊन याच्या लाह्या तयार करतात. ह्या लाह्यांचा व फुटाणे याचा नैवेद्यात आवर्जून वापर करतात. नऊ पुरिका (रव्याच्या पापड्या), नऊ करंज्या, वेणी-फुगी यांचा फुलोरा नागकुळावर टांगतात. काहीठिकाणी वाफवलेले, तर कुठे तळलेले पदार्थ स्वयंपाकाला बनवतात. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि रव्याचा शिरा मुख्य असतो. तव्याचा वापर सुद्धा बरेच ठिकाणी करत नाहीत. नागकुळाला रव्याचे दोन लाडू बनवून त्याचा नैवैद्य घरी दाखवून ते वारुळावर अर्पण करतात. शेवटी नागाला विडा- सुपारी अर्पण करतात. कुठे नारळ अर्पण करून तो वारुळावर नेऊन वाढवतात. घरची पूजा आटोपल्यावर वारुळावर किंवा नागाच्या ठाण्यावर जाऊन पूजा करतात. आणि रव्याचे लाडू अर्पण करतात. घरी आल्यावर नागाला अर्पण केलेले दूध, ज्यांनी नाग काढले ते मिश्रण, भाजलेले पंच धान्य आणि फुटाणे एकत्र करून ते घरातील कानाकोपऱ्यात, अंगणात टाकतात. ज्ञात-अज्ञात सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना हा नैवेद्य.(avs 

आजच्या दिवशी माहेरवासिनी झाडाला झोपाळे बांधून झोके घेतात. नागाला भाऊ मानून त्याच्या स्तुतीचे गाणे गातात. या देवतेचे, मित्राचे आणि भावाचे उल्लेख पुराणात, लोककथांमध्ये आणि लोकगीतात आणि मूर्तिशास्त्रात  बरेच उल्लेख आलेले आहेत (या बद्दल स्वतंत्र ब्लॉग लिहेल).  लोककथेमध्ये जसा नाग सर्वांना पावला तसा  तुम्हा आम्हा पावो हीच प्रार्थना.  ( हा ब्लॉग नावासहित पुढे पाठवावा) 

मंगळवार, २१ जुलै, २०२०

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ : आनंद विजयराव साऊरकर

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ : आनंद विजयराव साऊरकर 
मानवाला अनादी काळापासून  घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं . यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात. 
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच. आनंद विजयराव साऊरकर 
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं  दीपपूजन
आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा  केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केल्या जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?आनंद विजयराव साऊरकर 
(जिवतीची सर्वत्र पूजा केल्याजाणारी प्रतिमा. अंतरजालावरून )

जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण , मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती(गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजल्या जाते. 
प्रथम भगवान नरसिंहचं  का?
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.  
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजल्या जातो. 
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  आणि कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. आनंद विजयराव साऊरकर 
नंतर येतात त्या जरा व जिवंतिका : या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या  कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. आनंद विजयराव साऊरकर 
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध - बृहस्पती.. 
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या  प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गन प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या , गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 
प्रथम रक्षक देवता, नंतर जन्माबालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. आनंद विजयराव साऊरकर 
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करून हा लेख प्रपंच थांबवतो...... 
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।