सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

विश्वेश्वर मंदिर, नागपूर

विश्वेश विश्वम्भर त्रिनेत्रधारी । तुजविण शंभो मजकोण तारी ।।

विश्वाच्या उत्पत्ती - स्थिती आणि लय या तीन अवस्थांमध्ये सर्व चराचर फिरत असतं आणि याही पलीकडे जे उरतं ते तत्व म्हणजे शिव..... दृश्य - अदृश्य सर्व चराचराला व्यापून तोच विश्वंभर ... विश्वनाथ...... रूपात नटतो..
विश्वनाथाचं मूळ स्थान महान अशा काशी क्षेत्री असलं तरी भक्ताच्या हाकेला धावून जाणारा हा भोळा देव जेथे भक्त तेथे प्रगट होतो. याच भोळ्यानाथाचं सुंदर भुवन नागपूर शहरात "विश्वेश्वर मंदिर" म्हणून प्रसिद्ध आहे.
नागपूर शहराचे राजे श्री रघुजी राजे भोसले यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले आणि १८८८ मध्ये विश्वेश्वर लिंगाची स्थापना करण्यात आली. नागपूर शहराच्या मंदिर इतिहासात या मंदिराला अत्यंत महत्व आहे. पेशवे व भोसले अशा संमिश्र स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे मंदिर.
मंदिर पूर्वाभिमुख असून भव्य अशा  प्रवेश द्वारातून आत प्रवेश करतो. मंदिराच्या चहूबाजूंनी भिंत असून उत्तर बाजूला शुक्रवारी तलाव आहे. (या तलावाला जुम्मा तालाब आणि आता गांधी सागर हि नवे आहेत.) प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने ओवऱ्या असून प्रांगणात गणपती व हनुमानाच्या देवडया आहेत.
मंदिर सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा रचनेचे आहे. सर्व बांधकाम उत्तम अशा दगडात असून सुंदर कोरीव काम केलेले आहे. सभामंडपासाठी उत्तम अशा पांढऱ्या दगडाचा वापर केलेला असून ते नेपाळ मधून मागवण्यात आलेला आहे. तर अंतराळ आणि गर्भगृहासाठी राजस्थान मधील लाल व पिवळ्या दगडांचा वापर केला आहे. गर्भगृह काहीसे खोल असून मध्यभागी विश्वेश्वराचे सुंदर लिंग आहे. मंदिरात शिव पंचायतन (अर्थात शिवलिंग, गणपती, देवी अन्नपूर्णा, श्री विष्णू आणि सूर्यनारायण )  मूर्ती आहेत. शिवलिंगाच्या मागे विशिष्ठ  असे वेटोळे घालून असलेल्या नागाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर नक्षीकाम असून द्वारपाल आहेत. बाजूनी दिव्यांसाठी बनवलेले सुंदर कोनाडे आहेत. अंतराळात नंदीची शुभ्र मूर्ती असून प्रदक्षिणा मार्गाकरिता छोटे दरवाजे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूने अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. भोसल्यांचे राज्य वऱ्हाड , छत्तीसगढ ते थेट ओडिशा पर्यंत पोहोचले असल्या मुळे तेथील संस्कृतींचा परिणाम मूर्तिकलेवर जाणवतो.

मंदिराचा चित्रप्रवास  :
१. मंदिरातील मुख्य प्रवेश दारातुन आत गेल्यावर प्रांगणातील गणपती व हनुमानाच्या देवडया:
                                                                                 ( फोटो आंतरजालावरून )
                                                                                             ( फोटो आंतरजालावरून )
२. मंदिराचा सभामंडप आणि सभामंडपातील कमानी :
                                                                                                                                                                                             ( फोटो आंतरजालावरून )
३. मंदिरातील बाहेरील बाजू :

मजबूत अशा पायावर अनेक कोन असलेल्या भिंती आणि वरती शिखर. शिखराचा बराच भाग जीर्ण झालेला असला तरी बाह्य भिंतींवरील नक्षीकाम टिकून आहे. 
येथील अधोरेखित करणारी विशेष बाब म्हणजे मंदिराच्याच बाह्य भिंतीवर असलेली मंदिराची प्रतिकृती. यात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह व त्यावरील शिखर स्पष्ट दिसत आहे. 
एखाद्या वस्तूचे अश्याप्रकारे model देण्याचा प्रयोग मी पहिल्यांदाच पहिला. 



वरील चित्रात मंदिराचे model, त्यावर असलेला भारतोलक यक्ष, त्यावर राम व लक्ष्मणाला खांद्यावर नेणारा हनुमान व त्यावर वायुविजनासाठी असलेली खिडकी. 
मंदिरातील बाह्य कोनाड्यांमध्ये गर्भगृहात असलेल्या देवतेच्या किंवा त्यांच्या परिवार देवतेचे शिल्प असतात. 
(पार्वती व गणेशाला मांडीवर घेऊन बसलेला शंकर)
४. काही विशेष शिल्पे:

           


( विमानात बसलेले श्री गणेश आणि विठ्ठल रुक्मिणी )


(श्री कृष्णाला खेळवणारी यशोदा. पोपटाशी खेळणारा बाळकृष्ण. यशोदेच्या नाकातील नाथ सुद्धा स्पष्ट दिसते)
                                                           (फोटो आंतरजालावरून )
( नववारी  पैठणी नेसलेली सालंकृत ललना.)


( मंदिराच्या बाहेरील भिंतींवर असलेले विविध शिल्प. डावीकडून १. घडा घेतलेली स्त्री, २. नागपुरुष, ३. गोल टोपी;पायघोळ झगा आणि चुडीदार घातलेला उत्तर हिंदुस्थानी पुरुष, ४. अंगरखा आणि दुटांगी धोतर नेसलेला पुरुष )


( १. चराचराच्या उद्धाराच्या विचारात असलेले ऋषीश्वर, २. हाती पानं - फुलांचा गुच्छ घेतलेला शेतकरी दादा )


( तलम कोट, हातात छडी आणि डोक्यावर तिरकस अशी टोपी घातलेला एक परदेशी )

                                                                                                                        (फोटो आंतरजालावरून )
(संपूर्ण मंदिराचा landscape )
विदर्भाची राजधानी नागपूर  नगरीत विसावलेल्या या विश्वंभराचं सर्वांनी दर्शन घ्यावं आणि मंदिर स्थापत्याचा आस्वाद घ्यावा. 
या श्रावण मासाच्या पावन पर्वावर विश्वनाथ विश्वंभर आपणा सर्वांना सुखी ठेवो हिच प्रार्थना.... 

तेजोमयं सगुणनिर्गुणमद्वितीयं

आनन्दकन्दमपराजितमप्रमेयम् |
नागात्मकं सकलनिष्कलमात्मरूपं
वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथम् ||




रविवार, १६ जून, २०१९

सौभाग्य सोहळा : वटवृक्ष

भारतीय संस्कृती आणि जनमानसातील आस्था हे काहीतरी अजब रसायनचं आहे. विविध देवी-देवतांवर प्रचंड श्रद्धा, आस्था , विश्वास असणारा भारतीय समाज, सोबतच पर्यावरणातील विविध घटकांवरही तेव्हढ्याच आपुलकीने प्रेम करतो आणि पूजनही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणत वृक्षांना आपल्या परिवारात नव्हे तर परिवार देवतांमध्ये सुद्धा स्थान  दिले. याच अद्वितीय परंपरेचा भाग म्हणजे वेगवेगळ्या आशयाने केले जाणारे वृक्ष पूजन. 
या वृक्ष पूजा परंपरेतला अगदी जवळचा, जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे जेष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाणारे वटसावित्री पूजन. 
वृक्षांच्या ठायी देवी-देवतांचा वास असतो असे आपण मानतो आणि विविध वृक्ष हे आराध्य वृक्ष म्हणून मान्य होतात. अशा सर्व आराध्य वृक्षांमध्ये महत्वाचे स्थान  टिकून ठेवले ते वट वृक्षाने. हा वृक्ष चिरंजीव आहे, अक्षय आहे, सदोदित वृद्धिंगत होणार आहे, स्वतःच्या फांद्या, पारंब्यांमधून विस्तार करणारा आहे आणि चिरकाल टिकून राहणारा आहे. या सर्व गुणांमुळेच त्याचा संबंध सौभाग्य व्रताशी लावण्यात आला असेल. स्त्रियांचे सौभाग्य सुद्धा या वृक्षाप्रमाणे अक्षय व चिरकाल टिकणारे असावे हाच यातील परस्पर संबंध असेल. 
पौराणिक कथेनुसार याच वृक्षाखाली सत्यवानाचा प्राण गेला व त्यानंतर सावित्रीने यमाचा पाठपुरावा करून आपल्या पतीला परत आणले. हिंदू धर्मात नव्हे तर जैन व बुद्ध परंपरेत सुद्धा वटवृक्ष आपले स्थान टिकवून आहे. 
आयुर्वेदात सुद्धा वडाला अतिशय गौरवले गेले आहे. वडाची पाने, मुळे , खोड, साल, पारंबी, फळे, नवीन आलेला अंकुर इतकेच काय झाडातून किंवा पाने तोडल्यावर येणार चिक सुद्धा औषधी गुणांनी युक्त  आहे. अशा या सर्व गुण संपन्न वृक्षाला देवतेचा दर्जा मिळणे हे काही नवल नाही. या झाडाचे गुण  सर्वांना कळावे, त्याचे संवर्धन व्हावे यासाठीच त्याला देवता रूप मानले आणि त्याची स्तुती केली:
वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः।
वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता।।
हा वृक्ष आपल्या पूर्वजांनी अत्यंत आत्मीयतेने जोपासला कारण या वृक्षामुळे पर्यावरणाला पूरक वातावरण मिळतेच त्याच सोबत दाट  सावली, विविध औषधी, दूर व खोलवर रुजलेल्या मुळांमुळे जमिनीची धूप कमी होते, प्राणीमात्रांना आवश्य असलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर हाच वृक्ष देतो. मानव जातीवर या वृक्षाचे अनंत उपकार आहेत आणि आपण ते स्वीकारले पाहिजेत. 
आज बहुतेकांना वृक्ष पूजा, वट पूजा थोतांड वाटते परंतु त्याचा मूळ उद्देश वृक्ष संवर्धन, वृक्ष प्रेम आणि नवीन पिढीला वृक्षांबद्दल त्यांच्या गुणांबद्दल माहिती व्हावी हाच आहे. आज अनेक संस्था झाडे लावा,झाडे जगवा किंवा झाडांबद्दल जनजागृती करतात. परंतु आपल्या पूर्वजांनी तर झाडे लावायला आणि त्यांचे संवर्धन करायला शिकवले; त्याच शिक्षणाचा भाग म्हणजे वटपूजन  .. .. .. .. 
या व्रताचा उद्देश स्त्रियांना सौभाग्य प्रदान करण्याचा जरी असला तरी या वृक्षामुळे त्याच्या संवर्धनामुळे प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाला मदत होईल आणि वसुंधरेचे आणि पर्यायाने सर्व प्राणिमात्रांचे सौभाग्य उजळेल हीच आशा. या पावन पर्वावर एक तरी वृक्ष लावूया, संवर्धन करूया. 
जसा वड सावित्रीस फळला, पावला, सौभाग्य देता झाला तसा तुम्हा आम्हा पावो हीच प्रार्थना. . . . .. . . . .  

शुक्रवार, १७ मे, २०१९

विदारूनिया स्तंभ प्रगटला लक्ष्मीकांत

(केवल नरसिंह, प्रल्हाद, माता कयाधू , दशावतार मंदिर, अमरावती (महा.))

आज वैशाख शु. चतुर्दशी..... भगवान नरसिंहांचा आविर्भाव दिन. दुर्दम्य इच्छाशक्ति आणि उत्कट भगवत भक्ती यांच्या जोरावर कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी भगवंत कुठेही आणि कोणत्याही रूपात अवतरित होऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतात हाच या अवताराचा मुख्य गाभा..... 
श्री हरीच्या अनेक अवतार होतात आणि होतंच राहणार. त्यातील मुख्य दहा अवतारांपैकी चौथा अवतार म्हणजे श्री नरसिंह भगवान.. 

आपल्या लहान भावाला 'हिरण्याक्षाला' विष्णूने कपटाने मारले म्हणून विष्णूवर प्रचंड चिडलॆला हिरण्यकश्यपू उग्र तपश्चर्या करतो व अलौकिक वरदान प्राप्त करून घेतो; कि त्याला देव, दानव, मानव, यक्ष, गंधर्व, राक्षस, पशु, पक्षी या कोणापासूनही मृत्यूभय नसावं. त्याच प्रमाणे दिवसा अथवा रात्री, अस्त्र अथवा शस्त्राने, आकाशात अथवा जमिनीवर मला मृत्यू येऊ नये. या   वरदानानंतर हिरण्यकश्यपू अत्यंत उन्मत्त झाला. त्याने सर्व देव देवतांना, ऋषि मुनींना, मानव जातीला त्राही भगवान करून सोडले. परंतु इतक्याही शत्रूच्या घरात भागवत भक्त प्रल्हाद जन्माला आला. तो विष्णूचा परम भक्त होता.  आपला पुत्र आपल्याच शत्रूचा भक्त आहे हे , हे पाहताच हिरण्यकश्यपू त्याचा अतोनात छळ करू लागला. या सर्व आपदांपासून तरून  गेलेल्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपू विचारतो 'कुठे आहे तुझा विष्णू. तेव्हा प्रल्हाद वडिलांना चराचरात भगवंत आहे सांगतो. असे म्हणताच हिरण्यकश्यपू खांबावर प्रहार करतो आणि म्हणतो यात आहे का देव. त्याच वेळी प्रचंड गर्जना करत, विक्राळ असे रुपधारण केलेल्या, धड मनुष्याचे व सिंह वंदन असलेले श्री नरसिंह भगवान प्रगट होतात आणि हिरण्यकश्यपू सोबत युद्ध करतात. ऐन संध्याकाळी म्हणजेच ना दिवस ना रात्र, घराच्या उंबरठयावर म्हणजेच घरात नाही आणि बाहेरही नाही, देवांच्या मांडीवर म्हणजेच जमिनीवर नाही आणि आकाशात सुद्धा नाही, ना शस्त्राने ना अस्त्राने तर आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा वध  करतात. 
सर्व देवी देवता आणि भक्त प्रल्हाद देवाची स्तुती करतात 
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥
भारत वर्षात नरसिंह भगवान अनेक ठिकाणी पुजल्या जातात. विशेषतः दक्षिण भारतात नरसिंहाचे जास्त मंदिरे आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही नरसिंहाची प्रसिद्ध मंदिरे आहेत जसे :
१. ज्वाला  नरसिंह कोळे नरसिंहपूर वळवा  जि. सांगली. 
२. नीरा नरसिंहपूर ता. इंदापूर जि. पुणे. 
३. पोखर्णी, जि . परभणी. 
४. मेहेकर जि . बुलढाणा. 
५. देऊळवाडा ता. चांदुर बाजार जि. अमरावती. 
६. रामगिरी, रामटेक जि. नागपूर. (इथे केवळ नृसिहाची तीन मंदिरे आहेत, मंदिर निर्माण प्रक्रियेतील प्राथमिक स्वरुपालीतील अर्थात सर्वात प्राचीन मंदिरे मानल्या जातात)
वज्रनखाय विद्महे तीक्ष्णदंष्ट्राय धीमहि ! तन्नो नृसिंह: प्रचोदयात।।
विष्णूचे हे कल्पनातीत रूप  मानवी उत्क्रांतीच्या चौथ्या टप्याचे तर ध्योतक नसेल? ज्यात मनुष्य आणि पशूंचे गुणमिलन संभवते. मनुष्याने शिकार करून आपला उदरनिर्वाह करणे, शिकार करण्यासाठी पुरेश्या प्रगत हत्यारांची उपलब्धता नसणे आणि आवश्यकता असतांना उग्ररूप प्रगत करणे व कार्यभार आटोपताच अभयंकर असे सौम्य रूप धारण करणे, हेच तर या अवताराच्या वर्णनातून प्राचीन साहित्यिकांना आपल्यासमोर मांडायचे नसेल ना?