शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

नमस्कार त्या सूर्यनारायणासी....

आदि देव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर:।

दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तुते ।।

चराचराचे पोषण करणारा आणि सर्वदा दृश्यमान ईश्वर अर्थात भगवान सूर्य. आपल्या सहस्त्र किरणांनी सर्व जगताला नियंत्रित करणारा , पोषण करणारा आणि आशीर्वच देणारा भगवान सुरुवातीपासूनच मानव जातीला पूजनीय ठरला. पृथ्वीवरील सर्व संस्कृतींना या दृश्यमान देवाने वेड लावले आणि दैनिक उपासनेत, स्मरणात स्थान निर्माण केले. भारतीय महानुभावांनी तर या देवतेचा उदोउदोच केला व ज्योतिष्य, व्याकरण, वाङ्मय, गायन आणि काळ या सर्वांचा अधिष्ठाता या पदावर विराजमान देखील केले.  
भारतात आसेतुहिमाचल सूर्य पूजन अगदी पुराण  काळा  पासून ते आजतागत सुरूच आहे. कोठे ते मूर्ती पूजेच्या रूपाने असेल तर कुठे नजरेसमोर साक्षात दिसणाऱ्या रूपाने असेल. संध्यासमयी केलेले पूजन असेल अथवा स्त्रियांनी कल्पकतेने साकारलेल्या आदित्य राणूबाईच्या रूपाने केलेले वंदन असेल. या देवतेने अखिल चराचराला आपल्यासमोर नतमस्तक केले हे खरे. 
पुराण, वाङ्मय, लोककला, लोकगीते, लोककथा, यातून सूर्य देवतेचे गुणगान भरपूर प्रमाणांत आढळून येतेच. त्याचबरोबर शिल्पशास्त्रात सुद्धा या देवतेने मनाचे स्थान कमावले. 
सूर्यदेवतेच्या शिल्पांचा विशेषतः विदर्भात आढळणाऱ्या काही सूर्य प्रतिमांचा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच... 

( दृष्यमान स्वरूपात दिसणारा तेजस्वी देव जो चराचरावर आपल्या सहस्त्र रश्मीने मायेचे व पोषणाचे वस्त्र पांघरतो .)



( सात घोड्यांच्या रथावर उभी असलेली व्दिभुज सूर्य प्रतिमा. प्रतिमा सुंदर अलंकारांनी नटलेली आहे. दोन्हीही हातात कमल पुष्प धारण केलेले आहे. (मार्कंडा मंदिर, मार्कंडा, जिल्हा चंद्रपूर) ) 
( एकचक्राच्या रथात बसून संपूर्ण ब्रह्माण्डाचे नियंत्रण करणारा आदित्य सोबत पांगुळा सारथी अरुण. पवनी,जिल्हा भंडारा येथील स्तंभावरील आहेत.)
(सूर्य प्रतिमा, नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती, खंडेश्वराच्या मुख्य मंदिराच्या एका गाभाऱ्यात हि प्रतिमा ठेवली आहे, मूर्तीची बरीच झिज झालेली आहे. )
( सप्तअश्वारुढ सूर्य देवाची हि अत्यंत रमणीय आणि वैशिष्ठ्यपूर्ण मूर्ती. या एकाच प्रतिमेत सूर्यदेवाला उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिदेवतांच्या रूपात पालनकर्ता या रूपात दाखवले आहे. या मूर्तीला ब्रह्मेशानजनार्दनार्क प्रतिमा म्हणतात अर्थात ब्रह्मा, विष्णू, ईशान (शिव) आणि अर्क (सूर्य) एकाच मूर्तीमध्ये विराजमान असतात. हि मूर्ती अष्टभुज असून माला, कमलपुष्प, अक्षसूत्र, चक्र, कमंडलू धारण केलेला आहे. दोन हात भग्न असून या हातात शंख व त्रिशूल असावा. सोबत रथाचा सारथी अरुण, पत्नी छाया, आणि इतर परिवार देवता आहेत. या मूर्तीचे आणखी एक विशेष म्हणजे मुर्तीकाराने सूर्याला पर्शियन पद्धतीचा boot घातलेला दिसतो.)

( पौष महिन्यात दार रविवारी महिला घरात देवाजवळ अथवा तुळशीजवळ रक्तचंदनाने अथवा रांगोळीने आदित्य व राणूबाई यांच्या प्रतिमा रेखाटतात. बोर, ऊस, वाटाणा, वाल, पेरू, गाजर, गव्हाची उम्बी, लाल फुल वाहून जगत्पालकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. )

( रथसप्तमीला घरोघरी पूजाला जाणारा एकचक्रधर देव अर्थात श्री सूर्यनारायण .)
देवादिदेव म्हणून पूजाला जाणारा भगवान तुम्हा आम्हां सर्वांना पावो व सर्वांवर कृपेचा वर्षाव करो हीच प्रार्थना. 

ॐ भास्कराय विद्महे । महाद्युतिकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात्॥

३ टिप्पण्या: