शनिवार, २५ जुलै, २०२०

चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

 चला जाऊ वारुळाला, नागोबाला पुजायला : आनंद साऊरकर

विश्वातील प्रत्येक जीव, चेतन- अचेतन आणि हे अवघे चराचर हे एकमेकांशी एका अदृश्य बंधनाने जोडलेले आहेत. हाच परस्पर संबंध वर्षानुवर्षे नानाविध माध्यमांतून आपण जपत आलोय. याच संबंधांना दृढ करण्याकरिता, परस्परांचा आदर करण्याकरिता, चराचरातील प्रत्येक घटकांचं पूजन करण्याची चीनच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत रूढ झाली. भारतीय संस्कृतीत चंद्र - सूर्य ते अगदी नदी, पर्वत, वृक्ष, प्राणी पक्षी यांची सुद्धा निरनिराळ्या सणांना पूजा  त्यांचा सन्मान केला जातो. याच पूजन शृंखलेतील सण "नागपंचमी".आनंद साऊरकर

श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात. वातावरणाच्या अनुकूलतेमुळे या काळात नागांचा सर्वत्र वावर पाहायला मिळतो. आपल्यापासून निदान या काळात तरी  त्यांना त्रास होऊ नये म्हणून पूर्वजांनी त्यांचे पूजन याच महिन्यात करण्याची पद्धत प्रचारात आणली, किती हा पर्यावरणाचा आणि प्राणी जगताचा विचार !!!

महर्षी काश्यप यांच्या कद्रू नावाच्या पत्नीपासून या नागकुळाची उत्पत्ती झाली असे मानतात. पुरातन वाङ्मयात अनेक ठिकाणी नागांचा, नागकुलाचा उल्लेख आढळतो. कधी स्वतंत्र देवता म्हणून तर कधी मुख्यदेवतांच्या परिवारदेवता किंवा सेवक देवता म्हणून उल्लेख आढळतो. मूर्ती शास्त्राने  सुद्धा या देवतेची विशेष दखल  घेतली आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये द्वारपाल समूहात किंवा स्वतंत्रपणे नागांच्या प्रतिमा चितारलेल्या आढळतात. (avs

पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्वाचा असा घटक असलेला हा साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा गौरवला जातो. तर ग्रामीण स्त्रिया याला आपला बंधू मानतात. यामुळेच ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी वर्गात नाग पूजनाची प्रथा चालत आलेली आहे. नागपंचमीला निरनिराळ्या भागात वेग वेगळ्या पूजा पद्धती आढळून येतात. त्यातीलच प्राचीन अशी नागकुल पूजन काही ठिकाणी पाहायला मिळते.(avs

पुराणात नऊ नागकुळ प्रसिद्ध आहेत : 

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा

एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll

या मंत्रात अनंत, वासुकी इत्यादी नऊ नागकुळांचा उल्लेख आहे. पुराणात या सर्व नागांच्या विविध कथा आढळतात. काही ग्रंथांमध्ये हि नऊ नावे थोडीफार बदललेली आढळतात परंतु सर्वत्र नऊ कुळे आहेतच. ह्याच नऊ कुळांची पूजा नागपंचमीला करतात. आमच्याकडेही नागकुळं पूजन असते, त्याची हि थोडक्यात माहिती. 

नागाची प्रतिमा: भिंतीवर गेरूच्या साह्याने वर चौकोनी आणि त्याला लागूनच खाली गोलसर असा आकार काढून सारवून घेतात, ही  झाली नागांची बैठक. त्यानंतर आवं (न तापवलेले ) दूध आणि तूप यांचा मिश्रण बनवतात. काडीला कापूस गुंडाळून ह्या मिश्रणाच्या साह्याने वरील चौकोनी भागात नऊ नाग साधारण वीतभर लांबीचे, एका रांगेत थोडे अंतर ठेऊन  काढतात. त्यांच्या पोटात अर्थात दोन नागांच्या मध्ये एकूण पाच छोटे नाग काढतात, हे नागाची पिल्ले. खालच्या गोलभागात नऊ वेटोळे असलेली पद्मिणी  नागीण काढतात. तिच्या बाजूला तिच्या दासी सुद्धा रेखाटतात. (avs) 

(भिंतीवरील नाग प्रतिमा, फुलोरा आणि सर्वसाधारण नागकुळाचे रेखाटन)(avs

पूजन : नागांचे षोडोपचारे पूजन केल्या जाते. पूजनात सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र व पोवते मुख्यत्वे वापरतात. प्रत्येक नागाला आणि पद्मिणीला स्वतंत्र  सूत -पुतळ्या, कापसाचे वस्त्र आणि नऊ पदराचे पोवते अर्पण करतात. तसेच पाच पदराचे पोवते नागबाळ यांना वाहतात. पद्मिणी नागिणीच्या ज्या दासी आहेत त्यांना पाच पदराचे पोवते, कपासवस्त्र अर्पण करतात. पूजनात  ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या फुलांचा वापर करतात. आघाडा, केना, बिल्वपत्र आणि फुले यांचा वापर करून माळ तयार केली जाते व नागकुळाला अर्पण केली जाते. आनंद साऊरकर

नैवेद्य: पाच प्रकारचे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, हरबरा आणि तीळ हे भाजून घेऊन याच्या लाह्या तयार करतात. ह्या लाह्यांचा व फुटाणे याचा नैवेद्यात आवर्जून वापर करतात. नऊ पुरिका (रव्याच्या पापड्या), नऊ करंज्या, वेणी-फुगी यांचा फुलोरा नागकुळावर टांगतात. काहीठिकाणी वाफवलेले, तर कुठे तळलेले पदार्थ स्वयंपाकाला बनवतात. स्वयंपाकात मेथीची भाजी आणि रव्याचा शिरा मुख्य असतो. तव्याचा वापर सुद्धा बरेच ठिकाणी करत नाहीत. नागकुळाला रव्याचे दोन लाडू बनवून त्याचा नैवैद्य घरी दाखवून ते वारुळावर अर्पण करतात. शेवटी नागाला विडा- सुपारी अर्पण करतात. कुठे नारळ अर्पण करून तो वारुळावर नेऊन वाढवतात. घरची पूजा आटोपल्यावर वारुळावर किंवा नागाच्या ठाण्यावर जाऊन पूजा करतात. आणि रव्याचे लाडू अर्पण करतात. घरी आल्यावर नागाला अर्पण केलेले दूध, ज्यांनी नाग काढले ते मिश्रण, भाजलेले पंच धान्य आणि फुटाणे एकत्र करून ते घरातील कानाकोपऱ्यात, अंगणात टाकतात. ज्ञात-अज्ञात सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना हा नैवेद्य.(avs 

आजच्या दिवशी माहेरवासिनी झाडाला झोपाळे बांधून झोके घेतात. नागाला भाऊ मानून त्याच्या स्तुतीचे गाणे गातात. या देवतेचे, मित्राचे आणि भावाचे उल्लेख पुराणात, लोककथांमध्ये आणि लोकगीतात आणि मूर्तिशास्त्रात  बरेच उल्लेख आलेले आहेत (या बद्दल स्वतंत्र ब्लॉग लिहेल).  लोककथेमध्ये जसा नाग सर्वांना पावला तसा  तुम्हा आम्हा पावो हीच प्रार्थना.  ( हा ब्लॉग नावासहित पुढे पाठवावा) 

१३ टिप्पण्या:

  1. खूप छान अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतंय आपण

    उत्तर द्याहटवा
  2. Khup Chan lihile, June sandarbh deun, ani agdi aaichi puja nagpanchmi chi puja athvali

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान माहिती मिळाली. अशीच आपल्या पारंपारिक सणांची शास्त्रशुद्ध माहितीची मेजवाणी देत जावी ही विनंती . खूप खूप धन्यवाद .

    उत्तर द्याहटवा