शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर दुसरी माळ - ब्रह्मचारिणी : आनंद साऊरकर

देवीचे दुसरे रूप म्हणजे 'देवी ब्रह्मचारिणी'. इथे ब्रह्म या शब्दा चा अर्थ तपस्या/ तप असा असून आचारिणी 
म्हणजे आचरण करणारी असा आहे. म्हणूनच ब्रह्मचारिणी म्हणजे 'तापाचे आचरण करणारी'. ब्रह्मचारीणीचे स्वरूप जोतिर्मय असून सर्वव्यापी आहे.

                                    दधाना कर पद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। 
                                    देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥

देवीच्या उजव्या हातात जपमाळ असून डाव्या हातात तिने कमंडलू धारण केला आहे. 
या देवी नामाच्या उत्पत्तीची कथा अशी की:
पूर्वजन्मातील सतीने हिमालयाचे घरी जन्म घेतल्यानंतर नारदांच्या मार्गदर्शनाने भगवान महादेव आपल्याला पती रूपात लाभावे म्हणून या कन्येने अत्यंत कठीण अशी तपश्चर्या आरंभली. एक हजार वर्षे केवळ कंदमुळे खाऊन तपस्या केली. नंतर शंभर वर्षे केवळ पाने खाऊन तपस्या केली. पुढील काही वर्षे केवळ जमिनीवर गाळून पडलेली बिल्वपत्रे खाऊन व्यतीत केली आणि नंतर तिने पाने खाणेही सोडून दिले आणि निराहार राहून तपस्या केली.  तिने आरंभलेल्या अशा दुष्कर तपश्चर्येमुळे तिला 'ब्रह्मचारिणी' असे नामाभिधान प्राप्त झाले. 
याच तपश्चर्येच्या काळात तिने पाने (पर्ण) खाणेही सोडल्यामुळे तिचे एक नाव 'अपर्णा' म्हणून पण प्रसिद्ध झाले. 
तिच्या अशा उग्र तपश्चर्येमुळे तिचे शरीर अत्यंत कृश  झाले. आपल्या कन्येची अशी दशा पाहून, तिचे माता मैनावती अत्यंत दुखी झाली. आपल्या कन्येला या घोर तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी मैनावतीने तिला आवाज दिला "उ  मा" म्हणजे "अरे नाही !" आणि त्या आवाजामुळे देवी ब्रह्मचारिणी 'उमा' या नावाने सुद्धा ओळखली जाऊ लागली. 
अशा या बह्मस्वरूपिणीआणि दुसऱ्या माळेच्या देवीला, ब्रह्मचारीणीला त्रिवार वंदन.

 

५ टिप्पण्या: