भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृती प्रधान देश. भारतीय संस्कृतीची खरी ओळख होते ती सर्व प्राणिमात्रांमध्ये देवत्व अनुभवण्याच्या उदात्ततेवरून. याच उदात्त भावनेतून, दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या, उपयोगात येणाऱ्या सर्व सजीव-निर्जीवांत देवत्व असल्याचे मान्य करतो आणि आचरणात सुद्धा आणतो.
याच विचारांनी प्रेरित होऊन , भारतीय पौराणिक व्यक्तींनी गाईच्या ठिकाणीसुद्धा देवत्व कल्पून तिला देवतेचा मान दिला. केवळ मान देऊनच आपली संस्कृती थांबली नाही तर गाईच्या प्रत्येक अवयवावर देवतेचा वास आहे असेही ठासून सांगितले. गाय हि आपले भरण-पोषण करते म्हणून, गाईच्या दुधाला अमृताची सर असल्यामुळे, गाईच्या खिल्लारांनी शेतीस मदत होत असल्यामुळे, तिला मातृत्वाची उपाधी देण्यात आली आणि गाय ही पशु न राहता 'गोमाता' झाली.
लोकसंस्कृतीमध्ये गाईचे वर्णन बरेचदा येते. त्याचेच उदाहरण म्हणजे गाईला उद्देशून उच्चारल्या जाणाऱ्या पुढील ओळी .
गाई गाई गोमती, गाईचे शिंगे गंगोत्री । चरे भीमापुरी, राखे विठ्ठल हरी ।।
पाठीवर सरस्वती, शेणामध्ये लक्ष्मी । गोमुत्रात सप्तऋषी, दर्शन घेता घडे काशी ।।
अशा या बहुउपयोगी, मातृत्वातूल्य गाई प्रति कृतज्ञ होण्याचा दिवस म्हणजे " गोवत्सद्वादशी ".
अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हणून ओळखतात.
योगायोग पहा,
संपूर्ण आश्विन महिनाच मातृत्व पूजनाचा आणि सन्मानाचा महिना आहे. अगदी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून ते थेट आश्विन अमावसेच्या लक्ष्मी पूजनापर्यंत. अर्थात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत शक्ती देवतेचे पूजन, आश्विन शुद्ध पंचमी ते पौर्णिमा विद्या देवता सरस्वतीचे पूजन, पौर्णिमा (कोजागिरी)ला लक्ष्मी-इंद्र अर्थात राज्य लक्ष्मीचे पूजन, आश्विन कृष्ण अष्टमी (कराष्टमी)- संतान लक्ष्मीचे पूजन, आश्विन कृष्ण द्वादशी- गोपूजन अर्थात पोषण देवतेचे पूजन आणि आश्विन अमावसेला लक्ष्मी-कुबेर अर्थात धनलक्ष्मीचे पूजन. या सर्व देवदेवतेंच्या पूजनात गोमातेलाही स्थान देऊन, भारतीय संस्कृतीने आपल्या उदात्ततेचा परिचय दिला आहे.
गोवत्स द्वादशीला सकाळी वत्सासह गाईला न्हाऊ घालतात, तिला विविध रंगाच्या गोंदणांनी सजवतात. गोधुल वेळेला औक्षण करून बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून अर्पणकरतात व तिची आराधना करतात कि ' हे गोमाते, तुझ्याच परिवारासारखा आपचा परिवार फुलू दे. आजपर्यंत तू आमचे पालन-पोषण केले तसेच पुढेही होवो आणि चिरंतन आरोग्याचे आमच्या पदरी पडू दे!!!'.
आपण सर्व हीच प्रार्थना करूया आणि गोसंवर्धनाचा, गोपूजनाचा वसा घेऊया . . . . . . . . .
जय गोमाता!!!!!!
Khup Chan
उत्तर द्याहटवाVery 👍 🙂 Nice
उत्तर द्याहटवाKhup mahitipurna lekh, asech lohit raha 👏🏼👏🏼👏🏼
उत्तर द्याहटवाApratim
उत्तर द्याहटवाआनंद तू खूपच सुंदर माहिती दिली आहे
उत्तर द्याहटवाअभिनंदन.