नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माउली ज्ञानगंगा ।
नमो पुंडलिका नमो चंद्रभागा । नमस्कार माझा माझा संता अनेका।।
अबीर आणि गुलालाची उधळण करत, अंगावर आषाढाच्या चिंब करणाऱ्या पर्जन्य धारा झेलत, टाळ मृदूंगाच्या जयघोषात देहभान हरपून धुंद होतो वारकरी .... ....
जेष्ठांची पौर्णिमा झाली कि सर्व विठ्ठल भक्तांना वेध लागतात ते वारीचे. वरीला वारंवार जातो तो वारकरी नव्हे तर जो वरवरचा देव न मानता मनापासून आणि चराचरात देव अनुभवतो - जगतो तो वारकरी. . . . . . .
या वारकऱ्यांना वेध लागतात ते 'सावळे सगुण मानस मोहन ' अशा विठू रायाचे.. . . . .
तो कानडा विठ्ठल, युगानुयुगे भक्तांच्या प्रेमापोटी, त्यांची वाट पाहात कटीवर हात ठेवून पंढरपूर क्षेत्री विसावला आहे. जसे त्याला भक्तांचे वेड, तसेच त्यांच्या भक्ताला विठूचे वेड..... एकदा जो विठ्ठलाला भेटतो तो विठ्ठलमय होऊन जातो....
त्याच वेडाच वर्णन करतांना माउली म्हणतात..
'कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू , तेणे मज लावियेला वेधू '
शांतीब्रह्म एकनाथ या अनुभवाचे वर्णन करतांना आपल्या भारुडात म्हणतात...
'या या शेजारणीने बरं नाही केलं गं बया
मला पंढरीला नेलं गं बया '. . . .
याच वेधाबद्दल , जगद्गुरू तुकोबा म्हणतात
'पंढरीचे भूत मोठे आल्यागेल्या झडपी वाटे '. . . . .
सर्वांना वेड लावणारा विठोबा आहे तरी कसा...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया....
पांडुरंगाने महाराष्ट्रातील संतांनाच नव्हे तर पुराणिकांपासून सर्वां वरच गारुड घातलंय ....
समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् ।
तरुणतुलसिमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विट्ठलं चिन्तयामि ॥
( ज्याची चरण कमळे समस्थितीत आहेत, जो जळणे भरलेल्या निळ्या मेघाच्या वर्णाचा आहे , ज्याने आपले दोन्ही हात कंबरेवर ठेवलेले आहेत, जो सर्व अलंकरणाचे अलंकरण आहे, ज्याने आपल्या कंठात कोवळ्या तुळसीची माळ परिधान केली आहे,, ज्याचे नेत्र कमळासारखे आहे आणि जो आपल्या मुखावर कृपेचे धवल हास्य खेळवीत आहे, त्या विठ्ठलाचे मी चिंतन करतो..)
श्रीमद आद्य शंकराचार्य पंढरीला आले असता, त्यांना पांडुरंग कसा दिसला याचं सुंदर वर्णन त्यांनी आपल्या पांडुरंगाष्टकम या रचनेत पुढील प्रमाणे करतात.....
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।
पंढरीचा महिमा थोर आहे. सर्व संत श्रेष्ठींनी याचे अपरंपार वर्णन केले आहे. या क्षेत्रीचा राणा वारकऱ्यांच्या जिवलग सखा पांडुरंगाकडे एकाच मागणं मागुया कि या आषाढीच्या पावन पर्वावर विठ्ठला सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभो, विविध स्थरावरील क्लेश मिटून मैत्रीपूर्ण वातावरणात तुझी लेकरे नांदो हीच प्रार्थना....
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निधान पांडुरंग ।।
सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाBhot sahi👌👌👌👌
उत्तर द्याहटवा