मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : सहावी माळ : कात्यायनी - आनंद साऊरकर


नवदुर्गेचे सहावे स्वरूप आहे ... देवी कात्यायनी...

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी ॥

या देवीविषयी आख्यायिका अशी:
पुराणकाळात कत नामक ऋषि होऊन गेले. त्यांचा पुत्र कात्य. या कात्य गोत्रात महर्षि कात्यायनांचा जन्म झाला. देवी भगवतीच्या आपल्या पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा म्हणून यांनी बरेच वर्षे देवीची आराधना केली. देवीने प्रसन्न होऊन त्यांना इच्छित वर दिला.
महिषासुर युद्धाच्या वेळी दुर्गेला साह्य करण्यासाठी या देवीने अवतार घेतला. महर्षि कात्यायन यांनी देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून "" कात्यायनी""...

या देवीचा उल्लेख देवी भागवत, मार्कंडेय पुराण आणि श्रीमद भागवत पुराण यात आला आहे. ही देवी व्रजमंडलाची अधिष्ठात्री देवी आहे. भगवान श्रीकृष्ण पतिरुपाने लाभावे या करता समस्त गोपींनी यमुनेच्या तटावर या देवीची आराधना केली होती..

देवीचे स्वरूप अत्यंत भव्य व दिव्य असून, सुवर्णा प्रमाणे तेजस्वी वर्ण आहे. सिंह वाहिनी देवी चातुर्भुजा असून उजव्या हातात तलवार व कामलपुष्प धारण केलं आहे. डावीकडील वरचा हात अभयमुद्रेत तर खालचा हात वरदमुद्रेत आहे.

देवी कात्यायनी आपल्याला वरदायिनी ठरो हीच प्रार्थना....
परमानन्दमयी देवि परब्रह्म परमात्मा ।
परमशक्ति,परमभक्ति, कात्यायनसुते नमोऽस्तुते ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा