भारतीय संस्कृती आणि जनमानसातील आस्था हे काहीतरी अजब रसायनचं आहे. विविध देवी-देवतांवर प्रचंड श्रद्धा, आस्था , विश्वास असणारा भारतीय समाज, सोबतच पर्यावरणातील विविध घटकांवरही तेव्हढ्याच आपुलकीने प्रेम करतो आणि पूजनही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणत वृक्षांना आपल्या परिवारात नव्हे तर परिवार देवतांमध्ये सुद्धा स्थान दिले. याच अद्वितीय परंपरेचा भाग म्हणजे वेगवेगळ्या आशयाने केले जाणारे वृक्ष पूजन.
या वृक्ष पूजा परंपरेतला अगदी जवळचा, जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे जेष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाणारे वटसावित्री पूजन.
वृक्षांच्या ठायी देवी-देवतांचा वास असतो असे आपण मानतो आणि विविध वृक्ष हे आराध्य वृक्ष म्हणून मान्य होतात. अशा सर्व आराध्य वृक्षांमध्ये महत्वाचे स्थान टिकून ठेवले ते वट वृक्षाने. हा वृक्ष चिरंजीव आहे, अक्षय आहे, सदोदित वृद्धिंगत होणार आहे, स्वतःच्या फांद्या, पारंब्यांमधून विस्तार करणारा आहे आणि चिरकाल टिकून राहणारा आहे. या सर्व गुणांमुळेच त्याचा संबंध सौभाग्य व्रताशी लावण्यात आला असेल. स्त्रियांचे सौभाग्य सुद्धा या वृक्षाप्रमाणे अक्षय व चिरकाल टिकणारे असावे हाच यातील परस्पर संबंध असेल.
पौराणिक कथेनुसार याच वृक्षाखाली सत्यवानाचा प्राण गेला व त्यानंतर सावित्रीने यमाचा पाठपुरावा करून आपल्या पतीला परत आणले. हिंदू धर्मात नव्हे तर जैन व बुद्ध परंपरेत सुद्धा वटवृक्ष आपले स्थान टिकवून आहे.
आयुर्वेदात सुद्धा वडाला अतिशय गौरवले गेले आहे. वडाची पाने, मुळे , खोड, साल, पारंबी, फळे, नवीन आलेला अंकुर इतकेच काय झाडातून किंवा पाने तोडल्यावर येणार चिक सुद्धा औषधी गुणांनी युक्त आहे. अशा या सर्व गुण संपन्न वृक्षाला देवतेचा दर्जा मिळणे हे काही नवल नाही. या झाडाचे गुण सर्वांना कळावे, त्याचे संवर्धन व्हावे यासाठीच त्याला देवता रूप मानले आणि त्याची स्तुती केली:
वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः।
वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता।।
हा वृक्ष आपल्या पूर्वजांनी अत्यंत आत्मीयतेने जोपासला कारण या वृक्षामुळे पर्यावरणाला पूरक वातावरण मिळतेच त्याच सोबत दाट सावली, विविध औषधी, दूर व खोलवर रुजलेल्या मुळांमुळे जमिनीची धूप कमी होते, प्राणीमात्रांना आवश्य असलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर हाच वृक्ष देतो. मानव जातीवर या वृक्षाचे अनंत उपकार आहेत आणि आपण ते स्वीकारले पाहिजेत.
आज बहुतेकांना वृक्ष पूजा, वट पूजा थोतांड वाटते परंतु त्याचा मूळ उद्देश वृक्ष संवर्धन, वृक्ष प्रेम आणि नवीन पिढीला वृक्षांबद्दल त्यांच्या गुणांबद्दल माहिती व्हावी हाच आहे. आज अनेक संस्था झाडे लावा,झाडे जगवा किंवा झाडांबद्दल जनजागृती करतात. परंतु आपल्या पूर्वजांनी तर झाडे लावायला आणि त्यांचे संवर्धन करायला शिकवले; त्याच शिक्षणाचा भाग म्हणजे वटपूजन .. .. .. ..
या व्रताचा उद्देश स्त्रियांना सौभाग्य प्रदान करण्याचा जरी असला तरी या वृक्षामुळे त्याच्या संवर्धनामुळे प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाला मदत होईल आणि वसुंधरेचे आणि पर्यायाने सर्व प्राणिमात्रांचे सौभाग्य उजळेल हीच आशा. या पावन पर्वावर एक तरी वृक्ष लावूया, संवर्धन करूया.
जसा वड सावित्रीस फळला, पावला, सौभाग्य देता झाला तसा तुम्हा आम्हा पावो हीच प्रार्थना. . . . .. . . . .
Very informative
उत्तर द्याहटवाGood read.. Keep up the good work
हटवाExcellent and informative
उत्तर द्याहटवासुंदर माहिती.
उत्तर द्याहटवासुंदर माहिती.
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाNice Andy keep posting.
उत्तर द्याहटवा