मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा जागर : प्रथम माळ - शैलपुत्री --- आनंद साऊरकर

या  पृथ्वीतलावरील सर्व  प्राणिमात्रांना मातृत्वाचा अत्यंत आदर आहे. मातृभाव हा सर्वांचा आदराचा विषय आहे. आणि याच भावनेमुळे  मनुष्य आपली आपली जास्तीतजास्त श्रद्धा आईच्या आईच्या चरणी ठेऊन असतो. अशा या मातृत्वाचा जगद्व्यापी अविष्कार म्हणजे जगतजननी 'जगदंबा '.
सकल जगाच्या मातृत्वाची, पोषणाची आणि संरक्षणाची  जबाबदारी सांभाळणारी जगदंबा हा सर्वांचा पूजनीय विषय ठरतो. वास्तविक आपण रोजचं  जगदंबेचे  निरनिराळ्या स्वरूपात पूजन करतो. परंतु देवत्वाच्या परिपूर्णतेचा काळ म्हणजे नवरात्री पूजन.  देवी संप्रदायानुसार चार नवरात्री प्रमुख मानल्या जातात, त्यात चैत्र, आषाढ, अश्विन आणि पौष यांचा समावेश  असतो. या  सर्व नवरात्रांमध्ये अश्विन नवरात्राचे महत्व अनन्य साधारण आहे. नवरात्रीच्या प्रमुख पूजनात, देवीच्या नऊ रूपांचे पूजन हा मुख्य सोहळा आहे. देवीची नऊ रूपे अशी :
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति. चतुर्थकम्।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति.महागौरीति चाष्टमम्।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना:।। 
याच नऊ रूपांचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न ......... 
शैलपुत्री :
जगदंबेचे पहिले रूप म्हणजे देवी शैलपुत्री. हिमालय पर्वताच्या पोटी जन्मझाल्यामुळे या देवीला शैलपुत्री नावानी ओळखल्या जाते. 

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥
अर्थात, वृषभारूढ या देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि डाव्या हातामध्ये कमलपुष्प केलेले आहे. 
पूर्वजन्मात ही देवी प्रजापती दक्षाची कन्या 'सती' या रूपामध्ये होती. दक्षयज्ञात झालेल्या अपमानामुळे सतीने योगाग्नीसाधनेद्वारा आपल्या देहाचे भस्म केल्यानंतर पुढील जन्मी ती हिमालयाच्या पोटी  जन्माला आली आणि आपल्या कठोर तपश्चर्येद्वाररा श्रीशंकराची अर्धांगिनी बनण्याचा मान प्राप्त केला. 
जगदंबा शैलपुत्री सर्व जगतावर कृपेचा वर्षाव करो ही  प्रार्थना.

या देवी सर्वभू‍तेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 


८ टिप्पण्या: